महाराष्ट्र चेंबरच्या कार्यक्रमात कोकणातील उद्योगांविषयीचे मंथन

रत्नागिरी : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या उद्योग मंथन कार्यक्रमाला जिल्ह्यातील उद्योजकांचा उदंड प्रतिसाद लाभला. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उद्योजकांचा सन्मान करण्यात आला. टीआरपी येथील अंबर हॉल येथे हा कार्यक्रम शनिवारी (दि. ८ ऑक्टोबर) सायंकाळी पार पडला. या कार्यक्रमाला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट देऊन उद्योजकांशी संवाद साधला.

यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले की, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स उद्योजक, सामाजिक संस्थांच्या सहभागातून रत्नागिरी जिल्ह्याचा रोडमॅप बनवणार आहे. या माध्यमातून नवीन गुंतवणूक राज्यांमध्ये येईल. तसेच राज्याचे उद्योगमंत्री, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून राज्याच्या उद्योग क्षेत्राचा भाग्योदय होणार आहे. तत्काळ निर्णय आणि अंमलबजावणी यामुळे उद्योगातील गुंतवणूक जास्त होईल. रत्नागिरीमध्ये चेंबरच्या माध्यमातून दर महिना एक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. तरुण उद्योजकांना प्रोजेक्ट रिपोर्टसुद्धा चेंबरतर्फे बनवून देऊ. त्यांना लागणारे सर्व सहकार्य करू. अमेरिकेमध्ये आंबा महोत्सव भरवण्याचे नियोजन आहे. येत्या २ ते ११ डिसेंबरला ट्रेड एक्स्पो आयोजित केला आहे. एमआयडीसीमध्ये बंद उद्योग, कारखान्यांच्या बाबत शासनाने धोरण आखावे. स्थानिकांना तेथे उद्योग सुरू करता येईल. भारताबाहेरील ४२ महाराष्ट्र मंडळांमार्फत चेंबर ऑफ कॉमर्सने करार केला आहे. त्यामुळे तेथील मराठी माणसांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, याकरिता प्रयत्न सुरू असून केंद्र सरकारचे सहकार्य लाभत आहे.

कार्यक्रमाकरिता सजवण्यात आलेले व्यासपीठ बघताक्षणी प्रभावित करणारे होते. नियोजनबद्ध आणि कमी वेळेत केलेली आखणी यामुळे सर्व कार्यक्रम वेळेत पूर्ण होऊ शकला. यासाठी गेले दोन-तीन महिने नियोजन करण्यात येत होते. या वेळी बँक ऑफ इंडिया अधिकारी श्री. काळे एमएसएमई विभागाचे चीफ मॅनेजर कुमार प्रमोद सिंग यांनी बँक ऑफ इंडियाच्या योजनांची माहिती सांगितली. जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी योजनांची माहिती दिली.

मुख्य कार्यक्रमांमध्ये डॉ. श्रीधर ठाकूर, रवींद्र घोसाळकर, केशवराव इंदुरकर, दीपक गद्रे, शाळिग्राम खातू, महेंद्र जैन, भाऊ देसाई, सुजित झिमण व्यासपीठावर होते. या सर्व मान्यवर उद्योजकांचा सन्माचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. जिल्हा नियोजन अधिकारी सत्यवान मुळे, हॉटेल असोसिएशनचे राकेश भोसले, अभिजित जेधे, सुबोध साळवी, शिल्पा बुलाखे, प्रमोद केळकर, विनय आंबुलकर यांचा सन्मान केला. सूत्रसंचालन पर्यटन समिती सदस्य मिलिंद चाळके आणि सौ. सोनाली सावंत यांनी केले.

कृषी आणि प्रक्रिया उद्योगांतर्गत गोविंद चाळके, उदय वेलणकर, मिलिंद प्रभू, पराग सांख्ये, सॅटर्डे क्लबच्या रत्नागिरी चाप्टरचे चेअरपर्सन तुषार आग्रे, राम कोळवणकर यांचा सन्मान करण्यात आला. सेवा आणि लघुउद्योगांअंतर्गत जीएसटी स्पेशलिस्ट ऋषिकेश शेठ राजेश देसाई यांचा सत्कार केला. पर्यटन उद्योग यावर कातळ शिल्पांची पीपीटी दाखवण्यात आली. याप्रसंगी निसर्गयात्री संस्थेचे सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, रत्नदुर्ग माउंटेनिअर्सचे जितेंद्र शिंदे, देवगडच्या वैष्णवी जोईल, डोंगरमाथा चिपळूणचे मंगेश गोवेकर, शिरवली जंगलचे नंदू तांबे, भाऊ सामंत, मुचकुंदी पर्यटनचे विवेक सावंत, मांडवी पर्यटन संस्थेचे राजीव कीर, रत्नागिरी पर्यटन संस्थेचे राजू भाटलेकर, क्षत्रिय मराठा मंडळाचे संतोष तावडे, मराठा बिझनेस फोरमचे प्रसाद कदम यांचा सन्मान करण्यात आला.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply