Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नागिरीत १५ पासून रस्टिक आर्ट्सचे कला प्रदर्शन

Advertisements

रत्नागिरी : तुरळ (ता. संगमेश्वर) येथील पारंपरिक कलाकारांनी साकारलेल्या विविध हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन येत्या १५ ते १७ सप्टेंबर या कालावधीत रत्नागिरीत होणार आहे.

कोकणाचे सौंदर्य सर्वांनाच भुरळ पाडते. कोकणातील वातावरणात मन प्रसन्न करणारी निरागसता नेहमीच अनुभवता येते. कोकणातील नितांत सौंदर्याची छाप न कळत इथल्या माणसांवरही असते आणि ती कोकणी माणसांच्या विविध कलांमधून प्रकट होत असते. कोकणी माणसांची, कारागिरांची हस्तकला हे त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे. कोकणातील कारागिरांनी साकारलेल्या हस्तकलेचे नमुने कोकणात अनेक ठिकाणी, घरोघरी सहज बघायला मिळतात. फारशी प्रसिद्धी नसतानाही ही कला इथे रुजली व जपलीही गेली.

संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथील शिल्पा आणि नितीन करकरे गावच्या ओढीने शहरातील व्यवसाय सोडून कोकणात परत आले. त्यांनी तुरळ गावातच ‘रस्टिक हॉलिडे’ हा होम स्टे सुरू केला. यानिमित्ताने आजूबाजूच्या परिसरातील गुणी कारागिरांशी त्यांचा संपर्क आला. त्यांच्या कोकणी हस्तकलेचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून त्यांनी या स्थानिक कारागिरांना एकत्र आणले, प्रोत्साहन दिले. याच प्रयत्नातून ‘रस्टिक आर्ट्स’ हे कला दालन उदयाला आले.

कोकणातील कारागिरांनी बनवलेल्या नेहमी वापरता येतील अशा अनेकविध वस्तूंचे प्रदर्शन रत्नागिरीत येत्या १५ ते १७ सप्टेंबर या कालावधीत भरविण्यात येणार आहे. रत्नागिरीत मारुती मंदिर येथील कार्निव्हल हॉटेलशेजारी शर्वाणी हॉलमध्ये सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत प्रदर्शन भरणार आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९८९२५८४३३२ किंवा ९८६७२११३२२ मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version