स्वच्छ, सुंदर एसटीसाठी दोन कोटींच्या बक्षिसांची योजना

रत्नागिरी : राज्यातील एसटी बसस्थानके स्वच्छ आणि सुंदर दिसावीत, यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून त्यातून दोन कोटीहून अधिक रुपयांच्या रकमेची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.

मुख्यमंत्री तथा एसटी महामंडळाच्या अध्यक्षांनी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या ३०२ व्या बैठकीत एसटीची सर्व बसस्थानके, स्वच्छतागृहे, बसस्थानक परिसर आणि प्रवासी बसेस स्वच्छ व टापटीप असाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी यासंदर्भात स्पर्धात्मक स्वरूपात अभियान राबवून उत्कृष्ट बसस्थानकांना रोख बक्षीस देऊन गौरविण्यात यावे, असे निर्देश दिले. त्यानुसार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे.

या अभियानचा कालावधी एक वर्षाचा आहे. सध्या राज्यभरात एसटी महामंडळाची ५८० पेक्षा जास्त बसस्थानके आहेत. या स्पर्धेसाठी या सर्व बसस्थानकांची ‘अ’ वर्ग (शहरी), ‘ब’ वर्ग (निमशहरी) आणि ‘क’ वर्ग (ग्रामीण) असे वर्गीकरण करण्यात आले आहे. राज्यभरात एसटी महामंडळाचे मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर असे सहा प्रादेशिक विभाग आहेत. त्यांच्याकरिता ही स्पर्धा दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये प्रदेशनिहाय अ, ब आणि क वर्गासाठी स्पर्धा घेण्यात येतील. दुसर्‍या टप्प्यामध्ये प्रत्येक प्रदेशातून प्रत्येक गटामध्ये प्रथम आलेल्या बसस्थानकांसाठी राज्यस्तरावर अंतिम स्पर्धा होईल. अंतिम स्पर्धेमध्ये पहिला येणाऱ्या बसस्थानकांना गटनिहाय ५० लाख, २५ लाख आणि
१० लाख रुपयांचे बक्षीस, चषक आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी परीक्षण समित्या नेमण्यात येणार असून दर दोन महिन्यांनी प्रत्येक बसस्थानकाचे स्पर्धात्मक परीक्षण करण्यात येणार आहे. वर्षभरातील दर दोन महिन्यांनी होणार्‍या परीक्षणाच्या सरासरीद्वारे स्पर्धेचा अंतिम विजेता ठरणार आहे. स्पर्धेमध्ये बसस्थानक आणि बसस्थानकाचा परिसर, बसस्थानकावरील स्वच्छतागृहे, प्रवासी बसेस यांच्या स्वच्छतेबरोबरच सुशोभीकरण आणि टापटीप यासाठी अधिकाधिक गुण दिले जाणार आहेत. याबरोबरच
या अभियानामध्ये कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी, त्यांचे प्रवाशांसोबत सौहार्दपूर्ण वागणे, उत्पन्नवाढीसाठी केलेले प्रयत्न, बसेसचा वक्तशीरपणा या घटकांनादेखील गुणात्मकरीत्या विशेष महत्त्व देण्यात येणार आहे. शक्यतो या संकल्पनेच्या आधारे या अभियानातील जास्तीत जास्त कामे लोकसहभागातून करावीत. त्यासाठी आवश्‍यक निधीची उभारणी विविध स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती, प्रवासी संघटना, महिला बचतगट, तरुण मंडळे यांनी दिलेल्या देणगीच्या माध्यमातून तसेच वेगवेगळ्या घटकांनी केलेल्याश्रमदानातून करावे, असे सूचित करण्यात आले आहे. त्याला अधिक गुण प्राप्त होणार आहेत.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply