चिपळूण : विद्याभारतीच्या शिरळ येथील भारतीय शिक्षा संकुलातर्फे आयोजित दिवाळी सुट्टीतील मुलांसाठी आयोजित केलेल्या ‘मैत्री मातृभूमीशी’ निवासी शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला.
शिबिराचे उद्घाटन साहित्यिक सौ. नीलाताई विवेक नातू यांनी केले. यावेळी शिरळचे सरपंच शशिकांत राऊत उपस्थित होते. ग्रामीण भागातील समाजजीवनाचा थेट परिचय विद्यार्थ्यांनी समजून घेणे आणि आपल्या व्यक्तिमत्त्वविकासात बदल करून आपले व्यक्तिमत्त्व प्रभावी करणे हा शिबिराचा उद्देश होता.
शिबिरामध्ये योग, ओमकार साधना, संस्कृत, गायन, वादन, पेटी-तबला, नृत्य, बौद्धिक आणि मैदानी खेळ, मल्लखांब, साहसी खेळ- व्हॅली क्रॉसिंग, श्रमदान, भारतीय वायू दलातील चित्तथरारक बाबी, ग्रामभेटीतून वाडीवस्तीवर जाऊन नागरिकांशी संवाद साधणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे, गोशाळेला भेट देऊन गाईंचे आणि दुधाचे महत्त्व समजून घेणे, आयुर्वेद परिचय आणि त्याच्या जीवनशैलीचा दैनंदिन वापरामध्ये उपयोग करणे अशा विविध विषयांवर मुलांना मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.
यावेळी चिपळूणचे युवा आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य अतीन औताडे, प्रा. आशुतोष मोडक, गणेश कुंभार, सुनील बाणे, बापू कदम, कापरे येथील गोशाळेचे श्री. भाटिया, श्रेया पातकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या सर्व सत्रांना शिबिरार्थींचा, पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. शिबिरात २५ मुलांचा सहभाग होता.
शिबिराच्या समारोपप्रसंगी चिपळूण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षा श्रीमती राधिका पाथरे आणइ संशोधक शशिकांत काळे उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प समन्वयक प्रसाद सनगरे, गुरुकुलच्या मुख्याध्यापिका जान्हवी टाकळे, शिबिराचे पालक शरद मुसळे, प्राजक्ता जोशी, केतकी मुसळे, सिद्धी जाधव, सारिका कदम, अशोक बामणे, सरिता शिंदे यांनी प्रयत्न केले. कार्यवाह छाया मुसळे यांनी पालकांच्या मागण्या आणि मुलांची आवड यावर आधारित शिबिरे आयोजित करण्याचा मानस असल्याचे सांगितले. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्था अध्यक्ष एअर मार्शल (रिटायर्ड) हेमंत भागवत यांनी आयोजकांचे अभिनंदन आणि कौतुक केले.



कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

