जिल्हा परिषद आचरे उर्दू शाळेची आदर्श कथामाला शाळा म्हणून निवड

आचरे : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातल्या आचरे येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेची सिंधुदुर्गातील एकमेव अल्पसंख्याक विभागातील आदर्श कथामाला शाळा म्हणून निवड झाली आहे.

‘या कथामाला शाळेने अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे विविध उपक्रम राबवून कथामालेचे पवित्र कार्य मुलामुलांत, घराघरांत पोहोचविले आहे. १९७२ साली या शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक जनाब आयुब युनूस शेख यांनी या शाळेत साने गुरुजी कथामालेची स्थापना केली. त्यानंतर मेहरुन्निसा भेंडवाडे, आफताब पटेल आदी अनेक शिक्षकांनी ते कार्य पुढे चालू ठेवले. अजूनही या शाळेत कथामाला उपक्रम दर वर्षी शाळा प्रारंभापासून सुरू होतो. कथाकथनापासून समाजसेवेपर्यंत सर्व उपक्रम राबविले जातात. म्हणून अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेच्या मालवण तालुका समितीने या शाळेची कथामालेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात आदर्श कथामाला शाळा म्हणून निवड केली आहे,’ अशी माहिती ‘साने गुरुजी कथामाला-मालवण’चे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी दिली.

या शाळेचा गौरव येत्या रविवारी, १६ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी बिडये विद्यामंदिर केंद्रशाळा आचरे नं. २ येथील बाल कथाकथन महोत्सवात होणार आहे. हा सत्कार सोहळा प्रकाश पेडणेकर (माजी मुख्याध्यापक ज्ञानदीप विद्यामंदिर वांगणी हायस्कूल) यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. प्रमुख मान्यवर म्हणून आनंदराव डिंगणकर (डेप्युटी झोनल मॅनेजर, गोवा झोन, बँक ऑफ महाराष्ट्र) उपस्थित राहणार आहेत. या वेळी कथामालेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या वेळी सय्यद मुश्ताक, सय्यद मुसा, अस्मा अशफाफ मुजावर या उर्दू माध्यमातल्या दोन कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या शाळेत कथामालेचा उपक्रम चिरंतन सुरू ठेवण्यासाठी श्रीमती जुलेखा अजीम आगा, श्रीमती तबस्सुम साजिक मुजावर, आझासनिसा उस्मान सोलकर, नाझिया सलीम खान आदी शिक्षक, विद्यार्थी, तसेच शाळेचे मुख्याध्यापक निसार यूनूस सोलकर यांचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत.

जि. प. आचरे उर्दू शाळेचे या निवडीबद्दल श्यामराव कराळे (केंद्रीय अध्यक्ष, कथामाला), मोहनराव मोहाडीकर (विश्वस्त कथामाला) यांनी, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे आणि शाळेचे मुख्याध्यापक निसार युनूस शेख यांनी अभिनंदन केले आहे.

(व्हिडिओ सोबत देत आहोत.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply