मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथाचा १०७ वा चैत्रोत्सव आजपासून

लांजा : मठ (ता. लांजा) येथील श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथाचा १०७ वा चैत्रोत्सव येत्या शुक्रवारपासून (दि. ३१ मार्च) सुरू होत आहे. यावर्षीच्या चैत्रोत्सवाची संपूर्ण सेवा मिरज येथील डॉ. भास्कर प्राणी आणि कुटुंबीय करणार आहेत.

चैत्र शुद्ध दशमीपासून पौर्णिमेपर्यंत म्हणजेच ६ एप्रिलपर्यंत धार्मिक, पारंपरिक आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा वार्षिक चैत्रोत्सव साजरा होणार आहे. दररोज पूजा, अभिषेक, लघुरुद्र, कीर्तन, गायन, नामजप आणि यागादी कार्यक्रमांचा त्यात समावेश आहे. पहिल्या दिवशी ३१ मार्च रोजी दुपारी ३ वाजता श्रींची चतुःषष्टी राजोपचार पूजा होईल. त्यानिमित्ताने रात्री १० वाजता अभिषेक काळे गीतरामायण सादर करतील.

शनिवार, १ एप्रिल ते गुरुवार, ६ एप्रिलपर्यंत दररोज सकाळी ८ ते दुपारी अडीच वाजेपर्यंत पूजा, अभिषेक, आरती, मंत्रपुष्प आणि महाप्रसाद होईल. याच वेळेत रविवारी (दि. २ एप्रिल) शशिकांत गुण्ये यांच्या यजमानपदाखाली सौरयाग, तर अखेरच्या दिवशी डॉ. भास्कर प्राणी यांच्या यजमानपदाखाली दत्त याग होईल. एक एप्रिल रोजी पुण्याचे गोपाळ उपाध्ये यांच्यातर्फे पवमान स्वाहाकार होणार आहे. तसेच, ४ एप्रिल रोजी राजू नेवाळकर यांच्यातर्फे नवचंडी होणार असून, ५ एप्रिल रोजी संस्थानमार्फत पल्लिनाथाप्रीत्यर्थ विशेष याग होणार आहे.

शनिवार ते बुधवारपर्यंत दररोज रात्री ९ वाजल्यानंतर हभप मकरंदबुवा सुमंत रामदासी यांची कीर्तने होणार असून शुक्रवारी पहाटे ४ वाजता हभप महेशबुवा सरदेसाई यांचे लळिताचे कीर्तन होईल. दररोज सायंकाळी नामजप, रात्री १२ वाजल्यानंतर भोवत्या आणि छबिन्याचा कार्यक्रम होईल.

याच काळात रविवार ते मंगळवारपर्यंत दररोज रात्री अनुक्रमे सौ. शिल्पा आठल्ये यांचा स्वरशिल्प हा कार्यक्रम, श्रीकांत सावंत यांचा स्वरश्रुती हा कार्यक्रम आणि संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांचे निवेदन असलेला धनश्री आपटे यांचा संकीर्तनाचा कार्यक्रम होईल. मंगळवारी, ४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता महिलांसाठी कुंकमार्चन आण हळदीकुंकवाचा कार्यक्रम, तर गुरुवारी, ६ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे.

उत्सवकाळात तीन एप्रिल रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मंदिर संस्थान आणि इन्फिगो आय केअर हॉस्पिटलतर्फे मोफत नेत्रतपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.

मंदिराजवळच भक्त निवास उभारणे प्रस्तावित असून इमारत बांधकामाच्या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. त्याकरिता भरीव निधीची आवश्यकता असून त्यासाठी दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते मदत करावी. तसेच वार्षिक चैत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानाचे अध्यक्ष सुधाकर चांदोरकर, उपाध्यक्ष शशिकांत गुण्ये, चिटणीस श्रीनिवास गुण्ये आणि खजिनदार सतीश चांदोरकर यांनी केले आहे.

उत्सवकाळातील धार्मिक विधींसाठी श्रेयस मुळ्ये (9405917567, 9028745038) किंवा उमेश आंबर्डेकर (9423292437) यांच्याशी संपर्क साधावा. देणगी आणि संस्थेशी संबंधित अन्य कारणांसाठी अध्यक्ष सुधाकर चांदोरकर (9422646765) किंवा उपाध्यक्ष शशिकांत गुण्ये (7875993699) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच पल्लिनाथभक्तांनी मोठ्या संख्येने मंदिरात उत्सवाला उपस्थित राहून, कार्यक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply