गुहागर : वेळणेश्वर (ता. गुहागर) येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाला एशिया टुडेने Most Admired Engineering College In Maharashtra (महाराष्ट्रातील सर्वात प्रशंसनीय अभियांत्रिकी महाविद्यालय) या पुरस्काराने गौरविले. हा पुरस्कार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते विद्या प्रसारक मंडळाच्या संचालिका डॉ. कीर्ती आगाशे यांनी स्वीकारला.

मुंबईत ७ ऑक्टोबर रोजी एशिया टुडे या संस्थेच्या प्राइड ऑफ नेशन अॅवॉर्ड पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. समारंभाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून अभियांत्रिकी शिक्षणाची संधी विद्यार्थ्यांना दिल्याबद्दल महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली असल्याचे एशिया टुडेतर्फे सांगण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यातील उच्च शिक्षणाच्या सोयी-सुविधांची कमतरता लक्षात घेऊन विद्या प्रसारक मंडळ (ठाणे) या संस्थेने २०१० साली वेळणेश्वरसारख्या ग्रामीण भागात महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाची पायाभरणी केली. २०१२ साली महाविद्यालय सुरू झाले. अत्यंत कमी कालावधीत नॅकचे मानांकन मिळवणारे मुंबई विद्यापीठाअंतर्गत ते सर्वांत तरुण महाविद्यालय ठरले.
विद्या प्रसारक मंडळाने कोविड महामारीमुळे उद्भवलेली भीषण परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या मोहिमेला प्रतिसाद म्हणून मुलींसाठी महाविद्यालयात ‘कोकणकन्या शिष्यवृत्ती योजना’ २०२० पासून सुरू केली. तसेच विद्या प्रसारक मंडळाच्या मदतीने प्रथम आणि थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वर्षाचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात आले. भाभा अणुसंशोधन केंद्रातील प्रथितयश निवृत्त वैज्ञानिकांनी महाविद्यालयात येऊन नियमित केलेले मार्गदर्शन तसेच अशा स्वरूपाच्या योजना विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय राबवत आहे. आभासी प्रयोगशाळेमधून अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान माहिती व्हावे यासाठी कॉलेज आँफ इंजिनिअरिंग (पुणे), आय.आय.टी., अशा नामवंत संस्थांबरोबर करार केले आहेत. इस्रो, भेलसारख्या मोठ्या प्रकल्पात औद्योगिक भेटीसाठी विद्यार्थ्यांना नेले जाते. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवरील विज्ञान प्रतिकृती स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. या सर्व उपक्रमांतून विद्यार्थ्यांची नवनिर्माण क्षमता वाढविणे, उत्तम अभियंता बनविणे, उत्तम नागरिक बनविण्यासाठी महाविद्यालय सातत्याने प्रयत्न करते. यामुळेच हे महाविद्यालय पुरस्कारासाठी पात्र ठरले, अशी माहिती संस्था व महाविद्यालय समन्वयक ऋषिकेश गोखले यांनी दिली.

