रत्नागिरी : शिवजन्म ते शिवरायांच्या राज्याभिषेकापर्यंतची शिवकथा अनुभवताना शिवप्रेमींच्या अंगावर रोमांच उभे राहिले. सुप्रसिद्ध प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे यांनी शिवइतिहास उभा करताना शिवरायांइतकीच किंबहुना त्याहून अधिक जिजाऊंच्या विचारांची देशाला खरी गरज असल्याचे प्रतिपादन रत्नागिरीतील प्रवचनात केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शिवकथा व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. सुप्रसिद्ध प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे यांच्या अमोघ वाणीतून सलग तीन दिवस शिवकथा अनुभवली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीची हिंदुस्थानातील भयानक दाहकता, मोगलांचे अत्याचार, ब्रिटिशांचा चंचुप्रवेश आणि या सर्वामुळे माँसाहेब जिजाऊ यांची झालेली विदीर्ण मानसिकता, हे बदलायला हवे याचा त्यांनी घेतलेला ध्यास, त्यानंतर शिवजन्म ते शिवरायांच्या राज्याभिषेकापर्यंतची शिवकथा पेंडसे यांनी उलगडली.
शिवकथेतील प्रसंगांनुसार रत्नागिरीतील कलाकारांनी शिवगीते सादर करून कार्यक्रमात अधिकच रंगत भरली. श्री. पेंडसे यांनी शिवरायांची युद्धनीती, प्रत्येक मोहिमेतील नियोजनबद्धता, दूरदृष्टी, एकेक गड-किल्ला जिंकताना त्यांच्या प्रत्येक शिलेदाराने रक्ताचे केले पाणी, त्यांचे बलिदान, स्वामीनिष्ठा याचा तपशीलवार मागोवा घेतला. प्रत्येक प्रसंग साभिनय सादर करताना अंगावर काटा उभा राहत होता. रसिकांना खिळवून ठेवणारे वक्तृत्व आणि त्यानुसार सादर झालेली गाणी यामुळे तीन दिवस शिवप्रेमाने भारावलेले होते.
प्रसिद्ध तबलावादक हेरंब जोगळेकर आणि श्वेता जोगळेकर यांच्या संगीत संयोजनाखाली गायक नरेंद्र रानडे, संध्या सुर्वे, करुणा पटवर्धन, तन्वी मोरे, भूषण शितूत, श्वेता जोगळेकर आणि जुई डिंगणकर यांनी या शिवकथेदरम्यान शिवगीतांचे उत्तम सादरीकरण केले. सह्याद्रीवर ज्याचे तांडव, जा पवना जा वेगे, गुणी बाळ असा, मराठी पाऊल पडे पुढे, हे हिंदू नृसिंहा, बाजीप्रभू पोवाडापावन खिंडीत पावन झालो, सरणार कधी रण, वेडात मराठे वीर, शतकांच्या यज्ञात, ध्वज तेजाळून, आनंद भुवनी या शिवइतिहास जागवणाऱ्या गीतांना केदार लिंगायत (तबला), मंगेश चव्हाण (ढोलकी-पखवाज), चैतन्य पटवर्धन आणि श्रीरंग जोगळेकर (संवादिनी), मंगेश मोरे (कीबोर्ड) आणि अद्वैत मोरे आणि संजय बर्वे (तालवाद्य) यांनी समर्पक संगीतसाथ केली. श्रेयस भाटकर यांनी उत्तम ध्वनिसंयोजन केले. व्याख्यानमालेच्या अखेरच्या सत्रात फगरवठार येथील ग्रुपने शिवगीतांवर नृत्य सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.
झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवनात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उत्तम संयोजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शुभम घगवे, डॉ. सुश्रुत केतकर, नीलेश रहाटे, गजानन करमरकर आदींनी केले. शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्ताने अशा प्रकारचा कार्यक्रम वर्षभर सादर होऊन शिवकथा सर्वदूर पोहोचावी, असे मत अनेक शिवप्रेमींनी यावेळी व्यक्त केले.
तीन दिवसांतील अवघ्या सात तासांमध्ये शिवबांचा जन्म ते छत्रपतींचा राज्याभिषेक हा कालखंड मांडताना श्रीनिवास पेंडसे यांनी मुख्यत्वे प्रत्येक प्रसंगातील महाराजांचे विचार, कार्यकारण भाव आणि द्रष्टेपणा यावर भर देऊन, मोजक्या शब्दांत आणि उत्तम वाचिक अभिनयाने प्रभावीपणे विषयाची मांडणी केली. व्याख्यानात प्रसंगानुरूप गाणी, पोवाडे यांची जोड देण्याचा अभिनव प्रयोग पेंडसे आणि कलाकारांनी केला. त्यामुळे प्रत्येक प्रसंग अधिक स्पष्टपणे कळत गेला, असे मत ज्येष्ठ निवेदक वामन जोग यांनी यावेळी व्यक्त केले.
