मराठीच्या संवर्धनासाठी रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाची प्रावीण्य परीक्षा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा (नगर) वाचनालयातर्फे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी दरवर्षी चार गटांमध्ये मराठी प्रावीण्य परीक्षा घेणार आहे, अशी घोषणा वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने केली.

श्री. पटवर्धन म्हणाले, आज मराठी भाषा गौरव दिन आहे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. मराठी भाषेची थोरवी, वैशिष्ट्य, विविध वाङ्मय प्रकार, आपले संस्कार प्रसारित व्हावेत, मराठी भाषेची थोरवी जागृत राहावी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा भाषेचा प्रसार आणि प्रभाव वाढता राहावा, या उद्देशाने पुढे जाण्याची प्रेरणा मिळावी म्हणून प्रतिभावंत मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण साजरा करतो. मराठी भाषा संवर्धनामध्ये वाचनालयांचे दायित्व अधिक आहे. कारण मराठी साहित्य संपदा वाचनालयात नांदत असते. स्वाभाविकपणे आपल्या मातृभाषेच्या थोरवीचा प्रसार व्हावा, मराठी भाषेचा दर्जा अधिक समृद्ध व्हावा यासाठी योगदान करण्याचा आजचा संकल्प दिवस आहे. आजचा दिवस साजरा करतानाच मातृभाषेच्या प्रसारासाठी मराठी भाषेतील साहित्य संपदा, त्यातील विचार, संदर्भ अधिक प्रभावी करण्यासाठी, मराठी भाषेतील दर्जेदार साहित्याचा प्रसार सातत्याने व्हावा, यासाठी प्रतिवर्षी नगर वाचनालय मराठी साहित्यातील निवडक पुस्तके, दर्जेदार पुस्तके अभ्यासक्रमासाठी ठरवून चार गटांमध्ये मराठी भाषेतील १०० गुणांची परीक्षा दरवर्षी घेणार आहे.

शालेय विद्यार्थी गट, माध्यमिक विद्यार्थी गट, महाविद्यालयीन गट आणि खुला गट अशा चार गटांमध्ये प्रावीण्य परीक्षा घेण्यात येईल. परीक्षांचे नियोजन करण्यासाठी पाच भाषा तज्ज्ञांचे मंडळ तयार केले जाईल. त्यांच्या दिशानिर्देशनाखाली परीक्षेबाबत योजना आखली जाईल. परीक्षेच्या तयारीसाठी चार पुस्तके निर्दिष्ट केली जातील. पुस्तकांच्या संदर्भाने पुस्तक परीक्षण, पुस्तकातील विषय संदर्भाने परिसंवाद, चर्चासत्र, व्याख्याने असे कार्यक्रम वाचनालयात करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असताना मराठी भाषेतील उत्कृष्ट साहित्य अधिक प्रसारित व्हावे, त्याचा अभ्यास व्हावा, त्यात प्रावीण्य प्राप्त व्हावे यासाठी रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचा प्रयत्न आहे. मराठी भाषेत प्रतिभेचा आविष्कार सातत्याने जाणवतो, आलंकारिक भाषा मराठी भाषेचे सौंदर्य अधिक खुलवत नेते. साधा-सोपा रांगडा शब्द आविष्कार येथील निसर्गाच्या कुशीत वसलेली संस्कृती अधोरेखित करते. अशा आपल्या मायबोलीच्या अविरत प्रसारासाठी रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय मराठी प्रावीण्य परीक्षा उपक्रम राबविणार आहे.

श्री. पटवर्धन म्हणाले, येत्या १५ मार्चपर्यंत परीक्षेची प्रवेश पद्धती घोषित केली जाईल. या उपक्रमात अन्य साहित्यिक संस्था तसेच अन्य वाचनालयांनाही समाविष्ट करून घेण्याचा मनोदय वाचनालयाचा आहे. मातृभाषा प्रसारा संदर्भाने चे काम अविरत सुरू राहावे मराठी भाषेतील उत्तमोत्तम साहित्य सातत्याने वाचनात राहावे त्याचा प्रचार व प्रसार व्हावा त्यातून मराठी भाषा अधिक समृद्ध व्हावी यासाठी या हा उपक्रम. मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाने घोषित केला आहे. परीक्षेमध्ये सर्वोत्तम गुण प्राप्त करणाऱ्या प्रत्येक गटातील परीक्षार्थींना मराठी साहित्य विश्वातील दिग्गजांना निमंत्रित करून त्यांच्या हस्ते विशेष पुरस्कार दिले जातील.

या उपक्रमात अधिकाधिक मातृभाषा प्रेमींनी सहभागी होऊन रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या मराठी भाषा संवर्धनाच्या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन अॅड. पटवर्धन यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply