कौटुंबिक गुंतागुंतीच्या प्रश्नाची उकल

एकसष्टावी हौशी राज्य नाट्य स्पर्धा – रत्नागिरी केंद्र

आजचे नाटक (१० डिसेंबर २०२२) :

रात्र संपली, पण उजाडलं कुठं?

सादरकर्ते : आश्रय सेवा संस्था, रत्नागिरी

हे नाटक १९७० च्या दशकातील असून पुरुषपात्रविरहित आहे. कौटुंबिक जिव्हाळा निर्माण करत प्रेक्षकांच्या हृदयाला हळूवारपणे मायेचा स्पर्श करून जाणारे हे नाटक आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत साहित्य संघ मंदिरात २८ ऑगस्ट १९६७ रोजी आणि दुसरा प्रयोग ९ नोव्हेंबर १९६८ रोजी महिला कलादर्शक या संस्थेने सादर केला होता.
एका वैभवसंपन्न मध्यमवर्गीय कुटुंबातील एका सच्छील गृहिणीची आणि पुत्रप्राप्तीनंतर तिला वेड लागल्याने संसाराची विस्कटलेली घडी बसविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिच्या बहिणीची ही कथा आहे.

रात्र संपली की उजाडायला हृवे, अंधार संपताच प्रकाश पडायला हृवा, हा निसर्गाचा नियम आहे. पण जीवनात हा नियम नेहमी लागू पडतोच असे नाही. पुष्कळदा सारे आयुष्य निराशेच्या – दु:खाच्या अंध:काराने व्यापून जाते! प्रयत्नाने ते दु:ख दुर सारता येते… अंधार नाहीसा होतो, परंतु सुख लाभतेच असे नाही. प्रकाश दिसतोच, असे नाही. अशावेळी काय करायच, असा प्रश्न निर्माण होतो. दुःखाच्या अनुपस्थितीलाच सुख समजायचे का, असे वाटू लागते. मनुष्य नेहमीच सुखाच्या शोधात असतो. सुख मिळवणे हेच त्यांच्या जीवनातले एकमेव ध्येय असते! फक्त त्याचे प्रकार निरनिराळे असू शकतात. पण एखादेवेळी खाचखळगे पार करून संकटाशी झगडून सुख प्राप्त झाल्याच्या समाधानात आयुष्याची वाट चालत असावे आणि नेमके तेच खाचखळगे वेगळे रूप घेऊन वाटेत आडवे यावे. मग मनुष्य गडबडतो – भांबावतो! त्यातून दोन व्यक्ती जन्मभरासाठी एका सूत्राने बांधल्या जातात, तेव्हा त्यांची सुखदुःखे एकमेकांशी निगडीत असतात. अशाच एका गुंतागुंतीच्या प्रश्नाची उकल करणाऱ्या आशयाचे हे नाटक आहे.

श्रेयनामावली

लेखन – सौ. लीला फणसळकर
दिग्दर्शन – मनोहर जोशी

रंगभूषा – रामदास मोरे, केतकी जोशी
वेषभूषा – सौ. संगीता जोशी
वेशभूषा सहाय्य – सौ. अनुराधा जोशी
नेपथ्य – रामदास मोरे आणि सहकारी
रंगमंच व्यवस्था – अरुण मुळ्ये, प्रकाश जोशी, चेतन जोशी.
ध्वनिसंयोजन – अरुण जोशी
प्रकाशयोजना – शेखर मुळ्ये
पार्श्वसंगीत – निखिल जोशी
विशेष सहाय्य – सौ. श्वेता जोगळेकर,
श्री आदित्येश्वर प्रासादिक नाट्यमंडळ, वरवडे आणि खल्वायन, रत्नागिरी
सूत्रधार – सौ. संगीता जोशी

पात्रपरिचय
नर्मदा – सौ. नीता जोशी
कालिंदी – सौ. जाह्नवी जोशी
सरिता – सौ. धनश्री जोशी
शरयू – कुमारी अपूर्वा जोशी
यमुनाबाई – कुसारी प्राजक्ता जोशी
मंदाकिनी – सौ. शुभा जोशी

असे होते कालचे नाटक

कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघाने शुक्रवारी (दि. ९ डिसेंबर) मेलो, डोळो मारू गेलो हे नाटक सादर केले.

सुप्रसिद्ध नाटककार वस्त्रहरण फेम गंगाराम गवाणकर यांनी मेलो डोळो मारून गेलो हे नाटक लिहिले आहे. वस्त्रहरण नाटकाचे समीकरणच या नाटकात आहे. लोकशाही व्यवस्थेचा गैरवापर करून समाजव्यवस्था बिघडविणाऱ्या समाजकंटकांना लोकशाही कशी अद्दल घडवते आणि लोकशाही पुर्स्थापित होऊन समाजव्यवस्थेचा कसा विजय होतो, हे या नाटकात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

एका खेड्यातील एक भोळाभाबडा नाम्या देवळातल्या पुजारी सीताराम गुरवाच्या देखण्या बायकोच्या प्रेमात पडतो. याच गोष्टीचा फायदा राजकीय समीकरण बदलणारा सणकीदास बाबा घेतो. अनिष्ट गोष्ट लोकशाही मार्गाने किती योग्य आहेत, हे पटवण्याचा आटापिटा करतो. राजकारणात किती उलट्या काळजाची माणसे असतात आणि लोकशाहीची कशी विटंबना करतात, त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सणकीदास बाबा. नाटकाला थोडेसे राजकीय वळण आणि गंभीर स्वरूप असले तरी याला गवाणकरी पद्धतीने विनोदाची झालर आहे.

दोन अंकी नाटकात शेवट मात्र उरकण्यात आला आहे. लोकशाहीमध्ये काहीही होऊ शकते, हे दाखवण्यासाठी एखाद्या बाबाचा राजकारण्यांवरील प्रभाव, लोकशाहीत महत्त्वाचे अस्त्र ठरलेली आंदोलने घडविण्याची प्रक्रिया, बाबा ठरवतील तसे होणारे कार्यक्रम, लोकासमूहाच्या जोरावर अयोग्य गोष्टीही साध्य करण्याची किमया लोकशाहीमध्ये किती टोक गाठू शकते, पैसे फेकले की लोकही कसे वश होऊ शकतात आणि काहीही करायला कसे प्रवृत्त होता, असे दोष मांडण्यात आले आहेत. मात्र अखेरच्या टप्प्यात लोकशाहीमधील लोक जागृत झाले तर काय होऊ शकते, हा अत्यंत महत्त्वाचा प्रसंग अक्षरशः अत्यंत घाईघाईने उरकून टाकण्यात आला आहे. ज्या अनिष्ट बाबी चालतात, त्यांचे समर्थन करायचे आहे की, त्या अनिष्ट बाबींना लोकांनी एकत्र येऊन विरोध केला पाहिजे, असा संदेश द्यायचा आहे, हेच समजत नाही. सर्वच पात्रांचा अभिनय मात्र चांगला होता.

श्रेयनामावली
लेखक – गंगाराम गवाणकर
दिग्दर्शक – प्रसाद धोपट
पार्श्वसंगीत – अविनाश गावणकर
नेपथ्य – प्रवीण धुमक
प्रकाशयोजना – प्रतीक मेस्त्री
रंगभूषा – सचिन कुंभार
वेशभूषा – गार्गी सावंत, अमिषा देसाई
नृत्य – वृषाली पोळ

पात्रपरिचय
सावित्री – गार्गी सावंत
नाम्या – राहुल कासले
चंद्या – मनीष वरवडेकर
मावशी – दीपा माळकर
भाग्या – प्रतीक राजेशिर्केट
सीताराम – विष्णु घाणेकर
बाबा सणकीदास – प्रसाद धोपट
रूपा – अमिषा देसाई
मंदा – प्रीती देसाई
कांता – आकांक्षा भोईर
पत्रकार आणि इन्स्पेक्टर – अक्षय किंजळे
पत्रकार, हवालदार – सिद्धांत कांबळे
शांता – वृषाली पोळ
देवी – सिद्धी रहाटे
पत्रकार आणि तरुणी – रेश्मा मस्के
शिष्य – महेश गावणकर, अजित कांबळे, अक्षय थेराडे, दीपक गिरकर

…………………

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply