रत्नागिरी : पर्यटन आणि क्रीडा क्षेत्रांची सांगड घालणाऱ्या अनोख्या अशा धावनगरी रत्नागिरी
कोकण कोस्टल मॅरेथॉनचे आयोजन येत्या ७ जानेवारीला रत्नागिरीत करण्यात आले आहे.
सुवर्णसूर्य फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या मॅरेथॉनच्या नियोजनात जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब तसेच अन्य समाजसेवी संस्थांचा सहभाग आहे. आज येथील पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
देवूड येथील कातळशिल्प, हेदवी ते संगमेश्वरमधील देवळे गाव इत्यादी ठिकाणी सायकलिस्टना नेऊन फाउंडेशनने क्रीडाप्रकाराच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्याला जगाच्या नकाशावर प्रयत्न चालवले आहेत. याचेच पुढचे पाऊल म्हणून कोकण कोस्टल मॅरेथॉन आहे, असे फाउंडेशनचे अध्यक्ष प्रसाद देवस्थळी यांनी यावेळी सांगितले.
संपूर्ण जगातील धावपटूंनी एक दिवस कोकणात यावे, कोकणची माती, कोकणची माणसे, कोकणच्या प्रथा, कोकणची नाती आणि कोकणच सौंदर्य अनुभवावे, या हेतूने नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉनचा भारतातल्या सर्वोत्तम १० मॅरेथॉनमध्ये समावेश व्हावा, या ईर्ष्येने रत्नागिरी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनदेखील मॅरेथॉनच्या नियोजनात पूर्णपणे सहभागी झाली आहे. कोकणातील सर्वांत मोठा रत्नागिरी सायकलिस्ट क्लब या मॅरेथॉनच्या प्रचार-प्रसारात मोलाचा वाट उचलत आहे.
मॅरेथॉनचे स्वरूप २१ किलोमीटर, १० किलोमीटर आणि ५ किलोमीटर असे असेल. रत्नागिरीत मारुती मंदिर येथून सुरू होणाऱ्या मॅरेथॉनची सांगता भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर होईल. रत्नागिरी, नाचणे, काजरघाटी, पोमेंडी, सोमेश्वर, वेसुर्ले, कोळंबे, फणसोप आणि भाट्ये या गावांमधून खाडीकिनाऱ्यावरून समुद्रकिनाऱ्याकडे जाणारा हा निसर्गसौन्दर्याने नटलेला भूप्रदेश २१ किमीसाठी निवडण्यात आला आहे.
धावनागरी रत्नागिरी अशी ओळख मिळून संपूर्ण कोकण आणि प्रामुख्याने रत्नागिरी जिल्हा फिटनेस टुरिझमसाठी संपूर्ण जगाला सुपरिचित व्हावा हे फाउंडेशनचे ध्येय आहे. त्यादृष्टीने मुंबई, पुणे, सातारा, गोवा, कोल्हापूर, सांगली, अहमदनगर या तुलनेने रत्नागिरीला जवळ असणाऱ्या विभागातील धावपट्रंशी संपर्क केला जात आहे. या विभागातील अनेक धावपटूंनी मॅरेथॉनसाठी नोंदणी सुरू केली असून आतापर्यंत १४ ते वर्षे ७० वयाच्या शंभराहून अधिक जणांनी नोंदणी केली आहे. चिपळूण येथील आयर्नमॅन तेजानंद गणपत्ये, गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नऊवारी साडी नेसून ४२ किमी धावण्याचा विक्रम नावावर असलेल्या रत्नागिरीच्या क्रांती साळवी, मुंबईतील प्रसिद्ध धावपटू अनिल कोरवी, वर्षा थेटे, लक्ष्मी झा, बरून संत्रा, डी नेत, मिरनाल सेन, लिली चौहान तसेच विटा येथील प्रसिद्ध धावपटू ट्रायथलिट संग्राम कचरे, सांगलीतील संतोष शिंदे, पुण्यातील सौ. विभावरी सप्रे यांनी आपापल्या विभागांमध्ये या मॅरेथॉनविषयी जनजागृती सुरू केली आहे.
धावनगरी रत्नागिरी मोहिमेत नोंदणी करणाऱ्या रत्नागिरीतील धावपटूंसाठी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या रविवारपासून कोकण कोस्टल मॅरेथॉन प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुरू केला जाणार आहे. नोंदणी केलेल्या प्रत्येकासाठी हे प्रशिक्षण मोफत असेल. चौदा रविवारच्या या प्रशिक्षणानंतर २०२४ वर्षाच्या पहिल्या रविवारी रत्नागिरीतील सहभागी धावपटूंनी ठरवलेले अंतर लीलया पार करावे, हा यामागचा उद्देश आहे.
रन फॉर एज्युकेशन #RunForEducation ही या हाफ मॅरेथॉनची संकल्पना असून त्यामध्ये सहभागी प्रत्येकी १० धावपटूंमागे विज्ञान तंत्रज्ञानाशी निगडित एक पुस्तक जिल्हा परिषदेच्या शाळांना वितरित केले जाणार आहे. खुल्या वयोगटाव्यतिरिक्त ३६ ते ४५, ४६ ते ५५, ५६ ते ६५ आणि ६५ हून अधिक अशा वयोगटानुरूप सुमारे २ लाखाची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. रत्नागिरीकरांनी संपूर्ण जगासाठी आयोजित करायचे ठरवलेल्या या उपक्रमाला पालकमंत्री उदय सामंत यांनी सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले आहे.
पत्रकारपरिषदेला अॅथलेटिक्स असोसिएशनचे संदीप तावडे, रत्नगिरी सायकलिस्ट क्लबचे धीरज पाटकर, रत्नागिरी हॉटेल असोसिएशनचे उपाध्यक्ष उदय लोध, मैत्री ग्रुप ऑफ बिझनेसचे कौस्तुभ सावंत आणि सुहास ठाकूरदेसाई उपस्थित होते.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड