आठवणीतले बरवे

प्रभाकर बरवे हे आधुनिक चित्रकारांमधलं एक मोठं नाव. ६ डिसेंबर हा त्यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त मुंबईतले ज्येष्ठ आर्किटेक्ट चंद्रशेखर बुरांडे यांनी त्यांच्याविषयी लिहिलेला हा लेख…

आधुनिक चित्रकार प्रभाकर बरवेंनी (१६ मार्च १९३६ – सहा डिसेंबर १९९५ ) मराठी भाषेत लिहिलेलं ‘कोरा कॅनव्हास’ हे पुस्तक १९९० साली प्रसिद्ध झालं. पुस्तकात चित्रकलेतल्या अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. पुस्तकाच्या निवेदनात नवीन चित्राला सुरुवात करण्याच्या उद्देशाने कोर्‍या कॅनव्हाससमोर बसलेल्या चित्रकाराच्या मन:स्थितीचं वर्णन केलं आहे. तसंच चित्रातले आकार आणि अर्थ, रंगाचं मर्म, भावनांचा आविष्कार, सौंदर्यानुभव, मूर्त आणि अमूर्त, आनंद, जाणिवा यांसारख्या अनेक विषयांवर विचार मांडले आहेत.

ह्या पुस्तकातल्या ‘जाणिवा’ ह्या सदराखाली प्रभाकर बरवे म्हणतात; ‘सावली हा प्रकार मला असाच अद्भुत वाटतो. अनेक प्रकारच्या सावल्या पडत असतात. कधी कधी ह्या सावल्या इतक्या स्वतंत्र होतात, की त्यांचा मूळ वस्तूशी संबंधच उरत नाही. ज्या पृष्ठभागांवर सावल्या पडतात ते पृष्ठभागही सावल्यांच्या एकंदर चमत्कारिकपणात भर घालतात. भिंतीवरच्या सावल्या उभ्या, तर जमिनीवरच्या सावल्या आडव्या, आकाशातल्या सावल्या आभासात्मक, तर पाण्यावरच्या सावल्या लहरणार्‍या. ह्या सर्व सावल्यांची वागणूक वेगवेगळी असते. हलणार्‍या सावल्या, लहानमोठ्या होणार्‍या सावल्या, एकमेकीत मिसळणार्‍या सावल्या, इतकच काय तर पांढर्‍या सावल्या, रंगीत सावल्या, आणि आपल्या नित्य परिचयाच्या काळ्याकभिन्न सावल्या-अशा सावल्यांच्या अरण्यामध्ये चमत्कृतींचा तुटवडा नाही. मला सावलीचा हा चमत्कारिक स्वभावच अतिशय आकर्षक वाटतो. त्यामुळं माझ्या चित्रात सावल्या वारंवार येतात. अर्थात प्रत्येक सावली एक आकार असल्यामुळं चित्रात त्या महत्वाच्या ठरतात. सावल्यांच्या ह्या अद्भुत स्वभावातून पलीकडच्या जगाचा आभास उत्पन्न होतो. वास्तवतेपलीकडे नेणार्‍या जाणिवा सावल्यातून उद्भवतात. सावल्या प्राकाशातून जन्मतात आणि प्रकाशातच लुप्त होतात. भर दिवसा आपल्या पायाखाली येणार्‍या सावल्या रात्री मात्र आपल्या डोक्यावरून पलीकडे जातात. सावल्यांची आकार प्रसवण्याची क्षमता अतर्क्य आहे. चित्रात आणखी एक दृष्टीनं सावल्या अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. त्रिमितीचा आभास पूर्ण करण्याचं कार्य सावल्याच करतात.’

२०१३ मध्ये ‘कोरा कॅनव्हास’ मराठी पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद श्रीमती शांता गोखले यांनी ‘The blank canvas’ या शीर्षकाने केला. या पुस्तकाचा वाचन समारंभ फोर्ट इथल्या ‘किताब खाना’ बुकस्टोअरमध्ये आयोजित केला होता. त्याच पुस्तकाचा हिंदी भाषेतला अनुवाद बहुचर्चित समीक्षक डॉ. सत्यदेव त्रिपाठी ह्यांनी ‘कोरा कैनवास’ अशा शीर्षकाने केला आहे.

निसर्गरम्य कोकणातल्या प्रस्तावित प्रकल्प आरेखनाच्या निमित्ताने मला बरवेंचा सहवास लाभला होता. शहरात राहणार्‍या चित्रकारास शांतता आणि निसर्गसान्निध्याचा अभाव प्रकर्षाने जाणवत असतो. म्हणून त्यांना या प्रकल्पात चित्रकला व वास्तुकलेच्या मिश्र मिलाफातून (प्रत्यक्ष दृश्यानुभवातून) एकूण प्रकल्पाची मांडणी अपेक्षित होती. प्रामुख्याने संवेदनशील कलावंतांना प्रेरणादायी ठरेल अशी वातावरणनिर्मिती त्यांना अभिप्रेत होती. प्रस्तावित प्रकल्पात त्यांना अभिप्रेत असलेल्या कलेविषयक बाबींची उकल सोपी व्हावी म्हणून त्यांनी पुस्तकातली आरेखनं, हस्तलिखित नोंदी इत्यादी बाबी माझ्याशी शेअर केल्या होत्या. त्यांच्यासोबत झालेल्या अनेक चर्चांतून ज्या मुद्द्यांवर आमचं एकमत झाले होतं, त्या पुंजीवरच प्रस्तावित प्रकल्पाचं आरेखन होणार होतं. परंतु ६ डिसेंबर १९९५ रोजी बरवेंनी ह्या कलाजगताचा निरोप घेतला. त्यांच्या अचानक जाण्यामुळे बरवेंच्या कला-संवेदनशील मनातला व माझ्या वास्तुकला-सौंदर्य कल्पनेतून साकारला जाणारा प्रस्तावित प्रकल्प स्थगित झाला. एका अर्थाने चित्रकारास अभिप्रेत असलेलं रूढीबद्ध साच्यातल्या कॅनव्हासवर काढलेले द्विमितीय आभासी चित्रण व जवळपास दोन लाख स्केअर फूट जमिनीवरच्या अवकाशाशी त्रिमितीतून (third dimension) संवाद साधणारे दोन्ही कॅनव्हास कोरेच राहिले.

आधुनिक कलाक्षेत्रातल्या त्यांच्या योगदानाप्रीत्यर्थ मुंबईत पहिलं प्रदर्शन लोअर परेल इथल्या रघुवंशी मिल कंपाउंडमधल्या आर्ट गॅलरीमध्ये भरवण्यात आलं होतं. त्यांच्या समग्र कला जीवनाचा आढावा मांडणारं दुसरं मोठं प्रदर्शन फोर्टमधल्या ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न’ आर्ट मध्ये भरवण्यात आलं होतं. बरवे हयात असताना त्यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांपैकी ललित कला अकादमीतर्फे मिळालेलं राष्ट्रीय पारितोषिक (१९७६) आणि नॅशनल गॅलरीमध्ये भरवलेलं प्रदर्शन (२०१९) ह्या दोन्ही घटना त्यांच्या सर्वोच्च बहुमानाच्या होत्या. उल्लेखित इंग्रजी पुस्तक वाचन समारंभ व प्रदर्शनाचं आयोजन बोधना आर्ट रिसर्च फाउंडेशनच्या संस्थापक श्रीमती जेसल ठाकर यांनी केलं होतं.

जवळपास दोन दशकांपूर्वी स्थगित झालेल्या प्रकल्पास चालना देण्यात माझी रुची जाणून घेण्यासाठी श्रीमती जेसल यांनी १७ नोव्हेंबर २०२२ रोजी ध्यानीमनी नसताना फोन केला. माझ्या मते, नैसर्गिक ऊर्जेचा स्रोत असलेल्या जागांना मानवी कल्पकतेची जोड देऊन सर्जनशील कलावंतास प्रेरणा देणार्‍या जागा निर्माण होणं ही काळाची गरज आहे. कोर्‍या कॅनव्हासवर स्वप्नवत भासणार्‍या वेगवेगळ्या आकारातल्या सावल्या, रंग व मुक्त अवकाशास या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्यक्ष रूपात मांडता येईल. एक अर्थाने हा प्रकल्प बरवेंच्या अंतर्मनातल्या अस्तित्वाला अर्थ प्राप्त करणारा ठरावा म्हणून होकार कळवला.

महाराष्ट्रात अनेक प्रतिभावान चित्रकार व वास्तुरचनाकार होवून गेले. परंतु कला-सौंदर्य व वास्तुकला-सौंदर्याच्या जोडीने इतर साहित्यातही रुची असलेले चित्रकार, तसंच वास्तुरचनाकारांची संख्यादेखील खूपच कमी आहे. वास्तुरचनाकार माधव आचवल (१९२६-१९८०) यांनी ‘किमया’ (१९६१) या पुस्तकात कला-सौंदर्याच्या दृष्टिकोनातून वास्तुरचनाकारांच्या मनातल्या भावनांना शब्दांकित केलं आहे. ‘स्लेड्स स्कूल ऑफ लंडन आर्ट’मध्ये शिकलेले, सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक, नाटककार, समीक्षक द. ग. गोडसे (१९१४-१९९२) यांनी कलाविचारांची मांडणी ‘पोत’, ‘शक्तिसौष्ठव’ या पुस्तकांत केली आहे. तसंच रवी परांजपे यांनी ‘रंग रेषांचे’ या सदरात कलाविषयक लेखन केलं आहे. ग्राफिक डिझायनर/लेखक/कवी अरुण कोलटकर (१९३२-२००४) यांनी मराठी व इंग्रजी भाषेत कविता व लेखन केले आहे.

सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून फाइन आर्टचं शिक्षण घेतलेले प्रभाकर बरवे (१९३६-१९९५) यांचं भारतीय आधुनिक चित्रकलेतलं योगदान श्रेष्ठ आहे. त्याचबरोबर मराठी वाङ्मयाच्या कला इतिहासात ‘कोरा कॅनव्हास’ व ‘चित्र-वस्तुविचार’ या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी एक लेखक म्हणून स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. ते कवितादेखील लिहीत. ‘कोरा कॅनव्हास’ पुस्तकाच्या शेवटच्या पानावर स्वहस्ताक्षरात व्यक्त केलेल्या मनोगतात ते म्हणतात – ‘हे लिहीत असताना मला एका गोष्टीची पूर्ण जाणीव आहे आणि ती म्हणजे ह्या सगळ्यामध्ये मी कांहीही नवीन किंवा वेगळं सांगत नाही – कारण माझा अनुभव हा सनातन अनुभव आहे. ज्यानी त्यानी खिडकी उघडून आतमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांचा हाच अनुभव आहे. खरं म्हणजे ‘मी’ हे केवळ ‘निमित्त’ आहे.’

कलाविषयक विचार व गूढ शब्दांपलीकडे पोहोचवणारी त्यांची बोलकी नजर अगदी पहिल्या भेटीपासून माझ्या आठवणीचा भाग बनून राहिली आहे. अशा कविमनाच्या कला-संवेदनशील बरवेंना स्मृतिदिनानिमित्त मन:पूर्वक अभिवादन!

  • चंद्रशेखर बुरांडे, मुंबई

संपर्क : 9819225101
ई-मेल : fifthwall123@gmail.com
(लेखक मुंबईतील ज्येष्ठ आर्किटेक्ट आहेत.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply