अलोरे (ता. चिपळूण) : माणूस राहू शकेल, असा पृथ्वी हा एकमेव ग्रह असून त्यावरील निसर्गाचे संरक्षण करण्याची सवय स्वतःपासूनच लावली पाहिजे, असा सल्ला बंगळूर येथील अभियंता आनंद सावंत यांनी दिला.

अलोरे (ता. चिपळूण) येथील परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित मोरेश्वर आत्माराम आगवेकर माध्यमिक विद्यालय व सीए वसंतराव लाड कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी श्रेणीयुक्त कार्यक्रमात ते सातवीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. श्री. सावंत अलोरे हायस्कूलचे माजी विद्यार्थी असून ते दहावीच्या गुणवत्ता यादीत दहावे स्थान मिळविले होते. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांनी निसर्ग, पर्यावरण आणि प्रदूषण हा विषय अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितला. ते म्हणाले, मी गेली दहा वर्षे विजेवरचे वाहन वापरत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डिझेल वाचले आहे. मी गाडीसाठी ८ लाख रुपये खर्च केले. या गाडीने मी दीड लाख किलोमीटरचा प्रवास केला. त्यासाठी ९ लाख रुपयांचे डिझेल वापरावे लागले असते. विजेवरच्या गाडीमुळे तेवढी रक्कम वाचलीच. पण प्रदूषणही झाले नाही. एकटा माणूस निसर्ग प्रदूषणमुक्त करू शकत नाही. पण प्रत्येकाने प्रदूषणमुक्तीसाठी स्वतःपासून प्रयत्न केले, तर निसर्गाचे संरक्षण होईल. आमच्या इमारतीमध्ये मी सोलर हिटरसाठी आग्रह धरला. त्यामुळे मी वर्षातील ३४० दिवस विजेचा गीझर वापरत नाही. अशाच पद्धतीने प्रत्येकाने प्रदूषणमुक्तीची सुरुवात आपणच केली पाहिजे.
लिव्ह ग्रीन, लव्ह ग्रीन आणि थिंक ग्रीन हा मंत्र म्हणताना तसा प्रयत्न केला पाहिजे, असे सांगून श्री. सावंत म्हणाले, पृथ्वीचा वापर माणसांबरोबरच प्राणी, पक्षीही करतात. त्यांचाही विचार केला पाहिजे. कर्नाटकातील टिपू सुलतानसारख्या राज्यकर्त्याने स्थलांतरित पक्ष्यांना संरक्षण दिले होते. राजेमहाराजांनी तर पक्षी, प्राण्यांना मारणाऱ्यांना फाशीपर्यंतची शिक्षा ठोठावली होती. म्हणूनच आपणही पक्षी, प्राण्यांची काळजी घेतली पाहिजे. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करायला शिकावे. कचरा कुजवला तर खत तयार होईल. प्लास्टिकसारख्या गोष्टींचे विघटन होत नाही. त्याचा वापर टाळावा. पॅसिफिक महासागरात जवळजवळ एक हजार किलोमीटर लांब आणि ७०० किलोमीटर रुंदीचा प्लास्टिकचा डोंगरच तयार झाला आहे. ते दूर करण्यासाठी यंत्रमानव तयार केले आहेत. आपण कचरा रस्त्यावरच नव्हे, तर समुद्रातही टाकयला सुरुवात केली आहे. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. याला आपण जबाबदार आहोत. म्हणूनच आपण निसर्गाला प्रदूषणमुक्त कसे करता येईल, याचा विचार करण्यापूर्वी निसर्ग समजून घ्यायला हवा आणि प्रदूषणमुक्तीसाठी आपण स्वतःपासून प्रयत्न करायला हवेत, असेही ते म्हणाले.

श्रेणीयुक्त कार्यक्रमात पाचवीतील विद्यार्थ्यांना गणिताशी मैत्री कशी करावी, याचा वस्तुपाठ माजी शिक्षका प्रज्ञा नरवणकर यांनी दिला. त्यांनी प्रामुख्याने शिष्यवृत्ती परीक्षेविषयी मार्गदर्शन केले. मूळ संख्या आणि संयुक्त संख्या याविषयीचा पाठ त्यांनी घेतला. छोट्या छोट्या प्रश्नातून त्यांनी या स्पर्धा परीक्षेतील गमतीजमती सांगितल्या. मुलांना काही प्रश्न घातले आणि ते सोडवून दिले. मुलांना त्या काळी पाटीवर रेषा काढून दिल्या जायच्या, अशी आठवण त्यांनी सांगितली. दोन संख्यांमध्ये स्वल्पविराम का असला पाहिजे, हे त्यांनी पटवून दिले. मूळ संख्या कोणत्या, २१ ते ३० दरम्यान मूळ संख्या किती, दरम्यान म्हणजे काय, अगदी छोटे छोटे शब्द आणि त्यांचे अर्थ त्यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, एक ही संख्या मूळ किंवा संयुक्त नाही. एक ते शंभर अंकांमध्ये २५ मूळ संख्या आहेत. २ ही सम संख्या असूनही ती मूळ संख्या आहे. ज्यात दोनचा क्रम असतो, अशा पाठोपाठ येणाऱ्या दोन मूळ संख्यांना जोड मूळ संख्या म्हणतात. ज्या संख्येतून १ आणि ती संख्या याशिवाय इतर कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जात नाही, त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. नरवणकर मॅडम मुलांसाठी चॉकलेट घेऊन आल्या होत्या. त्यामुळे त्यांची मुलांशी जवळीक साधली गेली.

आणखी एका श्रेणीयुक्त कार्यक्रमात माजी शिक्षिका चारुशीला मुकुंद जोशी स्मृतिविचार मंचावर मरीनर दिलीप भाटकर यांनी अकरावी-बारावीच्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वाणिज्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांना नाविक क्षेत्रात असंख्य संधी आहेत. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे, असे त्यांनी सूचित केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. मुले आणि मुलींनीही या क्षेत्रात आले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. आपला जीवनप्रवास, भल्या मोठ्या पगाराची नोकरी सोडून कोकणासाठीच आपण का आणि कसे आलो, विविध परीक्षा, समुद्रातील आव्हाने यांविषयी त्यांनी उत्तम माहिती दिली. नाविक क्षेत्राकडे विद्यार्थ्यांनी अवश्य वळले पाहिजे, अशी कळकळ त्यांनी व्यक्त केली.


