सत्यवान रेडकर यांचे देवरूखला मोफत स्पर्धा परीक्षा व्याख्याने

देवरूख : प्रसिद्ध युवा व्याख्याता आणि सीमाशुल्क अधिकारी सत्यवान यशवंत रेडकर येत्या ७ एप्रिल रोजी देवरूख येथे दोन मोफत स्पर्धा परीक्षा व्याख्याने देणार आहेत.

स्पर्धा परीक्षांसंदर्भात संपूर्ण कोकण तसेच महाराष्ट्रात ठिकठिकाणा व्याख्याने देणारे, शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव निर्माण करण्यासाठी अविरत ज्ञानदान करणारे, कोकण भूमिपुत्र श्री. रेडकर रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना देवरूख येथे दोन मोफत व्याख्याने देणार आहेत. शुक्रवार, ७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये, सप्रे, पित्रे महाविद्यालयात आणि त्याच दिवशी सकाळी ११.३० वाजता देवरूखजवळच्या आंबव येथील राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये त्यांचे व्याख्यान होईल.

जास्तीत जास्त विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. रेडकर यांनी केले आहे.

…………..

`तिमिरातुनी तेजाकडे` चळवळ कशासाठी?

बर्‍याच लोकांचा माझो गाव, माझो कोकण असा स्टेटस असतो. सर्वांना साहजिकच आपल्या गावाचा, जिल्ह्याचा अभिमानच आहे. सत्यवान यशवंत रेडकर हेेही त्यापैकीच एक. पण त्यांचे वेगळेपण म्हणजे महाराष्ट्रात आणि मुख्यत्वे कोकणातील `तिमिरातुनी तेजाकडे` या प्रशासकीय स्वराज्य किंवा शासकीय कर्मचार्‍यांचे गाव` घडविण्यासाठी असलेल्या एकमेव शैक्षणिक चळवळीचे ते प्रणेते आहेत.

…..

माझे मूळ गाव मु. पो. कवठणी (बोरभाटवाडी), ता. सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग. मी नेहमी मला कोकणचा भूमिपुत्र म्हणूनच संबोधतो. वर्तमानपत्रात नेहमीच बातम्या येत असतात, मीडियावर व्हिडीओ किंवा विविध अपडेटस असतात. गुगललासुद्धा नाव सर्च करा, सर्व माहिती मिळेल. आधी फक्त सावंतवाडी आणि मुंबईतील माझे घर डोंबिवली एवढाच संबंध होता, परंतु आता विस्तार संपूर्ण कोकण प्रांतात झाला. रम्य दिवसांच्या बाबतीत अनेक आठवणी असतील, परंतु माझ्या बाबतीत इथे फक्त माझा गाव, कोकणातील पर्यटन, प्रेक्षणीय स्थळ, एखाद्या उत्सवासंदर्भातील आठवणी नाहीत तर निरंतर करीत असलेल्या तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीच्या अनुषंगाने संपूर्ण कोकणासंदर्भातील बर्‍याच आठवणी आहेत. शैक्षणिक विषयासंदर्भातील दिवस रम्य कसे असतील, हा प्रश्न आपल्याला नक्कीच पडला असेल तर या गोष्टीचा उलगडा आणि महत्त्व आपल्याला हळू हळू होऊ लागेल.

मुळात बीकॉम झाल्यानंतर कशीबशी खासगी नोकरी मिळाली. गावी गणपती किंवा उन्हाळ्याची सुट्टी. त्यासोबत वार्षिक जत्रोत्सव एवढाच संबंध. कमी टक्केवारी मिळाल्यानंतर बर्‍याच लोकांनी सांगितले की तुला मॉलमध्येसुद्धा नोकरी मिळणार नाही. याची प्रचीती आलीसुद्धा. दीड महिना वणवण करीत नोकरी मिळवली. त्यानंतर प्रयत्न केले आणि भारत सरकारच्या आई.आई.टी., मुंबईमध्ये कनिष्ठ प्रशासनिक सहायक पदावर रुजू झालो. शिक्षणातसुद्धा निरंतरता ठेवली आणि आज वय ३५ वर्षे परंतु B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB , PGDHRM, PGDLL & IR, PGDT, M.A (TRANSLATION STUDIES) अशा प्रकारे निरंतरता आहे. २०१७ मध्ये अखिल भारतीय स्तरावर कर्मचारी चयन आयोग म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत ३२३ उमेदवारांमध्ये १६६ व्या क्रमांकावर निवड होऊन मुंबई सीमाशुल्क म्हणजेच मुंबई कस्टम्स या भारत सरकारच्या सेवेत रुजू झालो. त्या परीक्षेत महाराष्ट्रातील दोन आणि कोकणातून मी एकमेव उमेदवार. अभिमान आहे या गोष्टीचा आणि कायम राहील. कोकणात परंपरा नसावी की गांभीर्य नसावे, परंतु कधीही या घवघवीत यशाची वाच्यता सावंतवाडी तालुक्यातसुद्धा नव्हती. वर्तमानपत्रातसुद्धा बातमी आली नव्हती. आता तर माझ्या बातम्या नेहमीच येत असतात.

जवळपास दहा वर्षांच्या कालावधीत आपल्या कोकणासाठी विशेष आणि जगावेगळे काहीतरी करायला हवे, परंतु नेमके कसे, कधी आणि कुठुन सुरुवात करायची, हा मोठा प्रश्न. आपल्यासारखे किंवा आपल्यापेक्षासुद्धा चांगल्या स्तरावर अधिकारी-कर्मचारी निर्माण व्हायला हवेत, यासाठी योजना सुरू होती. शेवटी काहीतरी जगावेगळे करण्याचा आत्मविश्वाससुद्धा होता. शैक्षणिक समाजप्रबोधन करण्याचे ठरले. जाणकारांनी नकारात्मक घंटा वाजवली. बर्‍याच लोकांनी उदासीनता दाखवली. कमी लेखले, दुर्लक्ष केले, परंतु सुरुवातीला हा प्रवास सावंतवाडी तालुक्यातील माझ्या कवठणी या गावातून सुरू झाला आणि शासकीय स्पर्धा परीक्षांसंदर्भात मार्गदर्शनाचे श्रीफळ फोडण्यात आले. एक मोठा आराखडा तयार केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग ते वैभववाडी या आठही तालुक्यांमध्ये फेब्रुवारी २०२१ मध्ये सिंधुदुर्ग मुख्याध्यापक संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासमवेत जवळपास प्रत्येक तालुक्यात एका दिवसात ३ याप्रमाणे सलग ८ दिवसांत २४ व्याख्यानांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. हे मार्गदर्शन निःशुल्क बरे का! प्रवास भत्तासुद्धा मी घेत नाही. त्यात करोनाचे थैमानसुद्धा होतेच. वडिलांना सुखद धक्का देण्याचे मी ठरवले होते, परंतु जानेवारी २०२१ मध्ये हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. शोकाकुल मनःस्थितीत होतो, परंतु मन घट्ट करून आणि शोक व्यक्त करत न बसता वडिलांना इच्छापूर्ती स्वरूपात आदरांजली वाहण्याचे ठरविले. ज्या मातीत माझ्या वडिलांचा जन्म झाला, त्या मातीत इतिहास घडविला. त्याच वेळेस सत्यवान यशवंत रेडकर हे नाव आणि तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचे वादळ संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पसरले. अखिल भारतीय स्तरावर निवड होऊनही मोठा सत्कार सभारंभ नव्हता की बॅनर नव्हता की कोणतीही बातमी नव्हती, परंतु पहिल्याच मोहिमेने जवळपास जिल्ह्यात प्रसिद्ध होणार्‍या सर्वच मुख्य वर्तमानपत्रांत विविध व्याख्यानांची बातमी आली. काही ठिकाणी रंगीत बॅनर तर सर्वांत अमूल्य बॅनर म्हणजेच शाळा अथवा महाविद्यालयाच्या फलकावर रंगीत खडूने लिहिलेला माझा बॅनर.

सावंतवाडी तालुक्यातून ही उडी जवळपास सर्वच आठ तालुक्यांत पोहोचली. ज्या गावांचे नाव फक्त ऐकले होते, तेथे मी पोहोचलोसुद्धा. हा प्रवास इथेच थांबला नाही, तर सिंधुदुर्गनंतर रत्नागिरीचासुद्धा मोठा दौरा झाला. रत्नागिरी शहर, नंतर राजापूरमधील जवळपास दहा ठिकाणीही शैक्षणिक व्याख्याने पार पडली. वैयक्तिक सुट्ट्या काढून किंवा कुटुंबासोबत गावी जाण्याचा कार्यक्रम करून हेच सुरू असते. मुळात माझा हा प्रवास प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा आणि मनोरंजनाचा नाहीच! हे रम्य दिवस आहेत मी शैक्षणिक संकुलात व्याख्यानाच्या दरम्यान समाजप्रबोधनाचे शैक्षणिक कार्य आणि जेव्हा-जेव्हा वस्तीला मुख्याध्यापकांच्या, शिक्षकांच्या, सामाजिक कार्यकर्त्यांच्या घरी एक रात्र अथवा दिवस थांबून एखाद्या कुटुंबाप्रमाणे वेळ व्यतीत केलेल्या आनंदाचे. मी मानसन्मान जपणारा आणि रुबाबात राहणारा अधिकारी किंवा मार्गदर्शक नाहीच. मी कोणाच्याही घरी थांबतो, जे मिळेल ते खातो. कुटुंबाप्रमाणे वेळ व्यतीत करतो, शासकीय सुट्ट्या, वैयक्तिक सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुन्हा परतीचा प्रवास करून आपली कार्यालयीन, कौटुंबिक जबाबदारी, पुढील शिक्षण, पुढील संकल्पासाठी तत्पर राहतो. कुटुंबासाठी वेळ देता येत नाही, परंतु त्यांच्या त्यागामुळे पवित्र कार्य करता येते.

