चिपळूण : येथील अॅक्टिव्ह ग्रुपतर्फे येत्या गुरुवारी (दि. २५ मे) पर्यटनविषयक चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
चिपळूण शहर आणि तालुका परिसर सह्याद्री पर्वताच्या रांगा आणि वाशिष्ठी नदी-खाडी यांच्या निसर्गसंपन्न सान्निध्यात वसला आहे. येथे विपुल प्रमाणात निसर्ग जैवविविधता उपलब्ध असून भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक वारसा संपन्न असा हा भाग आहे. परंतू अनेकविध कारणास्तव चिपळूण तालुक्याचा म्हणावा तसा अपेक्षित विकास साधला जाऊ शकला नाही.
उपलब्ध साधनसंपत्ती सामग्रीवर आधारित प्रवास-पर्यटन, आदरातिथ्य या क्षेत्रामध्ये व त्या पूरक व्यवसायाच्या रोजगाराच्या अनेक संधी आहेत. याच अनुषंगाने चिपळूण तालुका पर्यटन विकास चर्चासत्र आयोजित केले आहे. हे चर्चासत्र काणे यांच्या सावरकर॑ सभागृहात गुरुवारी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत होणार आहे.
चिपळूण शहर परिसरासह तालुक्याचा प्रवास, पर्यटन, आदरातिथ्य या मुद्द्यांना अनुसरून खरा विकास व्हावा यांचा प्रयत्नांचा एक भाग म्हणून चिपळूण पर्यटन चर्चासत्र कार्यक्रम आयोजित केला आहे. या चर्चासत्राचे स्वरूप कार्यशाळेसारखे राहील. या क्षेत्रात आणि त्या पूरक क्षेत्रात काम करणारे, करू इच्छिणारे व चिपळूणचा विकास योग्य रीतीने व्हावा, असे वाटणाऱ्या व्यक्ती, संस्थांनी यात सहभागी व्हावे. या क्षेत्रामध्ये आणि या संबंधित पूरक क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष काम करणारे, तसेच क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणारे अशा व्यक्ती, संस्थांनी या चर्चासत्रात सहभागी होणे अपेक्षित आहे. या क्षेत्रातील आपले अनुभव शेअर करावेत. रामशेठ रेडीज, डॉ. मीनल ओक, राजेश्री कीर, धीरज वाटेकर, मंगेश गोवेकर, प्रज्ञा जोगळेकर, राजेश जोष्टे इत्यादी मार्गदर्शन, अनुभव कथन करणार आहेत.
या कार्यक्रमादरम्यान चिपळूण शहर परिसरसह तालुक्याचा पर्यटनात्मक विकास आणि त्याला पूरक उद्योग व्यवसाय रोजगार इत्यादीबाबत विचारमंथन होईल. त्यानंतर चिपळूण तालुक्याच्या पर्यटन विकासात्मक कार्यासाठी चिपळूण पर्यटन समिती स्थापन करण्यात येणार आहे.
प्रवास, पर्यटन, आदरातिथ्य या क्षेत्रातील व पूरक इतर क्षेत्रातील व्यक्ती, संस्थांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन अॅक्टिव्ह ग्रुपतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी कैसरभाई देसाई (९८२२१२२१०८), समीर कोवळे (८८८८०६३३५७), प्रकाश बापू काणे (८६०५१८१४८८८), मिलिंदशेठ कापडी (९४२२४३२११८), विलास महाडीक, सौ. श्रद्धा चितळे यांच्याशी संपर्क साधावा.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

