रत्नागिरीत स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन

रत्नागिरी : रत्नागिरीत आज ७७ व्या स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यात आले. जिल्ह्याच्या मुख्य समारंभात राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.

रत्नागिरी ही नवरत्नांची खाण असून रत्नागिरीत अनेक महापुरुषांनी जन्म घेतला. त्या रत्नागिरीचा पालकमंत्री असल्याचा मला अभिमान आहे, असे श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले. रत्नागिरीला आम्ही जागतिक पातळीवर नेण्याचा संकल्प स्वातंत्र्यदिनानिमित्त करत आहोत, असे श्री. सामंत म्हणाले. स्वातंत्र्यलढ्यात ज्यांचे योगदान होते, त्यातील अनेकजण हुतात्मे झाले, अशा सर्व ज्ञात आणि अज्ञात सैनिकांना श्री. सामंत यांनी अभिवादन केले.

श्री. सामंत यांनी रत्नागिरीच्या विकासासाठी विविध योजना, विविध उपक्रम आणि विविध विकासाच्या निधी वाटपाचा आढावा सादर केला. जिल्ह्यातील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण, शिवसृष्टी, रत्नागिरी आणि खेड येथील नाट्यगृह, विमानतळ नाइट लँडिंगसह विविध विकासाकामांचा आढावा पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला. रत्नागिरीला जागतिक पातळीवर नेण्याचा संकल्प सोडल्याचेही त्यांनी सांगितले.

येथील पोलीस संचलन मैदानावर श्री. सामंत यांच्या हस्ते स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदन झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, कोकणातील सर्वांत मोठी शिवसृष्टी, छत्रपती संभाजी महाराजांचा उंच पुतळा, तीनशे कोटी रुपये खर्चून ३ डी मल्टीमीडिया इव्हेंट थिबा पॅलेस परिसरात उभारणे, दीडशे कोटी रुपये खर्च करून जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण अशा शहरातील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण, रत्नागिरी शहरातील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहासाठी १० कोटी, खेडमधील मीनाताई ठाकरे नाट्यगृहासाठी साडेतीन कोटी, विभागीय क्रीडा संकुलासाठी २० कोटी अशी तरतूद करण्यात आली आहे. विमानतळ जमिनीच्या भूसंपादनासाठी १०० कोटीची तरतूद केली असून, येत्या काही दिवसात नाइट लँडिंगची सुविधा सुरू होणार आहे. वर्षभरात विमानसेवा सुरू होईल. रत्नागिरी जिल्ह्याला ज्यांनी दिशा दिली, त्या श्यामराव पेजेंचे नाव अभियांत्रिकी महाविद्यालयाला देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

देशासाठी बलिदान केलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांना नमन करण्यासाठी जिल्ह्यात ९ ऑगस्ट या क्रांतीदिनापासून ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतील अभियान राबविण्यात येत आहे. राज्यातील एकमेव रत्नागिरी जिल्हा आहे की, तहसीलदार कार्यालयात सर्वाधिक उंच ध्वजस्तंभ उभारण्यात येत आहेत. लवकरच जिल्ह्याच्या मुख्यालयातही सर्वांत उंच ध्वजस्तंभावर तिरंगा फडकविण्यात येईल. जिल्ह्यातील विकास कामांसाठी यापूर्वी असणाऱ्या २४० कोटींमध्ये शासनाने ६० कोटी रुपयांची वाढ करुन तो ३०० कोटी रुपये इतका केला आहे, असेही पालकमंत्री म्हणाले.

“शासन आपल्या दारी” उपक्रमामध्ये आतापर्यंत सर्व विभागाच्या योजनांचा लाभ एक लाख ६२ हजार ८४५ लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये जीएनएम, एएनएम, संस्कृत विद्यापीठ, २५० कोटी खर्च करून अभियांत्रिकी महाविद्यालय, तर ५२२ कोटी खर्चून वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आहे. त्याचबरोबर स्किल सेंटर सुरू झाले आहे. रत्नागिरी शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपास येत आहे. येत्या दोन महिन्यांत विधी महाविद्यालयदेखील सुरू करणार आहोत.

अण्णासाहेब पाटील अर्थिक मागास विकास महामंडळामार्फत आजपर्यंत लाभार्थ्यांना व लाभार्थी गटांना एकूण ३० कोटी ९० लाख १० हजार २७३ रुपयांच्या रकमेचे अर्थसाह्य केले आहे. विभागीय क्रीडा संकुल येत्या ३ ते ३ महिन्यांत पूर्णत्वास जाईल. चिपळूणमध्ये इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र ज्या पद्धतीने सुरू होत आहे, त्याच धर्तीवर रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर आणि खेडमधील मीनाताई ठाकरे नाट्यगृह येत्या २६ जानेवारीला सुरू होईल. आपत्कालीन परिस्थिती येऊ नये, म्हणून तिन्ही जिल्ह्यांसाठी ३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी रत्नागिरीसाठी ६२२ कोटी रुपयांची तरतूद आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

संचलनात प्लाटून कमांडर राखीव पोलीस उपनिरीक्षक सुभाष तारये, शहर पोलीस ठाणे, संगमेश्वर पोलीस ठाणे, प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक गायत्री पाटील (महिला कक्ष), प्लाटून कमांडर पल्टन नाईक चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथके तसेच पोलीस हवालदार यशवंत माने यांच्या नेतृत्वाखालील बँड पथक, अलेक्स पोलीस श्वानपथक, स्काऊट गाइड पथक, जवाहर नवोदयाच्या विद्यार्थ्यांचे पथक यांचा सहभाग होता.

समारंभाला खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्रशिक्षणार्थी आयएएस डॉ. जस्मीन, प्रभारी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, प्रांताधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्य सैनिक दिवंगत मधुकर नामजोशी यांच्या पत्नी कमल नामजोशी यांचा मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. मे. साई पॅकेजिंगच्या पूजा कदम यांची जिल्हास्तर उत्कृष्ट सूक्ष्म व लघु उद्योजक पुरस्काराबद्दल १५ हजार रुपये, मे. नयन गार्मेंटच्या नयन सावंत यांना १० हजार रुपये, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. राज्य अधीस्वीकृती समितीवर सदस्यपदी निवड झाल्याबद्दल जान्हवी पाटील, कोकण विभागीय अधिस्वीकृती समिती सदस्यपदी निवड झालेले श्रीकांत चाळके, प्रणव पोळेकर आणि दिलीप देवळेकर यांचा पुष्पगुच्छ आणि पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला. नशामुक्त अभियान चित्रकला स्पर्धेतील तेजश्री जाधव, सायली कदम, निबंध स्पर्धेतील श्रृती सागवेकर, आकांक्षा मोडक यांचा सत्कार करण्यात आला.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply