रत्नागिरी : मराठी भाषा गौरव दिनाचे निमित्त साधून रत्नागिरीत पोलीस संचलन मैदानावर आज सामूहिक राज्य गीत गायन झाले. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा मराठी भाषा समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ गीताच्या या सामूहिक गायनाला जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत दूरदृश्य प्रणालीने उपस्थित होते.
ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस आज राज्यात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने राज्यगीत गायनाच्या उत्तम उपक्रमाने मराठी भाषा दिनाची सुरुवात आज झाली. हीच कुसुमाग्रजांना खऱ्या अर्थाने अर्पिलेली आदरांजली आहे, असे प्रतिपादन श्री. सामंत यांनी यावेळी केले. राज्यगीत गायन तसेच अन्य कार्यक्रमांचे आयोजन उत्तमरीत्या केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासन, कार्यक्रमामध्ये सहभागी शाळा आणि महाविद्यालयांचे शिक्षक व विद्यार्थी यांचे कौतुक केले.
यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह म्हणाले की, अत्यंत कमी कालावधीमध्ये या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन करण्यात आले. राज्यात १९ फेब्रुवारी रोजी राज्यगीताची घोषणा करण्यात आली आणि यापुढे प्रत्येक कार्यक्रमात राज्यगीत गायन होणार आहे. आज जिल्ह्यातील ३ हजार ११२ शाळांमध्ये अंदाजे दोन लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी राज्यगीत गायले.
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले की, मराठी भाषेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मराठी भाषा दोन हजार वर्षे जुनी आहे. विविध प्रकारच्या साहित्याचा इतिहास मराठी भाषेमध्ये आहे. मराठी भाषा ही भारतातील तिसरी तर जगातील पंधरावी भाषा आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती भव्यदिव्य आहे, असे सांगून त्यांनी मराठी भाषा गैारव दिनामित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी रा. भा. शिर्के प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी पोवाडा, फाटक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य आणि विविध ढोलपथकांचे ढोलवादन सादर केले. फाटक हायस्कूलच्या शिक्षकांनी यावेळी मराठी अभिमान गीत सादर केले.
कार्यक्रमाला नागरिकांसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी, शाळा-महाविद्यालयांचे शिक्षक, विद्यार्थी असे जवळपास पाच हजाराहून जास्त नागरिक उपस्थित होते.


मराठी भाषेचा सर्वत्र वापर करणे गरजेचे : शुभांगी साठे
मराठी भाषा ही आपली बोली भाषा असून या भाषेबद्दल आपल्याला अभिमान असणे तसेच आपण सर्वांनी मराठी भाषेचा वापर सर्वत्र करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी तथा जिल्हा मराठी भाषा समिती सदस्य सचिव शुभांगी साठे यांनी आज मालगुंड येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा मराठी भाषा समिती आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारकात मराठी भाषा गौरव दिन आणि कुसुमाग्रज जयंती साजरी झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, तिचा प्रचार, प्रसार व्हावा, या उद्देशाने जिल्हा मराठी भाषा समितीची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून वाचन प्रेरणा दिन, मराठी भाषा पंधरवडा असे उपक्रम राबविण्यात येत आहेत. मराठी भाषा संवर्धनाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थित असलेल्या स्पर्धकांना त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
अरुण मोर्ये यांनी लिहिलेल्या काव्यसंग्रहाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने कवी केशवसुत स्मारकात मराठी भाषेचे संवर्धन आणि शासनाची भूमिका या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मराठी भाषा संर्वधनासाठी लोककला यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धात्मक स्वरूपात पार पडला. त्यामध्ये पोवाडे, भारुडे, गोंधळ आदी लोककलांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा मराठी भाषा समिती सदस्य गजानन पाटील यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी आणि मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचा उद्देश सांगितला.
यावेळी तहसीलदार (सर्वसाधारण) हनुमंत म्हेत्रे, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालगुंड शाखा अध्यक्षा नलिनी ख्रेर आदी मान्यवर उपस्थित होते.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

