रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वेस्थानक आणि परिसरातील प्रवाशांना लवकरच एसटीची नवी सेवा उपलब्ध होणार असल्याची माहिती एसटीचे रत्नागिरीचे विभागीय व्यवस्थापक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.
महाराष्ट्र ग्राहक पंचायतीच्या रत्नागिरी जिल्हा शाखेतर्फे श्री. बोरसे यांना आज रेल्वे प्रवाशांना एसटीची सुविधा कायमस्वरूपी उपलब्ध होण्याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले. त्यावेळी झालेल्या अनौपचारिक चर्चेत श्री. बोरसे यांनी ही माहिती दिली. ग्राहक पंचायतीच्या निवेदनात म्हटले आहे की, कोकण रेल्वेने मोठ्या प्रमाणावर प्रवासी कोकणात येत असतात. गणेशोत्सवात तर ही संख्या एक लाखापर्यंत पोहोचते. मात्र सर्वच रेल्वे स्थानके वाहतुकीच्या मुख्य मार्गापासून दूरवर आहेत. खेड, चिपळूण आणि रत्नागिरी ही स्थानके एसटी वाहतुकीच्या मार्गाच्या जवळ असली तरी एसटीच्या गाड्या रेल्वे स्थानक मार्गे वळविल्या जात नाहीत. त्यामुळे मुंबईतून येणाऱ्या रेल्वेच्या प्रवाशांना डोक्यावरून बोजे वाहत मुख्य मार्गावरील बस थांब्यावर यावे लागते. मुंबईकडे जाताना मुख्य मार्गावरील बस थांब्यावरून त्याच पद्धतीने रेल्वे स्थानकाकडे जावे लागते. यासाठी प्रामुख्याने खेड, चिपळूण आणि रत्नागिरी रेल्वे स्थानकांच्या जवळून जाणार्या महामार्गावरील एसटीच्या सर्व बस गाड्या रेल्वे स्थानक मार्गाने वळविण्यात याव्यात. सध्या तशी सोय नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. अनेकदा नाइलाजास्तव रिक्षाचे मनमानी भाडे देऊन त्यांना प्रवास करावा लागतो. एसटीने योग्य ती सेवा दिली तर त्यांचा त्रास वाचेलच, पण एसटीच्या उत्पन्नातही नक्कीच भर पडेल. याबाबत एसटीच्या अनेक प्रवाशांकडून ग्राहक पंचायतीकडे विचारणा झाल्याने त्यांच्या वतीने हे निवेदन देत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन सादर केल्यानंतर झालेल्या चर्चेच्या वेळी श्री. बोरसे यांनी सांगितले की, या मागणीची पूर्तता गणेशोत्सवाच्या काळात तरी करण्यात आली आहे. रत्नागिरी स्थानकावर पहाटे पाच वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत एसटीचा नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्याकरिता रेल्वेने मोफत जागा आणि विद्युत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. स्थानकाच्या जवळून महामार्गावरून जाणाऱ्या सर्व एसटी गाड्या रेल्वे स्थानक मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.
श्री. बोरसे म्हणाले, रेल्वेच्या प्रवाशांची गरज लक्षात घेऊन रत्नागिरीपासून रेल्वे स्थानक मार्गे हातखंबा, निवळीपर्यंत ठरावीक तिकीट घेऊन दिवसभरात काही खास फेऱ्या सोडण्याचे नियोजन आहे. एसटीच्या त्या गाड्या विशिष्ट रंगाच्या असतील. त्यामुळे त्या सहज ओळखता येतील. रत्नागिरी शहराप्रमाणेच खेडशी, हातखंबा, निवळी परिसरातील प्रवाशांना रेल्वे स्थानकावर येण्याजाण्यासाठी ही सेवा उपयुक्त ठरेल, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र ग्राहक पंचायतीच्या रत्नागिरी जिल्हा शाखेचे अध्यक्ष संदेश सावंत, सचिव आशीष भालेकर, सहसंघटक उमेश आंबर्डेकर, प्रसिद्धीप्रमुख प्रमोद कोनकर, सदस्य दिलीप कांबळे यांनी हे निवेदन सादर केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

