कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. संजय भावे

मुंबई : दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. संजय भावे यांची नियुक्ती राज्यपालांनी केली आहे.

राज्यपाल आणि कुलपती रमेश बैस यांनी आज मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीची घोषणा केली. मागील काही काळापासून ही पदे रिक्त होती. डॉ. रवींद्र कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठ, तर डॉ. सुरेश गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ संजय घनश्याम भावे कोकण कृषी विद्यापीठाचे नवे कुलगुरू असतील.

कुलगुरू डॉ. संजय सावंत यांचा कार्यकाल गेल्या २८ मे रोजी संपल्याने हे पद रिक्‍त झाले होते. तात्पुरत्या स्वरूपात मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्याकडे विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. दरम्यान, निवडप्रक्रियेनुसार डॉ. भावे यांची आज कुलगुरू म्हणून निवड जाहीर करण्यात आली.

डॉ. संजय भावे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असून कोकण कृषी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी याच विद्यापीठातून आनुवंशिकता आणि वनस्पती प्रजनन (Genetics and Plant Breeding) या विषयात आचार्य (पीएचडी) पदवी मिळविली आहे. त्यांनी कारकिर्दीची सुरुवात सहायक प्राध्यापक पदापासून केली. त्यानंतर ते सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, विभाग प्रमुख, वनशास्त्र महाविद्यालय सहयोगी अधिष्ठाता, विस्तार शिक्षण संचालक या पदांवर काम केले आहे. सध्या ते विद्यापीठामध्ये संशोधन संचालक असून गेली ३३ वर्षे ते या विद्यापीठात विविध पदांवर कार्यरत आहेत. माजी कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या आजारपणाच्या काळात डॉ. भावे यांनी प्रभारी कुलगुरू म्हणून काम सांभाळले होते.

डॉ. संजय भावे यांनी आत्तापर्यंत १२ पीएचडी पदवी विद्यार्थ्यांना तर ३५ पदव्युत्तर विद्यार्थ्यांना संशोधन मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले आहे. ज्येष्ठ कृषी संशोधक म्हणून त्यांनी आतापर्यंत विविध तृणधान्य, कडधान्य आणि गळीतधान्य पिकांच्या २१ जाती विकसित केल्या आहेत. लाल भाताची रत्नागिरी- ७ आणि रत्नागिरी-८ या जाती विकसित करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. संयुक्‍त संशोधन परिषदेत त्यांनी आजवर २२ कृषी वाणांचे प्रकाशन केले आहे. राष्ट्रीय समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. पायाभूत सुविधा आणि सीआरझेड प्रकल्पांच्या मूल्यांकनासाठी काम केले आहे. राष्ट्रीय औषधी वनस्पती महामंडळ, शैक्षणिक परिषद वनामती नागपूर, यशवंतराव चव्हाण मुक्‍त विद्यापीठ संशोधन परिषद, वन विभागाची वनसंशोधन सल्लागार समिती, पुणे येथील राहुरी कृषी विद्यापीठाची संशोधन परिषद अशा शासनाच्या विविध समित्यांवरही त्यांनी काम केले आहे.

विस्तार शिक्षण संचालक म्हणून कार्यरत असताना त्यांनी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात सुवर्णमहोत्सवी कृषी महोत्सवाचे यशस्वीरीत्या आयोजन केले. त्यामुळे विद्यापीठाचे तंत्रज्ञान लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यास मोठा हातबार लागला. कोकणातील विविध गावांमध्ये एक गाव-एक उत्पादन ही संकल्पना, तसेच शेतकऱ्यांसाठी किमान कौशल्यावर आधारित विविध प्रशिक्षण कार्यक्रम त्यांनी राबविले. सिंधुदुर्ग जिल्हा विकास नियोजन समितीच्या निधीतून त्यांनी जिल्ह्यात अन्नसुरक्षा दलांची स्थापना केली आणि त्यातून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केले.

कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षणातील डॉ. भावे यांच्या योगदानाबद्दल त्यांना वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी गौरविले गेले आहे.

वर्षभरापूर्वी भरलेल्या विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी पालवी महोत्सवाविषयी बोलताना डॉ. संजय भावे

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply