लांजा : कोकणातील निसर्गरम्य लांजा तालुका वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळांनी समृद्ध असून कोकण पर्यटनात लांज्याला मानाचे स्थान मिळवून देऊ या, असे आवाहन कोकण पर्यटन अभ्यासक आणि रत्नसिंधु टुरिझमचे संचालक प्रा. विजय हटकर यांनी येथे केले.
दरवर्षी २७ सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी संयुक्त राष्ट्रांतील विविध पर्यटन विकास मंडळे विविध उपक्रम हाती घेत, पर्यटन विकास, सोयीसुविधा, सुलभता यासंदर्भात जागृती करीत असतात. यासाठी नवनवीन संकल्पना राबविण्यात येतात. यावर्षी पर्यटन आणि हरित गुंतवणूक ही संकल्पना राबविली जात आहे. या पार्श्वभूमीवर लांजा येथील कल्पना कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटने पर्यटन सप्ताहाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्ताने कोकण आणि पर्यटन या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत प्रा. हटकर बोलत होते. ते म्हणाले, कोकण प्रदेश समृद्ध वनश्रीने नटलेला असून नद्या, डोंगर, गड-दुर्ग, सुंदर समुद्रकिनारे, जैवविविधता, रुचकर खाद्यसंस्कृती, वैविध्यपूर्ण संस्कृतीने तो परिपूर्ण आहे. आगामी दशकात मोठ्या प्रमाणात पर्यटन क्षेत्रातील संधी कोकणात उपलब्ध होणार आहेत. याची विद्यार्थ्यांना माहिती असणे आवश्यक आहे.
प्रा. हटकर यांनी कोकणातील सध्याची पर्यटनाची स्थिती, भविष्यातील वाटचाल, त्यातील संधी, आव्हाने आणि पर्यटन व्यवसाय तसेच लांजा तालुक्यातील वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळांची अभ्यासपूर्ण माहिती दिली. लांजा तालुक्यातील दोनशे वर्षांपूर्वीच्या कोकणातील गावाची प्रतिकृती असलेले थंड हवेचे ठिकाण माचाळ, जावडे येथील ऐतिहासिक ब्राह्मणी लेणी, रणरागिणी लक्ष्मीबाईचे सासर असलेल्या कोट गावातील कातळशिल्प समूह, ऐतिहासिक- सांस्कृतिक-हरित वनश्रीने परिपूर्ण डेस्टिनेशन प्रभानवल्ली-खोरनिनको परिसरातील ऐतिहासिक वारसा यांचा आढावा त्यांनी घेतला. कोकणातील आत्मनिर्भर बनू पाहणाऱ्या तरुणाईने नोकरीच्या मागे न धावता स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवत दुर्दम्य इच्छाशक्ती, सकारात्मकता, मेहनतीच्या जोरावर उद्यमशील कल्पनांना बळ द्यावे. त्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग करावा असे आवाहन त्यांनी केले. सोबत UNWTO च्या यंदाच्या थीमप्रमाणे हरित शाश्वत कोकणच्या रक्षणासाठी इथल्या लाल मातीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने कटिबद्ध झाले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
पर्यटन सप्ताहाचा भाग असलेल्या रांगोळी स्पर्धेत अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये जागतिक पर्यटन दिन या विषयावर विद्यार्थ्यांनी सुबक रांगोळ्या काढल्या होत्या. कार्यक्रमाला कल्पना असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश चव्हाण, प्राचार्य विकी पवार, प्राध्यापिका धनश्री बंडबे, प्राध्यापिका अंकिता चव्हाण, प्राध्यापिका उर्मिला माजळकर, तसेच सर्व शाखांचे विद्यार्थी उपस्थित होते.


