Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

मराठी भाषा अस्मिता (अष्टाक्षरी)

Advertisements

(मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने)

माय मराठीची शान
नाते हृदयी जुळवी,
अमृताचे स्वर तिचे
गीत मनात फुलवी!
भाषा मवाळ मराठी
हीच आमची संस्कृती,
छान भावव्यक्त होई
साथ देतसे प्रकृती!

साधी सोपी बोलीभाषा
सळसळे या रक्तात,
अभिमान निरंतर
प्रत्येकाच्या भावनात!

अलंकारी शृंगारिक
शब्द पुस्तकात गोड,
आस्वादही छान लागे
जणू आंब्याचीच फोड!

मायबोली ज्ञानभाषा
निरागस माणुसकी,
सर्वजगी ज्ञात झाले
तिची माया आपुलकी!

रामदास, ज्ञानेश्वर,
स्वामी, संत हे महंत,
तुकाराम, नामदेव
त्यांचे अभंग अनंत!

सुविचार सर्वजनी
मुक्ताबाई, जनाबाई,
जागृतीचा नारा दिला
लक्ष्मीबाई, मीराबाई!

जुन्या रूढी-परंपरा
भाषा शुद्ध सांस्कृतिक,
झटणाऱ्या मावळ्यांचे
स्वराज्याचे ते प्रतीक!

शूर, योद्धे, संतांसंगे
नेते, महात्मे, घडले,
शिवाजींचा इतिहास
शत्रू युद्धात हरले!

जिजामाता, रमाईंचे
अनमोल उपकार,
सावित्रीच्या लेकींनाही
शिक्षणाचा अधिकार!

संविधान शिल्पकार
मान आंबेडकरांचा,
पहिलाच प्रदर्शित
चित्रपट फाळक्यांचा!

राष्ट्रपती स्त्री-प्रधान
मान मिळे प्रतिभाला,
रसिकांनी दाद दिली
माधुरीच्या सौंदर्याला!

नाळ मराठी भाषेची
जोडलेली वाङ्मयाशी,
ग्रंथ, लेख, निबंधाच्या
लिहिलेल्या साहित्याशी!

अत्रे, साठे, देशपांडे
साहित्याचा अलंकार,
इंदिरांच्या काव्यवेली
शब्दरूपी चमत्कार!

श्रेष्ठ लेखन संपत्ती
शांता, शिरवाडकर,
एकमेव परिचित
साने, माडगूळकर!

सचिनने खेळामध्ये
पराक्रम घडवला,
लतेलाही गायनात
छान सूर गवसला!

गाव, शहर, तालुका,
जिल्ह्यातही प्रचलित,
माझ्या भाषेचे कौतुक
सर्व जगी प्रसारित!

घाटी, कोकणी, वऱ्हाडी
मालवणी मुख्य छबी,
भिन्न गाव, भिन्न भाषा
कोळी, आगरी, कुणबी!

सर्वजण होती एक
मराठीचा अभिमान,
जयघोष दाही दिशा
वाढे राष्ट्राचीही शान!

शरीरात येई बळ
वाजताना ती तुतारी,
मराठीच्या अस्मिताने
उंच घेतली भरारी!

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version