रत्नागिरी : रत्नागिरीजवळच्या भाट्ये येथील मच्छीमारांना रिलायन्स फाउंडेशन, भाट्ये मच्छीमार सेवा सहकारी संस्था आणि नागरी संरक्षण केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले.
मच्छीमारी व्यवसाय खूप जोखमीचा आहे. वर्षानुवर्षे मासेमार करताना मासेमारांना समुद्रामध्ये विविध आपत्तींना तोंड द्यावे लागते. हृदयविकाराचा झटका येणे, बोटीवरून पाण्यात पडून बुडणे इत्यादी आपत्तीचे व्यवस्थापन कसे करावे, याबद्दलची शास्त्रीय माहिती मासेमारांना असणे गरजेचे आहे. त्यामुळे आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळता येते अथवा कमी करता येते. याच अनुषंगाने भाट्ये येथील मासेमारांना रिलायन्स फाउंडेशन, भाट्ये मच्छीमार सेवा सहकारी संस्था आणि नागरी संरक्षण केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे, कार्यक्रम सहाय्यक चिन्मय साळवी, नागरी संरक्षण केंद्राचे उपनियंत्रक मिलिंद जाधव, सहाय्यक उपनियंत्रक उपस्थित होते. मिलिंद जाधव यांनी समुद्रामध्ये मच्छीमारांना हृदयविकाराचा झटका आल्यास व पाण्यात बुडाल्यास मासेमारांना हाताळायच्या विविध शास्त्रीय पद्धती प्रात्यक्षिकासहित समजावून सांगितल्या. कृत्रिम श्वासोच्छ्वास, सीपीआर म्हणजे हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला कृत्रिम श्वासोच्छ्वासाद्वारे दिलासा कसा द्यावा याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. प्राथमिक उपचार कसे द्यावेत याबद्दलही माहिती देण्यात आली.
कार्यक्रमास भाट्ये मच्छीमार सहकारी संस्थे चे सेक्रेटरी अरमान भाटकर यांचे सहकार्य लाभले. प्रशिक्षणास उत्स्फूर्त सहभाग लाभला.


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

