तुका म्हणे : दंभाचे बुरखे फाडणारं नाटक

साठावी राज्य हौशी नाट्य स्पर्धा : रत्नागिरी केंद्र : पाचवा दिवस

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे हौशी राज्य नाट्य स्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षी साठावी म्हणजे हीरक महोत्सवी स्पर्धा २१ फेब्रुवारीला सुरू झाली आहे. या स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात प्राथमिक फेरीतील नाटके २२ फेब्रुवारीपासून सादर होत आहेत. २६ फेब्रुवारीला सादर झालेल्या ‘तुका म्हणे’ या नाटकाचा हा परिचय… (नाटकातील एका प्रसंगाचा व्हिडिओ शेवटी दिला आहे.)

वारकऱ्याचं घर, एका वडीलधाऱ्या वारकऱ्याचं निधन झालंय, स्त्रीपुरुष शोक करता आहेत, त्यांच्या पत्नी माई बोलत नाहीत, त्यांनी बोलावं यासाठी सर्वांची धडपड. जवळ बेहोष पडलेल्या दारूड्याला उठवून घालवून लावतात. अभंगाचं गायन चालू आहे. अंत्ययात्रेचं साहित्य आणायला कोणीतरी गेलंय. अधूनमधून रडारड.

आमदार येतात, आधी रडतात, मग सावरून विचारपूस करतात. मघाशी घालवून दिला तो त्यांचा मुलगा, अग्नी द्यायला तो पाहिजे. तो आलेला नाही, त्याची वाट पाहत आहेत, दोघे येतात, त्याच्या हातात दारूची बाटली आहे म्हणून सांगतात. शेवटी एक महिला स्वतः आणायला जाते. पोलीस येतात, पाहणी करतात. तुका (मुलगा) याने लेखी अर्ज दिलाय, पोस्टमार्टेम झाल्याशिवाय अंत्यसंस्कार करू नये.

लोक चिडतात, तुका बेवडा, त्याचं काय ऐकता? पोलीस कर्तव्य करू पाहतात. आमदार पोलिसांना समजावतात. सहा महिन्यांवर निवडणूक आलीय. मृतदेह उचलू पाहतात, एक बाई (शारदा) पोलिसांचे पाय धरते, वाचवा, माझ्या मुलीला वाचवा, माझं घर वाचवा. (प्रवेश संपतो)

रात्रीची वेळ. आमदाराच्या घरासमोर लोकांचा जमाव, सोन्याच्या मूर्ती चोरीला गेल्यात. त्याला आमच्या हवाली करा, कीर्तनकार येतात, लोक शांत, पळून गेलेल्याला सोडून निरपराध व्यक्तीला शासन करता? (चोरी करणारा शरदेचा नवरा होता असं म्हणतात.)

लोक म्हणतात, “देवळात देव नाही, मशिदीसारखं वाटतंय,
अरे, चांगलं आहे की, काय फरक? इथे तो विटेवर उभा आहे, तिथे तो विटेवरून उतरून वाळवंटात गेलाय. तिथेही चंद्रकोर आहे, इथे चंद्रभागा वाहते.” असं पांडित्य, अशी उदार दृष्टी, त्यामुळे लोक त्यांना देव मानू लागले.

पुन्हा मघाचं दृश्य. विंगेतून बाई तुक्याला पट्ट्यानं मारत आणते. तो अभंग आणि प्रवचन सांगू लागतो. “थोडक्यात आमच्या आईचा नवरा गेलाय, म्हणून मला इथे मारत मारत आणलंय. डोळ्यांत पाणी नसेल तर आणावं….. या.” दारूड्या मित्रांना बोलावतो. लोक चिडतात. एक वारकरी मध्ये पडतो.

