रवींद्र प्रभुदेसाईंच्या मार्गदर्शनाची रत्नागिरीच्या उद्योजकांना संधी

रत्नागिरी : पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शऩाची संधी रत्नागिरीतील उद्योजकांना रविवारी (दि. ११ डिसेंबर) उपलब्ध होणार आहे. रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघाच्या विविध पुरस्कारांचे वितरण रविवारी होणार असून त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. प्रभुदेसाई उपस्थित राहणार आहेत.

रवींद्र प्रभुदेसाई

रवींद्र प्रभुदेसाई यांना वडिलांकडून उद्योजकीय वारसा मिळाला. पितांबरी प्रॉडक्ट्स नावाने त्यांनी कंपनी सुरू केली. सध्या कंपनीत ११ विभाग सुरू असून होमकेअर, हेल्थकेअर, अॅग्री, सोलार, डिजीकेअर अशा विभागांत मिळून कंपनीची ८२ उत्पादने आहेत. पितांबरीची उत्पादन केंद्रे रत्नागिरी जिल्ह्यासह ठाणे, राजस्थान, गुजरातमध्येही आहेत. दापोलीजवळ साखळोली येथे ५० एकरवर आयुर्तेज गार्डनची निर्मिती करून त्यात ५०० दुर्मिळ वनौषधींची आणि सुगंधी फुलझाडांची नियोजनबद्ध लागवड केली आहे. या फुलांच्या अर्कापासून देवभक्ती अगरबत्ती तयार करण्याचा कारखानाही तेथेच आहे. राजापूर तालुक्यातील ताम्हाणे येथे अगरबत्तीच्या काडीसाठी उपयुक्त तुल्डा जातीच्या बांबूची आणि अन्य ४० प्रकारच्या बांबूची लागवड करून स्थानिक शेतकऱ्यांमध्ये बांबूसंबंधित उत्पादनांबाबत जागरुकता निर्माण केली जात आहे. श्री. प्रभुदेसाई यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांच्या हस्ते रत्नागिरीतील कार्यक्रमात विविध पुरस्कारांचे वितरण करणार असून नवउद्योजकांना त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरणार आहे.

कार्यक्रमात राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार खो-खोपटू सायली दिलीप कर्लेकर (रत्नागिरी), धन्वंतरी पुरस्कार डॉ. शाम गोपाळराव जेवळीकर (रत्नागिरी), आदर्श पौरोहित्य पुरस्कार वेदमूर्ती गणेश दत्तात्रय खेर (भू, राजापूर), आदर्श कीर्तनकार पुरस्कार हभप दत्तात्रेय तथा दत्तराज नरसिंह वाडदेकर (देवरूख), दर्पण पुरस्कार सुरेश वामन सप्रे (देवरूख), आचार्य नारळकर आदर्श शिक्षक पुरस्कार सदानंद रघुनाथ ठाकुरदेसाई (मोरोशी, ता. राजापूर), उद्योजक पुरस्कार महेश मोहन गर्दे (रत्नागिरी), उद्योगिनी पुरस्कार शिल्पा नितीन करकरे (तुरळ, ता. संगमेश्वर) यांना प्रदान करण्यात येणार आहे. शाल, पुस्तक, रोख रक्कम, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या कार्यक्रमात प्रमुख देणगीदारांचाही सत्कार करण्यात येणार आहे.

रत्नागिरीत शेरे नाका येथील राणी लक्ष्मीबाई सभागृहात रविवारी दुपारी साडेतीन वाजता होणार पुरस्कार वितरणाच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष मिलिंद आठल्ये यांनी केले आहे.

