आचरे (मालवण) : सावंतवाडीतील छात्र प्रबोधन मंडळाचा कै. वसंतराव गोविंदशेठ केसरकर स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार येथील निवृत्त शिक्षक सुरेश ठाकूर यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
छात्र प्रबोधन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ठाकूर गुरुजींच्या आचरे येथील “श्यामसुंदर” या त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख पाच हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.
सत्काराला उत्तर देताना श्री. ठाकूर म्हणाले, मला शैक्षणिक क्षेत्रात ४० वर्षे सेवा करीत असताना अनेक मानाचे पुरस्कार लाभले. सेवानिवृत्तीनंतर गेली दहा वर्षे कथामाला आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचा मालवण तालुकाध्यक्ष म्हणून कार्य करीत असतानाही दिग्गज मान्यवरांकडून गौरव झाला. पण छात्र प्रबोधन मंडळाचा कै. वसंतराव गोविंदशेठ केसरकर स्मृती पुरस्कार छात्र प्रबोधन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी माझ्या घरी येऊन मला प्रदान केला. त्याचे मोल मला शब्दांत व्यक्त करता येणार नाही. पुरस्कार माझा उत्साह वाढविणारा असल्याचे सांगून श्री. ठाकूर म्हणाले की, पुरस्काराच्या रकमेत स्वतःचे एक हजार एकशे अकरा रुपये घालून तो निधी मी साने गुरुजी कथामाला मालवणच्या कथाकथन शिबिरासाठी खर्च करणार आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य नवीन शैक्षणिक धोरण सुकाणू समितीचे सदस्य भरत गावडे, विकास गोवेकर, अरविंद सरनोबत, माजी सैनिक लक्ष्मणराव राणे आदी छात्र प्रबोधन मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी श्री. गावडे म्हणाले, “सेवानिवृत्त झाल्यावरही शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यात सदैव झोकून काम करणाऱ्या ठाकूर गुरुजींना पुरस्कार प्रदान करीत असताना छात्र प्रबोधन मंडळाच्या कार्यकर्त्यांना अत्यानंद होत आहे.”
विकास गोवेकर यांनी पुरस्काराविषयी माहिती दिली. गेली ४० वर्षे सुरेश ठाकूर यांचे कार्य आपण जवळून अनुभवले, असे ते म्हणाले. छात्र प्रबोधन मंडळातर्फे अरविंद सरनोबत यांनी आभार मानले. ठाकूर कुटुंबीयांच्या वतीने समीर ठाकूर यांनी छात्र प्रबोधन मंडळाचे आभार मानले.
या सोहळ्याला सौ. वीणा ठाकूर, सतीश ठाकूर, सौ. छाया ठाकूर, सौ. साक्षी ठाकूर, सौ. रुची ठाकूर, सीमा यशवंत ठाकूर आदी ठाकूर कुटुंबीय उपस्थित होते.


