कणकवली : येथील अप्पासाहेब पटवर्धन यांच्या गोपुरी आश्रमात राष्ट्र सेवा दल शिबिरातील विद्यार्थ्यांना जुवाठी (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील माध्यमिक विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक बी. के. गोंडाळ यांनी सुलेखनाचे धडे दिले.
कणकवलीतील अद्वैत फाउंडेशनच्या विद्यमाने राष्ट्र सेवा दलाचे व्यक्तिमत्त्व विकास शिबिर गोपुरी आश्रमाच्या कै. गणपतराव सावंत सभागृहात पार पडले. शिबिरासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथून विद्यार्थी सहभागी झाले. शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांतील व्यक्तींची भेट घडवून आणण्यात आली. प्रबोधनात्मक व्याख्याने झाली. एरोबिक्स, कवायत, लेझिम, दांडिया, नृत्य, मनोरंजनपर खेळ पथनाट्य या गोष्टी शिकवण्यात आल्या. त्याचबरोबर शिबिर संयोजक अद्वैत फाऊंडेशनच्या अध्यक्षा सरिता पवार, सचिव राजन चव्हाण यांनी बी. के. गोंडाळ यांचे सुलेखनाचे सत्र ठेवले. श्री. गोंडाळ यांनी मातृदिनाचे औचित्य साधून आपली आई कै. सावित्री केरू गोंडाळ यांच्या स्मरणार्थ उपस्थित ७५ विद्यार्थ्यांना मोफत सुलेखन वह्या दिल्या. मुलांना अक्षरांचे आकार, उकार शिकविले. हस्ताक्षराचे विद्यार्थीजीवनातील महत्त्व समजून सांगितले. अक्षरांचा सराव करून घेतला. शेवटी सरावच माणसाला परिपूर्ण बनवतो, असे सांगून याबाबत त्यांनी व्यवहारातील अनेक उदाहरणे दिली.
यावेळी अद्वैत फाउंडेशनच्या अध्यक्षा सरिता पवार, सचिव राजन चव्हाण, सेवा दलाचे राष्ट्रीय प्रशिक्षक बाबासाहेब नदाफ (पुणे), एस. एम. ज्युनिअर कॉलेजच्या प्रा. मनीषा पाटील, सुप्रिया पाटील, कोल्हापूरचे प्रशिक्षक विजय हेग्गाण्णावार, चंदन माटुंगा, विश्वास सरस्वती तानाजी, शुभम चौगुले, सतीश सौदे, रोहित कुरणे, बाबणी मापारी (गोवा), मालती गोंडाळ आदी उपस्थित होते.


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