पूर्वी आमची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे दिवा-सावंतवाडी या पॅसेंजर ट्रेनने सर्व कोकण रेल्वेमार्गावरील स्थानके पाहायला मिळायची, आज मुख्य अतिथी म्हणून मार्गदर्शन करण्याचे सौभाग्य प्राप्त होते. रत्नागिरीनंतर रायगडमध्येसुद्धा ही शैक्षणिक मोहीम सुरू झाली. ठाणे, मुंबई, पालघर म्हणजेच सिंधुदुर्ग ते पालघर हा संपूर्ण कोकण प्रदेश म्हणजे आपली कर्मभूमी आणि कोकणातील विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी आपण राबविलेली एकमेव शैक्षणिक चळवळ आज लोकप्रिय झाली. म्हणूनच मला अभिमान वाटतो की फक्त शासकीय पगार घेऊन स्वतःपुरता मर्यादित न राहता आपण समाजाचे जे देणे लागतो, ते ज्ञानदानाच्या माध्यमातून फेडायचे. शिक्षणाचा आणि ज्ञानाचा उपयोग बाजारीकरण किंवा व्यावसायीकरण करून पैसे कमविण्यासाठी न करता समाजप्रबोधन आणि मार्गदर्शनाद्वारे समाजाच्या उन्नतीसाठी करायचा. मी जेव्हा जेव्हा कोकणात जातो, विविध जिल्ह्यांत, तालुक्यांत, गावांत माझ्या केवळ शैक्षणिक मोहिमा असतात, त्यात मला परमानंद होतो. कारण ज्ञानदानासारखे पवित्र कार्य नाही. उच्चशिक्षित आहे, केंद्र शासनाचा अधिकारी आहे, याचा बाऊ न करता शैक्षणिक कार्य करत आहे. कोकणात आतापर्यंत जवळपास दीडशे निःशुल्क व्याख्याने पूर्ण केली आहेत. मी मानधन किंवा प्रवास भत्ता घेत नाही. आमच्या संस्थेला आर्थिक दान करण्यास जरी कोणी पुढे येत नसले, तरी मी हे शैक्षणिक समाजकार्य स्वतःच्या वेतनातूनच करतो. त्यातून कमवायचे असते आणि दीड-दोन वर्षांत एका तासाचे कमीत कमी १० हजार रुपये आकारले असते, तर किती कमावले असते, याचा हिशेब लावू शकता. तरीही केवळ वेतनाद्वारे मिळणार्‍या उत्पन्नातून गृहकर्ज जवळपास १५-२० वर्षे फेडायचे आहे. मानधन आकारले असते तर काही वर्षांतच हे गृहकर्ज फेडू शकतो, परंतु तेवढा मी धनवान किंवा भाग्यवान नाही. मी सत्यवान आहे. क्लास किंवा अ‍ॅकॅडमी उघडली असती, तरी खूप पैसे कमावू शकलो असतो. परंतु भूतकाळातील गरिबी आणि मला न मिळालेले मार्गदर्शन आणि मुख्यत्वे मी कोकणचा भूमिपुत्र आहे. त्यामुळे भविष्यातील उज्ज्वल कोकण आणि माझ्या कोकणातील आणि एकंदरीत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे विविध शैक्षणिक अर्हतांच्या अनुषंगाने गट अ ते गट ड पदांवर वर्चस्व असावे. प्रशासकीय स्वराज्यसोबत शासकीय कर्मचार्‍यांचे गाव हे स्वप्न उराशी बाळगून या शैक्षणिक चळवळीचा फक्त कोकणात नाही तर महाराष्ट्रभर विस्तार केला. आज प्रत्येक जिल्हा, प्रत्येक तालुका, प्रत्येक गाव हा माझाच. जेव्हाही आपल्या व्याख्याननरूपी शैक्षणिक मोहिमा असतात, तेव्हा कोकणातील नवीन ठिकाणी जाण्याचा अनुभव, तेथील सौंदर्य, विद्यार्थी, पालकवर्ग, ग्रामस्थ, सामाजिक संस्था यांच्याशी परिसंवाद आणि संपर्क असतो. त्यामुळे हा शैक्षणिक समाजप्रबोधनाचा आणि आगळ्यावेगळ्या ज्ञानदानरूपी सामाजिक कार्याचा आनंद हा अन्य आनंदापेक्षा मला वेगळाच वाटतो.

माझ्यासारखे अधिकारी किंवा मार्गदर्शक असाल तर हे कोकणातील रम्य अनुभव आपणही घ्यावे. काहीतरी परिवर्तन घडेल. सरतेशेवटी एवढेच सांगेन की येवा कोकण आपलोच आसा, ह्या शैक्षणिक चळवळीचो प्रसार होऊकच होयो.

  • यशवंत रेडकर (9969657820)
    कनिष्ठ अनुवाद अधिकारी,
    मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार

SSC JHT EXAM 2017, AIR 166
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
Telegram: @timiratunitejakade
Youtube: Timiratuni Tejakade
Instagram: satyaredkar
Facebook: कोकण शैक्षणिक चळवळ

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply