रत्नागिरी : तुरळ (ता. संगमेश्वर) येथील रस्टिक आर्ट्सने रत्नागिरीत भरविलेल्या कलात्मक लाकडी वस्तूंच्या तीन दिवसांच्या प्रदर्शनात प्रामुख्याने खुर्च्या, टेबल अशा लाकडी वस्तूंना अधिक मागणी होती, अशी माहिती रस्टिक आर्ट्सच्या सौ. शिल्पा नितीन करकरे यांनी दिली.
रस्टिक आर्ट्सने घरात वापरावयाच्या अनेक लाकडी वस्तू पुन्हा प्रचलित करण्याचा चंग बांधला आहे. या कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन मारुती मंदिर येथील कार्निव्हल हॉटेलनजीकच्या शर्वाणी हॉलमध्ये तीन दिवस भरले होते. कोकणी कारागिरांनी हस्तकलेतून साकारलेल्या अनेक प्रकारच्या लाकडी, मातीच्या वस्तू प्रदर्शनात मांडल्या होत्या. सौ. शिल्पा आणि नितीन करकरे यांनी तुरळ (ता. संगमेश्वर) येथे ”रस्टिक हॉलिडे” हा होम स्टे सुरू केला. त्यातून परिसरातील कारागिरांशी त्यांचा परिचय झाला आणि या दांपत्याने कोकणी हस्तकलेच्या लाकडी वस्तू बनवण्याचे ठरवले. त्यानंतर ”रस्टिक आर्ट्स” हे कला दालन सुरू केले. लाकडी खुर्च्या, टेबल्स, झोपाळे, तीन पायांचे स्टूल, फोल्डिंगच्या खुर्च्या, चमचे, विळी, कांदे-बटाटे ठेवण्यासाठी लाकडी मांडणी, कीहोल्डर, पेनस्टॅंड, टिशू पेपर बॉक्स, मातीची भांडी अशा अनेक वस्तू तयार करण्यात आल्या. याच वस्तूंचे प्रदर्शन रत्नागिरीत भरविण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
छोट्या वस्तू प्रदर्शनात विकल्या गेल्याच, पण खुर्च्या, टेबल यांसारख्या मोठ्या वस्तूंना चांगला प्रतिसाद मिळाला. कोकणात लाकूड किंवा लाकडी फर्निचर हा प्रकार माहीत असल्याने लोकांनी जास्त प्रतिसाद दिला असावा. अलीकडे लाकडात काम खूप कमी झाले आहे. लाकूडकाम करायले कोणीही तयार होत नाही कॉम्प्रेस वूड किंवा प्लायमध्ये लोक काम जास्त करतात. त्यामुळे लाकडी वस्तूंना जास्त प्रतिसाद मिळाला असावा, असे सौ. करकरे यांनी सांगितले.
सागवानी लाकडातील विळ्या, पोळपाट यांनाही मागणी होती. नैसर्गिक लाकूड वापरून केलेल्या वस्तू लोकांना जास्त आवडल्या. पटकन सहज चढता येईल असे मजबूत पाय असलेल्या छोट्या स्टुलांना मागणी आहे. सौ. करकरे म्हणाल्या की, सोशल मीडियाचाही चांगला उपयोग झाला. सौ. करकरे यांना ओळखणाऱ्या व्यक्तींनी आपल्या व्हॉट्स अॅप स्टेटसला जाहिरात ठेवली होती. हेही कौतुकास्पद असल्याचे त्या म्हणाल्या.
