सडामिऱ्या येथे वीर सावरकरांचा स्मृतीस्तंभ उभारण्याची मागणी

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या सडामिऱ्या (ता. रत्नागिरी) येथील ऐतिहासिक स्थळाचे संवर्धन करण्याबाबत रत्नागिरीकरांच्या वतीने पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे निवेदन देण्यात आले.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे क्रांतिकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना इंग्रजांनी रत्नागिरीत सुमारे १३ वर्षे स्थानबद्धतेत ठेवले होते. या काळात समाजक्रांतीचे मोठे कार्य सावरकरांनी रत्नागिरीमध्ये केले. जातीभेद निर्मूलन व्हावे म्हणून पतितपावन मंदिरामध्ये सहभोजनाचा कार्यक्रम केला. रत्नागिरीमध्ये वास्तव्यास असताना सडामिऱ्या येथे स्वातंत्र्यवीर सावरकर ये-जा करत असत. त्याच ठिकाणी शासनाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ने मजशी ने परत मातृभूमीला या काव्यपंक्ती स्तंभावर लिहिल्या होत्या. परंतु हा स्तंभ समुद्रकिनारी असल्यामुळे पडझड होऊन सद्यःस्थितीत तो तेथे दिसत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याने पुनीत झालेल्या ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करून देशाच्या भावी पिढीमध्ये राष्ट्रभक्तीची ज्योत जागृत आणि तेवत राहावी, यासाठी या ठिकाणी स्मारक व्हावे, अशी मागणी रत्नागिरीकर करत आहोत, असे निवेदनात म्हटले आहे.

मंत्री मंगलप्रभात लोढा यांना विवेक व्यासपीठचे रत्नागिरी समन्वयक रवींद्र भोवड, श्री भागोजीशेठ कीर ट्रस्टचे ट्रस्ट अॅड. विनय आंबुलकर, व्यासपीठाच्या प्रतिनिधी तनया शिवलकर, मंगेश मोभारकर यांनी हे निवेदन मुंबईत दादर येथील वसंत स्मृती येथे झालेल्या कार्यक्रमात हे निवेदन . यावेळी सौ. ऋतुजा भोवड, सौ. दीप्ती आगाशे, गौरांग आगाशे आदी उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply