रत्नागिरी : तुरळ (ता. संगमेश्वर) येथील रस्टिक आर्ट्सने कलात्मक लाकडी वस्तूंचे तीन दिवसांचे प्रदर्शन रत्नागिरीत भरविले आहे. त्याचे उद्घाटन आज झाले.
आजकाल सर्वच वस्तू प्लास्टिकच्या खरेदी करण्याकडे कल दिसतो. परंतु याला छेद देत रस्टिक आर्ट्सने घरात वापरावयाच्या अनेक वस्तू लाकडी बनवण्याचा ट्रेंड आणला आहे. या कलात्मक वस्तूंचे आगळेवेगळे प्रदर्शन मारुती मंदिर येथील कार्निव्हल हॉटेलनजीकच्या शर्वाणी हॉलमध्ये आजपासून सुरू झाले. या प्रदर्शनाचे उद्घाटन इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष राहुल पंडित उपस्थित होते. रस्टिक आर्टसच्या सौ. शिल्पा आणि नितीन करकरे यांनी सर्वांचे स्वागत केले. या प्रसंगी कातळशिल्प शोधकर्ते सुधीर रिसबूड, कॉम्प्युटर कन्सेप्टचे योगेश मुळ्ये ,केबीबीएफचे आनंद मावळंकर, कोकण मीडिया
`चे संपादक प्रमोद कोनकर, सतीश कामत, सौ. मुग्धा ठाकुरदेसाई, सौ. योगिनी मुळ्ये, हॉटेल व्यावसायिक वसंत भणसारी आदी उपस्थित होते.
कोकणी कारागिरांनी हस्तकलेतून साकारलेल्या अनेक प्रकारच्या लाकडी, मातीच्या वस्तू प्रदर्शनात मांडल्या आहेत. सौ. शिल्पा आणि नितीन करकरे गावच्या ओढीने शहरातील व्यवसाय सोडून कोकणात परत आले. त्यांनी तुरळ येथेच ”रस्टिक हॉलिडे” हा होम स्टे सुरू केला. त्यानंतर आसपासच्या कारागिरांशी परिचय झाला. त्यातून या दांपत्याने कोकणी हस्तकलेच्या लाकडी वस्तू बनवण्याचे ठरवले. त्यानंतर ”रस्टिक आर्ट्स” हे कला दालन सुरू केले. या प्रदर्शनात लाकडी खुर्च्या, टेबल्स, झोपाळे, तीन पायांचे स्टूल, फोल्डिंगच्या खुर्च्या, चमचे, विळी, कांदे-बटाटे ठेवण्यासाठी लाकडी मांडणी, की होल्डर, पेनस्टॅंड, टिशू पेपर बॉक्स, मातीची भांडी अशा अनेक वस्तू आहेत.

कोकणातील कारागिरांनी बनवलेल्या नेहमी वापरता येतील अशा अनेक विविध वस्तूंनी सजलेले हे दालन पाहून कोकणच्या कलेच्या प्रसाराला साथ द्यावी, असे आवाहन सौ. शिल्पा करकरे यांनी यावेळी केले. हे प्रदर्शन शर्वाणी हॉल येथे १७ सप्टेंबरपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत खुले राहणार आहे.
अधिक माहितीसाठी ९८९२५८४३३२ किंवा ९८६७२११३२२ मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा.