दारूड्या तुका पोलीस अधिकाऱ्यांशी बोलू लागतो. इन्स्पेक्टर मोरे ….. तुका शिकलेला आहे, मेडिकलची दोन वर्षं झालीत, पोस्टमार्टेम करणार ना ? बोलता बोलता तिरडीवर झोपतो. मंडळी दादापुता करतात,
तुका- आता आला निवाड्याचा दिस…
नाही देणार मी अग्नी, (आईला) एवढा गोतावळा आहे ना? मला हाकलून दिलं तेव्हा कोण होतं माझ्यासोबत?
आईला आठवण सांगतो, निपचित पडला होता, वडिलांनी मांडीवर घेऊन थोपटलं, शुद्धीवर आला ….वडील चमत्कार करणारे म्हणून प्रसिद्ध.
पुन्हा उचलण्याची तयारी, “तुका, अग्नी दे आणि हो मोकळा.” “पीएम कुठं झालंय? ते होऊद्या, मग द्या अग्नी.”
आईच्या मांडीवर डोकं ठेवतो, आई समजूत घालते. “आई, तुलाही वाटतं मी वेडा झालोय? आई, तुला किती रंग आवडायचे? लाल, निळा, पिवळा ….”
“नाही, मला कधीच रंग आवडत नव्हते” ती अस्वस्थ होते, याला घेऊन जा, जातात…. अंत्यसंस्कार सुरू, न्हाऊ घालणं वगैरे….
अभंग-
“आता या हो माझे मायबहिणी ….
कंठी घालावी हो तुळशीची माळ।।”
तुका येतो, पुन्हा बाचाबाची, तो शारदाला वारंवार म्हणतो, “नवरा मेलाय तुझा, कुंकू लावू नको.” ती संतापते. तुका आत जाऊन कुदळीने खोदतो, मानवी सांगाडा बाहेर निघतो. शारदेला म्हणतो, “ओळख पटते का? उजवा पाय नीट बघ.” ती नाकारते. आमदार येतात. “ती दुसऱ्या कुणाला आपला नवरा कसा म्हणेल?” “मग हा सापळा इथे कसा?” तुकाचा बिनतोड प्रश्न. पंचनामा होतो. सापळा लॅबमध्ये पाठवण्यासाठी घेऊन जातात. आमदार त्याला समजावतात, “बोल, मोकळा हो, पोस्टमार्टेमचं खूळ तेवढं डोक्यातून काढून टाक.”
“मोकळं आपल्या माणसांसमोर होता येतं, एकटा पडलोय.”
बापाचे शब्द आठवतात – “त्याला कुशीत घेऊन झोपवू नको, हॉस्टेलमध्ये पाठवायचंय. कठोर व्हायचंय त्याला, पेशंटचे अश्रू बघून त्याला दुःख होता कामा नये, माझ्यासारखा दरिद्री राहायचं नाही. …. “
त्याची आई मन मारून राहिलीय,
आई धावत येते, “तू एकटा नाहीस, काय करू तुझ्यासाठी म्हणजे तुला एकटं वाटणार नाही?”
“व्यक्त हो, आपल्या जिवंत असण्याची खूण.”
“आई, माझ्या डोळ्याxत बघ, काय दिसतंय?”
“नवरात्राची पहिली माळ, अजून काय दिसतंय?”
ती किंचाळते, फ्लॅशबॅक- त्याचं लहानपण दाखवणारं दृश्य. त्याला चित्रं काढायला आवडतात, पण हे बोलायचं नाही, नाहीतर चटके. आईला चित्र दाखवतो. “नको रे बाळा अशी सुन्दर चित्र काढत जाऊ, तुलाही मार मिळेल, मलाही.”
इतक्यात हभप म्हणून प्रसिद्ध असलेला, ज्याचा मुडदा आता उचलतात केव्हा त्याची वाट पाहतोय, तो बाप येतो, “बघू, काय काढलंस? चित्र का काढलंस?” मारतो. “या हाताने चित्रं काढायची नाहीत, ऑपरेशन करायचीत” हा नखरा.. (हिरवी साडी) मारझोड, (बाहेर सत्पुरुष) साडी फेडतो “आता नऊ दिवस असंच बसायचं, विवस्त्र….!”
दसऱ्याचा दिवस, पांढरी साडी घेऊन येतो, आत फेकतो, “नेस, रांडे, नेस! नवरा घरात नसताना नटायला आवडतं ना? मरेपर्यंत पांढरी साडीच नेसायची.” प्रेक्षकांच्या अंगावर काटा. खरंच असतील अशी माणसं?
पोलीस अधिकारी तुकाला मर्डर प्लॅनबद्दल चौकीत नेण्याची तयारी करतो. “संशयित आरोपी म्हणून तुम्हाला अटक करतो,” आई मध्ये पडते. “मला माहिती आहे, खून कोणी केला.”
पुन्हा फ्लॅशबॅक – बुवांचं घर, एक भाविक येतो, “माऊली, दर्शन द्या माऊली” मृदंग वाजवू लागतो. बुवा आतून येतो, सुवर्णमूर्ती नेण्याच्या कार्यक्रमाचं वेळापत्रक भाविक वाचून दाखवतो. सुवर्णलेप देण्याच्या निमित्ताने (पत्नी आतून ऐकते) पांडुरंगाच्या मूर्ती द्या आणि निघा.
सुवर्णमूर्ती लेप देण्यासाठी ताब्यात दिल्या, त्या त्यांनी स्वतःकडे ठेवल्या, मृदंग्याने या कामात साथ दिली असा दृष्टांत (कथा) देतो, तो प्रामाणिक माणूस काय ते समजतो.
“जगी कीर्ती व्हावी म्हणून झालास गोसावी” या शब्दांत निर्भर्त्सना करतो. बुवा त्याचा गळा धरतो, “तू मृदंगचारी आहेस, तुझं कोण ऐकणार? मी हभप, लोक माझ्यावर विश्वास ठेवतील.” गळा दाबतो. पत्नी दारातून बघते. मुलगा मध्येच येतो, प्रसंग बघून दप्तर घेऊन जातो. बुवा घाबरतो. दारात पत्नी, तिला गप्प राहण्याची खूण करतो. ही सगळी हकीकत ती आता पोलिसांना सांगते. मंचावर शांतता. सत्य कळल्याने शरदेला दुःख अनावर.
“माफ करा ग्रामस्थांनो, मी तुमच्या भावना दुखावल्या. यांची विकृती, आईला दिलेला त्रास … यावर एकच उपाय, लोकांना सत्य सांगायचं, पण हेटाळणी केली माझी.”
“आयुष्यभर हभपचा बुरखा पांघरून तुमच्यात वावरला हा माणूस. ना हभप, ना पती, ना बाप, फक्त उत्तम बोलता यायचं.”
बुवांचं खरं रूप कळल्यावर वारकरी दुःखी होतात, एकेकजण जातो. त्यांच्यातील कारभारी तात्या भिंतीवर लावलेली बुवाची तसबीर काढून आपटून फोडतो, आमदार जातो. पोलीस आणि तो उरतात, “द्या सही करतो,” पोलीस अधिकारी कागद देतो, “या कोऱ्या कागदावर काय लिहायचं ते लिहा” मित्र दारू घेऊन येतात. “नको, गरज नाही उरली, तयारी करा, देतो मी अग्नी.”
आईला हाक मारतो, ती लाल साडी शृंगार करून बाहेर येते, नवऱ्याच्या खोलीत जाते. “उठ, बघ, मी नवी साडी नेसून आले, चटके दे माझ्या शरीरावर, उपभोग घे आणि मग अंगावर थुंक.” संतप्त विलाप. मुडद्याला चपलेने मारते आणि दुःख व संतापाने रडू लागते. पडदा पडतो.
गावडे आंबेरे येथील शिक्षण प्रसारक प्रसारक मंडळाने हे नाटक निर्मिलं होतं. लेखन राम दौंड यांचं, तर दिग्दर्शन संतोष सारंग यांचं होतं. संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी आशुतोष वाघमारे यांनी सांभाळली.

  • राजेंद्रप्रसाद मसुरकर, रत्नागिरी (९९६०२४५६०१)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply