वसई : वसई-सावंतवाडी प्रवासी संघटनेने कित्येक वर्षे जी मागणी लावून धरली होती, ती वसई-सावंतवाडी पॅसेंजर रेल्वेगाडी आता लवकरच पूर्ण होणार आहे. पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनीच त्याची ग्वाही दिली आहे.
हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्यानिमित्त विरार येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. जातपात, धर्म, पंथ, राजकारण, पक्ष बाजूला ठेवून सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, महिला, पुरुष एकत्रितपणे या शोभायात्रेत सहभागी झाले होते. पालघरचे खासदार श्री. गावित शोभायात्रेला आवर्जून उपस्थित होते. या भरगच्च शोभायात्रेत सहभागी होतानाच वसई-सावंतवाडी प्रवासी संघटनेचेच अध्यक्ष शांताराम नाईक यांची भेट होताक्षणीच त्यांनी स्वतःहून वसई-सावंतवाडी पॅसेंजर गाडी सुरू होणार असल्याचे सांगितले. आपली मागणी लवकरच पूर्ण होईल, असे ते म्हणाले. त्याबद्दल श्री. नाईक यांनी समाधान व्यक्त केले. पण गाडी लवकर सुरू झाली नाही, तर नाइलाजाने उग्र आंदोलन करावे, लागेल, असा इशाराही त्यांनी श्री. गावित यांना दिला. मात्र तशी वेळच येऊ देणार नाही. गाडी लवकरच सुरू होईल, अशी ग्वाही श्री. गावित यांनी दिली.
मुंबईची उपनगरे वाढत गेली, तसतशी गिरगाव, परळ, दादर, खार, मालाड, गोरेगावमध्ये राहणारे कोकणातील अनेक चाकरमानी पालघर जिल्ह्यात वसई आणि विरार परिसरात स्थलांतरित झाले. कोकण रेल्वेमार्ग सुरू झाल्यानंतर बऱ्याच काळाने वसई ते पनवेल हा मार्ग जोडला गेला. पण वसई-विरार परिसरातून कोकणात थेट जाणाऱ्या रेल्वेच्या गाड्यांचे प्रमाण अत्यल्प आणि हंगामी स्वरूपाचे आहे. दिल्ली आणि गुजरातकडून कोकण रेल्वेमार्गाने दक्षिण भारतात जाणाऱ्या बहुतेक गाड्या वसईला थांबतात. मात्र त्या एक्स्प्रेस गाड्या असल्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एखाददुसऱ्या स्थानकांवरच थांबतात. शिवाय त्या गाड्यांमध्ये जागा मिळत नाही. सावंतवाडी आणि रत्नागिरीतून येणाऱ्या पॅसेंजर गाड्या दिव्यापर्यंतच येतात. तेथून वसई-विरारकडे येण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. दिवा-वसई पॅसेंजरच्या फेऱ्याही मोजक्याच आहेत. अशा स्थितीत लोकलने दादरपर्यंत जाऊन तेथून पश्चिम रेल्वेच्या लोकलने वसई, विरारला पोहोचावे लागते. त्यामध्ये वेळ आणि पैशाचा अपव्यय तर होतोच, पण प्रचंड गर्दीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे वसई टर्मिनसहून रत्नागिरी, सावंतवाडीकडे जाणाऱ्या पॅसेंजर गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी कित्येक वर्षे केली जात आहे. खासदार श्री. गावित यांनी ती मागणी पूर्ण होण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे यावर्षीची नववर्ष शोभायात्रा अधिक फलदायी झाल्याचे समाधान श्री. नाईक यांनी व्यक्त केले.
या शोभायात्रेला भारतीय क्रिकेट बोर्डाचे सदस्य पंकज ठाकूर, नगरसेवक, हार्दिक राऊत, पत्रकार मयूरेश वाघ, शिवसेना विरार शहरप्रमुख उदय जाधव, शहरप्रमुख गणेश भारदे, तालुकाप्रमुख मनीष वैद्य लहू साळुंखे, शरद सावंत, लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी, प्रसाद मिर्लेकर, श्री. सकपाळ, प्रशांत घाग, पिंकी परब, रिना वाघ असे अनेक मान्यवर उपस्थित होते.


