आज मातृदिन साजरा करताना आईच्या आठवणीसाठी पंचवीस ग्रंथालये सुरू करण्याच्या संकल्पाची वाटचाल यथायोग्य सुरू आहे, याचा अभिमान वाटतो.
….
वर्षातील प्रत्येक दिवस, प्रत्येक घटका, प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो, असे मानणाऱ्यापैकी मी एक. तो क्षण आपण कसा पकडतो आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये कसा उपयोग करतो हे महत्त्वाचे. मदर्स डेच्या निमित्ताने माझ्या आईची आठवण.
माझी आई माझ्या जीवनातून जाऊन आज २३ वर्षे झाली. माझी आई पूर्णत: अशिक्षित होती. मी शिकावे, खूप मोठे व्हावे, अशी तिची खूप इच्छा होती. आमच्या पाच भावंडांमध्ये माझ्यावर तिचे खूप प्रेम. ती मला लाडाने बाबू म्हणायची. मग मी माझ्या सर्व कुटुंबाचा बाबू झालो. थोडाफार अभ्यासात बऱ्यापैकी असल्यामुळे माझ्या कुटुंबात दहावी-बारावी होणारा मी पहिलाच विद्यार्थी मी. अभ्यासात पुढे पुढे जातोय, एवढेच इतरांकडून माझ्या आईला कळत होते. पण मी कोणत्या इयत्तेत आहे, हे त्या बिचारीला कळत नव्हते.
एकत्र आणि मोठे कुटुंब असल्यामुळे पुरेसे शैक्षणिक साहित्य मिळत नव्हते. तरीही माझा बाबू शिकून मोठा झाला पाहिजे, या इच्छेने तिची नेहमीच धडपड असे. मी बारावीनंतर गारगोटी येथे कर्मवीर हिरे महाविद्यालयात जेव्हा बीएबीएडसाठी प्रवेश घेतला, तेव्हा त्या चार वर्षांत मी गारगोटीला जाताना त्याअगोदर १५ दिवस तिची केवढी धावपळ असायची! दोन-तीन महिन्यांसाठी लागणारा तांदुळ, वायनात वाटलेला मसाला, कुळीथ पीठ.. याची १५ दिवस अगोदरच तयारी असायची.
गारगोटी येथून शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर मी प्रथम गोठणे-दोनिवडे येथील विद्यालयात आणि नंतर जुवाठी येथील माध्यमिक विद्यालयात नोकरीला लागलो. सुरुवातीचा काळ संघर्षमय होता. शाळेला शासकीय अनुदान नव्हते. ते २००४ मध्ये सुरू झाले. पण आपला बाबू शिकून मोठा व्हावा, असे स्वप्न पाहणारी माझी आई अकाली निघून गेली. माझ्या पगारातील एकही रुपया माझ्या आईच्या हाती देऊ शकलो नाही. आईच्या अकाली निधनानंतर माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. मी पूर्णतः हतबल झालो. पण या काळात माझी मोठी बहीण, कोंबे येथील माझ्यावर पुत्रवत प्रेम करणारी अवशी, जुवाठी येथील मायेने, ममतेने जोडलेल्या अनेक आया यांनी मला सावरले.
आई गेल्यानंतर माझ्या कुटुंबाने तिचे परंपरागत विधी केले. पण मी वर्षानंतर कोणताही विधी केला नाही. वार्षिक केल्या जाणाऱ्या नवमीला मी कधीच हजर राहिलो नाही. कारण माझ्यावर गारगोटीच्या पुरोगामी विचारांचा संस्कार होता.
आईचे नाव सर्वांमुखी राहावे, असे कोणते तरी विधायक काम उभे करावे, याचा विचार मी सतत करत होतो. माझ्या शाळेत आईच्या नावे वार्षिक बक्षिसे मी विद्यार्थ्यांना देत होतो. पण खरी संधी मला २०१६मध्ये मिळाली. माझा मोठा मुलगा आकाश चौथीमध्ये असताना त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या कोदवलीच्या गुरववाडीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आईच्या स्मरणार्थ पहिले सावित्री केरू गोंडाळ स्मृती ग्रंथालय सुरू झाले. त्याचे उद्घाटन पत्नी मालती गोंडाळ हिच्या हस्ते करण्यात आले आणि त्याचवेळी प्रत्येक वर्षी एक अशी २५ ग्रंथालये आईच्या स्मरणार्थ सुरू करण्याचा संकल्प केला.
त्यानंतर कोंढेतड क्र. २ जिल्हा परिषद शाळा, गोठणे-दोनिवडे हायस्कूल, ओणीतील वात्सल्य मंदिर, सोलगाव हायस्कूल, प्रिंदावणची मानवाडी, .जुवाठी हायस्कूल, रद्दीतून ग्रंथालय अशी वाचनालये सुरू केली. चुलती यशोदा हरी गोंडाळ यांच्या स्मरणार्थ शीळ भंडारवाडी जिल्हा परिषद शाळा क्र. ३ खरवते शाळा क्र. २, चुलती कै. सुमित्रा खेमाजी गोंडाळ स्मृती ग्रंथालय शीळ वरची वाडा शाळा क्र. २ येथे ग्रंथालय सुरू करण्यात आले. शीळ येथील ज्ञानसागर वाचनालयात आईवडिलांच्या स्मरणार्थ विश्वकोश दालन, गोंडाळवाडी सभागृह येथे धार्मिक ग्रंथांचे दालन सुरू केले. आईच्या आठवणीसाठी पंचवीस वाचनालये सुरू करण्याचा सोडलेला संकल्प ठरविल्याप्रमाणे साकारात आहे, याचा अभिमान वाटतो.
जुवाठीच्या माध्यमिक विद्यालयात तसेच राजापूर नगर वाचनालयात आईच्या स्मरणार्थ कायमस्वरूपी निधी ठेवून तिच्या स्मरणार्थ दरवर्षी उत्कृष्ट वाचक पुरस्कार दिला जातो. तसेच आईच्या स्मरणार्थ हस्ताक्षर सुधार उपक्रम राबविण्यात येतो. मुलांना हस्ताक्षर वह्या दिल्या जातात. या कामात पत्नी मालती, बंधू वासुदेव गोंडाळ, पंढरीनाथ गोंडाळ, गुरुवर्य ए. जी. भावे सर यांच्यासह अनेक मित्र, गुरुजन यांचे सहकार्य… मार्गदर्शन लाभले आहे. लाभत आहे.
अशी आहे आजच्या मातृदिनी … माझ्या आईची ही ज्ञानमय आठवण! आईच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन!!!
- बी. के. गोंडाळ, राजापूर
(संपर्क : ९५२९९८००७७)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

