चिपळूण : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेशी संलग्न रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनतर्फे आयोजित रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत प्रौढ गटातील ७० किलो वजनी गटात सावर्डे (ता. चिपळूण) येथील महंमद जैद अक्रम शेख याने सुवर्ण पदक पटकावले. त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनतर्फे पाली येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील ७० किलो वजनी गटात सावर्डे येथील जैद शेख याने रत्नागिरीतील अजय शिगवण या खेळाडूला धूळ चारत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.
जैद हा सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेचा माजी विद्यार्थी असून सध्या तो पोलीस भरतीची तयारी करत आहे. सोबतच लहानपणापासूनची आपली कुस्तीतील आवड जोपासताना त्याने कुस्तीचा सरावही कायम ठेवला आहे. यापूर्वीही जैद शेखने अनेक कुस्ती स्पर्धांमधून आपल्या चमकदार कामगिरीचे प्रदर्शन केले आहे. पालीतील स्पर्धेसाठी त्याला प्रशिक्षक वैभव चव्हाण (चिपळूण) यांनी मार्गदर्शन केले.
रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण ऊर्फ भाई विलणकर, प्रमुख कार्यवाह सदानंद जोशी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी जैदचे सुवर्ण पदक पटकाविल्याबद्दल अभिनंदन केले. रत्नागिरीतील स्पर्धेत बाजी मारणाऱ्या जैद शेखवर सावर्डे परिसरासह संपूर्ण तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जानेवारीमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत जैद शेख रत्नागिरी जिल्ह्याच्या संघातून खेळणार आहे.
स्पर्धेतील जैदच्या लढतीची झलक …
…..
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

