रत्नागिरी : रत्नागिरीतील नाट्यकर्मी आणि भिक्षुकी व्यवसाय करणारे संतोष ऊर्फ छोटू दामले यांच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी रत्नागिरीचे आमदार आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी मदतीचा पहिला हात दिला आहे.
कोकणातील प्रत्येक माणूस नाट्यवेडा आहे. संगीत, नृत्य, नाट्य या लाल मातीतच रुजलेले आहे. संतोष सुहास दामले हेही अशाच अनेक हौशी रंगकर्मींमधील एक नाव असून त्याला त्याला छोटूदादाच म्हणतात. सदैव प्रसन्न चेहऱ्याचा नम्र कलाकार, अशी त्याची ख्याती आहे. याच छोटूदादावर हृदय शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. सध्या त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पुढील आठवड्यात शस्त्रक्रिया होणार असून त्याकरिता सुमारे किमान आठ लाखाचा खर्च अपेक्षित आहे. संतोषच्या शस्त्रक्रियेचा खर्च मोठा असल्याने प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला, तर सेतुबांधकाम नक्कीच होईल, अशी कल्पना नाट्यकर्मी हेरंब जोगळेकर, वामन जोग, श्रीनिवास जोशी, गणेश जोशी, कैलास खरे, निखिल रानडे, श्रीधर पाटणकर, व्यावसायिक अनंत आगाशे, राजेंद्र पटवर्धन आणि पौरोहित्य करणारे बावा पाटणकर यांनी मांडली. आपण सारे एका कुटुंबाचा भाग आहोत, या भावनेतून या सर्वांनी आपल्या मित्रमंडळींना मदतीचे आवाहन केले. त्या आवाहनाला अनेकांनी उत्तम प्रतिसादही दिला. याबाबतची माहिती रत्नागिरीचे आमदार, पालकमंत्री, उद्योगमंत्री तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष उदय सामंत यांना समजताच त्यांनी संतोष दामले या हौशी रंगकर्मीसाठी तातडीन आर्थिक मदतीचा हात दिला. राज्यकर्ते म्हणून जनतेचे प्रश्न सोडवताना ते अतिशय तत्पर असतात. नाट्य परिषदेचे काम करताना मध्यमवर्गीय कलाकारांना सोबत घेऊन जात असतात. आजदेखील त्यांनी केवळ माणुसकीच्या नात्याने मदत केली. याचा आम्हा सर्व नाट्यकर्मी, रंगकर्मी आणि कलाकारांना साभिमान आदर वाटतो, अशा शब्दांत त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
मदतीचे आवाहन
दरम्यान, संतोषच्या हृदयाचा एक व्हॉल्व्ह तातडीने बदलावा लागणार असून त्याला पुण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शस्त्रक्रियेसाठी होणारा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. अनेक सर्वसामान्य लोकर एकत्र आले की ते असामान्य कार्य करू शकतात, याची प्रचीती देणारी ही घटना आहे. त्याच न्यायाने खर्चाची रक्कम मोठी असल्याने शक्य असेल, त्या सर्वांनी मदत म्हणून संतोष दामले आणि त्यांचे वडील सुहास दिनकर दामले यांच्या 9420119231या संयुक्त खात्याच्या जीपे मोबाइल क्रमांकावर थेट मदत पाठवावी, असे आवाहन श्री. दामले यांच्या मित्रपरिवाराने केले आहे. आपण पाठविलेल्या रकमेचा आकडा, आपले नाव, मोबाइल क्रमांक वामन जोग यांच्या 9881125608 या क्रमांकावर कळवावा, असे सूचित करण्यात आले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

