‘वानर आणि केल्ड्यांवर उपाय काढा, कोकण समृद्ध होयल’

रत्नागिरी : वानर आणि केल्ड्यांवर उपाय काढा,कोकण समृद्ध होयल, अशा संगमेश्वरी बोलीतील खणखणीत शब्दांत या वन्य प्राण्यांच्या उपद्रवाची कथा आणि शेतकऱ्यांची व्यथा लोककलाकार सचिन काळे यांनी मांडली.

वानर आणि माकडांनी उच्छाद मांडल्यामुळे कोकणातील शेतीबागायतीची कशी दुर्दशा झाली आहे, याचे खुमासदार वर्णन संगमेश्वरी बोलीतील लोककलाकार सचिन काळे यांनी केले आणि सिंधुरत्न योजना समितीचे सदस्य प्रमोद जठार यांच्यासह सर्व सभागृहालाच हसू आवरले नाही, पण या विनोदाला कोकणातील शेतकऱ्यांच्या व्यथेची दुःखभरली किनार होती.

रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेने आयोजित केलेली पाचवी शाश्वत पर्यटन परिषद रत्नागिरीत मारुती मंदिर येथील विवा एक्झिक्यूटिव्ह हॉटेलमध्ये पार पडली. राज्य शासनाच्या सिंधुरत्न समृद्धी योजनेच्या कार्यकारी समितीचे विशेष निमंत्रित सदस्य आणि माजी आमदार प्रमोद जठार यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद पार पडली. परिषदेत पर्यटनाच्या विकासासंदर्भातील विविध मुद्दे मांडले गेले, पण संपन्न असलेल्या कोकणाच्या निसर्गाचे वैशिष्ट्य टिकवून ठेवण्यासाठी आंबा, नारळ आणि अन्य कोकणाची ओळख असलेली पिके घेणे वानर आणि माकडांच्या उच्छादामुळे किती कठीण झाले आहे, याची मांडणी मोजक्या शब्दांत सचिन काळे यांनी अत्यंत प्रभावपणे केली. संगमेश्वरी बोलीतूनच शेतकऱ्यांच्या या व्यथा मांडल्यामुळे शेतकऱ्यांच्या दुःखाचा योग्य तो परिणाम साधला गेला. वानर आणि माकडांमुळे नेमके कोणते नुकसान होते, याचे चित्र श्री. काळे यांनी रेखाटले. त्याला विनोदाची झालर असल्यामुळे हास्याची कारंजी फुलत होती, पण कोकणातील शेतकरी वानर आणि माकडांच्या उपद्रवामुळे किती हैराण झाला आहे, याचे नेमके चित्रही त्यामुळे उभे राहिले. कोकणाचे नैसर्गिक सौंदर्य टिकवायचे असेल तर शेतीबागायती टिकविली गेली पाहिजे, पण मोठ्या मेहनतीने केलेली शेती आणि बागायती वानरांमुळे नष्ट होत असेल, तर पुढच्या काळात पर्यटनाचा पाया मानली गेलेली शेतीबागायती कोकणात दिसणारच नाही, अशी भीती श्री. काळे यांनी यानिमित्ताने व्यक्त केली. वानर आणि माकडांचा उपद्रव थांबण्यासाठी त्यांना मारण्याशिवाय पर्याय नाही, असा टोकाचा उपायही त्यांनी सुचविला पण शेतकऱ्यांच्या दुःखाचा त्रागा त्यातून व्यक्त झाला. वानर आणि माकडांचा उपद्रव ही हसण्यावारी नेण्यासारखी बाब नाही. त्यावर खरोखरी योग्य ते उपाय योजले गेले पाहिजेत, असेच श्री. काळे यांनी सुचविले.

माजी आमदार प्रमोद जठार यांनी मुद्द्याची नोंद घेतली. आता शासन स्तरावर वानर आणि माकडांचा उपद्रव थांबण्यासाठी कोणता उपाय योजला जातो, ते जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply