प्राथमिक, माध्यमिक शाळांना सलग दोन दिवस सुट्टी

रत्नागिरी : जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना गुरुवारी (दि. २८ सप्टेंबर) अनंत चतुर्दशीची आणि शुक्रवारी (दि. २९ सप्टेंबर) ईद ए मिलादची सुट्टी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी याबाबत सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, २२ जून २०२३ रोजीच्या पत्रानुसार २०२३ -२४ या शैक्षणिक वर्षाकरिता जिल्ह्यातील मराठी, उर्दू आणि खासगी प्राथमिक शाळांच्या किरकोळ व मोठ्या सुट्टयांबाबत परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलादची सुट्टी जाहीर करण्यात आली होती. परंतु शासनाने आज अधिसूचना जारी करुन ईद ए मिलादची सुट्टी २८ सप्टेंबरऐवजी २९ सप्टेंबर रोजी जाहीर केली आहे.

त्यानुसार जिल्ह्यातील मराठी, उर्दू आणि खासगी प्राथमिक शाळांना २८ रोजी अनंत चतुर्दशीची, तर २९ रोजी “ईद ए मिलाद”ची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र या शैक्षणिक वर्षाकरिता जाहीर केलेल्या सुट्ट्यांचे दिवस वाढत असल्याने दिवस भरून काढण्यासंदर्भात स्वतंत्र आदेश काढण्यात येईल आणि शनिवारी, ३० सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील मराठी, उर्दू आणि खासगी प्राथमिक शाळा नियमित वेळेनुसार सुरू राहतील.

शासकीय कार्यालये पाच दिवस बंद

दरवर्षी अनंत चतुर्दशीसाठी स्थानिक सुट्टी जिल्हाधिकाऱ्यांकडून जाहीर केली जाते. यावर्षी गुरुवारी, २८ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी जाहीर होती. मात्र त्यात बदल करून गुरुवारऐवजी शुक्रवारी ईदची सुट्टी जाहीर केल्याची अधिसूचना आज शासनाने जारी केली. त्यामुळे गुरुवारी अनंत चतुर्दशीला सुट्टी नव्हती. त्या सुट्टीसाठी कर्मचारी/नागरिकांनी पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांना विनंती केली होती. त्यानुसार पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून सुट्टीबाबत सूचना केली. त्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी, २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीदशीनिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शासकीय कार्यालये गुरुवारपासून सोमवारपर्यंत सलग पाच दिवस बंद राहणार आहेत. गुरुवारी, २८ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी, दुसऱ्या दिवशी ईद-ए-मिलाद, त्यानंतर शनिवार-रविवार, तर सोमवारी २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने शासकीय कार्यालये बंद राहणार आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply