ठाणे : येथील शिवसेवा संस्थेतर्फे येत्या रविवारी (दि. १६ ऑक्टोबर) ठाण्यात आकाशकंदील आणि पणती पेंटिंग कार्यशाळा होणार आहे.
दिवाळीचा सण म्हटला की, सगळीकडे उत्साह, जोष आणि आनंदाचे वातावरण असते. दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीच्या ५ दिवस आधीच ठाणे येथे उत्साहाची सुरुवात होणार आहे. सातत्याने पाचव्या वर्षी आपली संस्कृती, परंपरा न हरवता आगळीवेगळी ओळख आजही जपत सारे काही उजळवून टाकण्यासाठी, प्रकाशित करण्यासाठी, ठाणे (पूर्व) येथील शिवसेवा मित्र मंडळातर्फे १६ ऑक्टोबर रोजी विशेष कार्यशाळा होणार आहे. सकाळी ठीक १० वा राजेंद्रपाल मंगला हिंदी हायस्कूल, बँक ऑफ महाराष्ट्र समोर, पहिला मजला, लोकमान्य टिळक रोड, ठाणे (पूर्व) येथे प्रा. श्याम धुरी यांच्या मार्गदर्शनाखाली “आता आकाशकंदील बनवा आणी पणती रंगवा घरच्या घरी” या संकल्पनेवर ही कार्यशाळा होणार आहे. या माध्यमातून कंदिलोत्सव, दीपोस्तव होणार आहे. घरी आकाशकंदील व पणती बनवू इच्छिणाऱ्यांसाठी ही पर्वणीच आहे.
या कार्यशाळेत दहा वर्षांवरील मुलामुलींना तसेच १० वर्षांखालील मुलांना आजी, आजोबा किंवा आई, किंवा बाबांबरोबर शेजारी-शेजारी किंवा एका घरातील भावंडे एकत्र जमून सहभाग घेता येईल. कार्यशाळेत पारंपरिक कलात्मक करंजी कंदील बनविण्याचे आणि वैविध्यपूर्ण पणती रंगविण्याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. आपण केलेले आकाशकंदील आणि आपण रंगवलेल्या पणत्या घरात लावून यंदाची दीपावली साजरी करण्याचा आनंद मुलांसह पालकांनाही घेता येणार आहे.
कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन शिवसेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष अजय नाईक यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. अधिक माहितीसाठी ९८३३१५८८००, ९२२४१९९९७९ किंवा ९९३०३२०९९८ या क्रमांकांवर संपर्क साधावा.