पुरस्कारमूर्तींचा परिचय

हभप दत्तराज वाडदेकर
हभप दत्तराज वाडदेकर यांनी आतापर्यंत मध्य प्रदेश, गुजरात, कारवार, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्रात ७ हजाराहून अधिक कीर्तने केली आहेत. १९६२ पासून २०१७ पर्यंत म्हणजे ५५ वर्षे कीर्तन सेवा करत आहेत. ४५० हून अधिक व्यसनमुक्ती कार्यक्रम केले आहेत. ते ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, खगोलशास्त्र डॉक्टरेट पदवीप्राप्त आहेत. त्यांना भगवान परशुराम पुरस्कार मिळाला आहे. तसेच आतापर्यंत विविध नामवंत संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. अखिल भारतीय कीर्तन कुलचे १० वर्षे अध्यक्ष, अ. भा. कीर्तन कुलचे १५ वर्षे कार्यवाह, सृष्टी सेवा संस्थेचे संस्थापक सदस्य, देवर्षी नारद कीर्तन कला प्रसारक मंडळचे अध्यक्ष अशी पदे त्यांनी भूषवली आहेत.

वेदमूर्ती गणेश खेर
वेदमूर्ती गणेश दत्तात्रय खेर यांनी पौरोहित्य, संस्कृत संवर्धनासाठी विपुल योगदान केले आहे. राजापूर संस्कृत पाठशाळेत वेदशास्त्रसंपन्न (कै.) पांडुरंगशास्त्री आठल्ये आणि वेदशास्त्रसंपन्न गजाननशास्त्री मोरेश्वर पाध्ये या दोघा ऋषितुल्य गुरूंकडे ते शिकले. काही वर्षे कोल्हापूर, नंतर मुंबईत राहून पौरोहित्य केले. ज्या राजापूर वेदपाठशाळेत गुरुजींनी अध्ययन केले, त्या ठिकाणी १ ऑक्टोबर १९८७ पासून अध्यापक म्हणून त्यांनी सेवा रुजू केली. सुमारे १३ वर्षांत शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी उत्तम मार्गदर्शन केले. सन १९८७ ते १९९६ या कालावधीमध्ये त्यांनी संस्कृत पाठशालेत अध्यापनाचे उत्कृष्ट कार्य केले. त्यावेळी १९९० मध्ये कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य ही शाळा पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांनी केलेले पठण त्यांनी ऐकले आणि समाधान व्यक्त करून आशीर्वाद दिले. या मुलांना शिकविणाऱ्या वे. शा. सं. खेर गुरुजी यांच्या कार्याचे कौतुक केले आणि त्यांचा गौरव केला. खेर गुरुजींना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. रत्नागिरी जिल्हा संस्कृत शिक्षण मंडळाने उत्कृष्ट संस्कृत अध्यापनाबद्दल मानपत्र दिले आहे. मालवण येथील महागणेश सेवा मंडळाने खेर गुरुजींच्या कार्याचा गौरव म्हणून मानपत्र देऊन त्यांना पुरस्कार दिला आहे. वे.शा. सं. दत्तात्रय निगुडकर, वे. शा. सं. जनार्दन निगुडकर आणि वे. शा. सं. वासुदेव निगुडकर या त्रैमूर्ती निगुडकर गुरुजींच्या स्मरणार्थ (कै.) दामोदर करंबेळकर स्मृति प्रतिष्ठानकडून अध्यापनातील विशेष कार्यासाठी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे.

डॉ. शाम जेवळीकर
डॉ. शाम जेवळीकर प्रख्यात नेत्रशल्य विशारद असून १९८२ पासून २०१३ पर्यंत त्यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले. राज्यपालांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट नेत्रशल्य विशारद म्हणून त्यांना गौरवण्यात आले आहे. नेत्रदानासंबंधी त्यांनी समाजात जनजागृती केली असून सिंधुदुर्गामध्ये १२ केराटोप्लास्टी शस्त्रक्रिया केल्या आहेत.

सदानंद ठाकूरदेसाई
सदानंद ठाकूरदेसाई गेल्या १५ वर्षांपासून शिक्षक असून सध्या मोरोशी शाळा क्र. १ मध्ये आहेत. सुरवातीला वाल्ये शाळा क्र. १ येथे त्यांनी ८ लाख रुपयांचा शैक्षणिक उठाव करून शाळेचा चेहरामोहरा बदलला. ज्ञानदानासोबत त्यांनी रक्तदान, आरोग्य, पशुसंवर्धन शिबिरे, अभ्यासिका असे समाजोपयोगी उपक्रम राबवले. राजापूर तालुक्यातील नवोपक्रमशील आणि तंत्रस्नेही शिक्षक म्हणून ते परिचित आहेत. मोरोशी शाळेत त्यांनी मदतीतून डिजिटल वर्ग साकारला आहे.

सुरेश सप्रे
सुरेश सप्रे यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यावर १९८७ साली दै. रत्नभूमिमधून पत्रकारितेला सुरवात केली. १९८८ पासून रत्नागिरी टाइम्सचे ते देवरूख प्रतिनिधी व २००३ पासून संगमेश्वर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. पत्रकारितेबरोबरच तालुक्याच्या आणि विशेषतः देवरूखच्या प्रत्येक सांस्कृतिक, सामाजिक चळवळीत सहभाग घेतात. राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, आकार ऑर्गनायझेशनच्या स्थापनेत पुढाकार, खाद्य महोत्सव, नाट्य महोत्सव, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे भरवतात. संगमेश्वर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले असून सध्या रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.

महेश गर्दे
महेश गर्दे यांनी सुरवातीला विहार उद्योग समूहात मॅनेजर म्हणून आणि २०१५ पासून लॉजिंग प्रोप्रायटरी तत्त्वावर चालवण्यास घेतले. अकाउंटिंग मॅनेजमेंटचा व्यवसाय करतात. ते जाणीव फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत. या संस्थेमार्फत ते रक्तदान शिबिरे व सामाजिक कार्य करत आहेत. रत्नागिरी आर्मी, पोलिस मित्र, जनजागृती संघ, जनशिक्षण संस्थानचे ते सदस्य आहेत. गेल्या वर्षापासून त्यांनी सिद्धाई फूडस नावाने फूड प्रोसेसिंग युनिट सुरू केले. कोकणातील पदार्थांना ते परदेशी बाजारपेठ मिळवून देत आहेत. करोना कालावधीत त्यांनी कोरोना योद्धा म्हणून काम करताना रुग्ण आणि नातेवाइकांना आधार दिला. यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार त्यांना मिळाला असून संकल्प कला मंच, रोटरी क्लब, जायंटस इंटरनॅशनल, महाराष्ट्र पत्रकार संघ आदींकडून त्यांना गौरवण्यात आले आहे.

शिल्पा करकरे
शिल्पा करकरे यांनी मामाचा गाव या संकल्पनेतून तुरळ (संगमेश्वर) येथे रस्टिक हॉलिडेजला सुरवात केली. पुण्या-मुंबईचे अनेक पर्यटक येथे येतात. यामुळे कोकणच्या पर्यटनाला चालना मिळाली आहे. ठाणे येथे १० वर्षे हस्तकलेचे दुकान चालवल्यानंतर, सौ. शिल्पा आणि पती नितीन यांनी शहरी जीवनातील गजबज सोडून कोकणातील त्यांच्या वडिलोपार्जित घरी जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २१० वर्षे जुने घर सुस्थितीत ठेवले आणि गावकऱ्यांना रोजगार मिळेल असा पर्यटन व्यवसाय सुरू केला. येथे स्थानिक लाकडी वस्तू बनवल्या जातात आणि स्थानिक खाद्यपदार्थ तयार करतात. कऱ्हाडे ब्राह्मण बेनेव्होलंट फाउंडेशनच्या रत्नागिरी चॅप्टरच्या त्या अध्यक्षा आहेत.

सायली कर्लेकर
सायली कर्लेकर हिची रा. भा. शिर्के प्रशालेत आठवीत असताना राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. हिमाचल प्रदेशात उना येथे झालेल्या खो-खो राष्ट्रीय स्पर्धेत तिने यश मिळविले. तिने या खेळाची सुरवात पाचवीपासून केली. या खेळाचा सराव छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर ती नियमितपणे करते. शाळेचे क्रीडा शिक्षक विनोद मयेकर, राष्ट्रीय खो-खो पटू पंकज चवंडे हे तिचे मार्गदर्शक, प्रशिक्षक आहेत. गेल्या चार वर्षांपासून सायली कर्लेकर खो-खो हा खेळ शिकत आहे. या कालावधीत तिने अनेक जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply