रत्नागिरी : उत्तम वक्ता होण्यासाठी आधी उत्तम श्रोता होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आणि लेखक ॲड. विलास पाटणे यांनी केले.
भारत शिक्षण मंडळातर्फे गुरुवर्य अच्युतराव पटवर्धन स्मृती वक्ता दशसहस्रेषु जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी अॅड. पाटणे म्हणाले की, वक्तृत्व हे शास्त्र आणि कला आहे. वाचन, स्मरणशक्ती, निरीक्षण, भाषेवर प्रभुत्व, आत्मविश्वास यातून विचारांचे संस्कार आणि व्यासंगाचे प्रकटीकरण होते. वक्ता आधी स्वतःशी विचार करतो आणि त्याचवेळी श्रोत्यांशी संवाद साधत असतो. हातात कोणते पुस्तक आहे आणि ओठावर कोणती गाणी आहेत यावर त्या देशाची संस्कृती ओळखता येते आणि त्यातूनच देश घडत असतो. फिनलंडच्या शिक्षण व्यवस्थेतून जगातील सर्वाधिक हुशार मुले बाहेर पडतात. कारण विद्यार्थी परीक्षेच्या चक्रव्यूहात न अडकता ज्ञानवादी शिक्षणाच्या रचनेतून व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे घेतात. भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था अवकाश विज्ञानाच्या संशोधनासाठी आहे. विद्यापीठ केरळमधील तिरुवनंतपुरम येथे आहे. इस्रोमध्ये दक्षिण भारतीय जास्त दिसतात. मराठी मुले यात नाहीत, याची खंत अधिक आहे . या करियरमधील भौतिकशास्त्र आणि तंत्रज्ञानाचे क्षेत्र विस्तारत असून तरुणांना खुणावते आहे. परंतु आपल्या पुढील पिढीत इस्रोच्या मंगलयान वा शुक्र मिशनमध्ये मराठी मुले दिसण्याकरिता त्यांची पावले “आयआयएसटी”च्या दिशेने पडली पाहिजेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत शिक्षण मंडळाचे विश्वस्त चंद्रशेखर करंदीकर होते. उपकार्याध्यक्ष श्रीराम भावे, स्पर्धा प्रमुख संदीप कांबळे, पत्रकार मनोज मुळ्ये, नथुराम देवळेकर, महेश मुळ्ये, संजना तारी यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. स्पर्धेला जिल्हाभरातून स्पर्धकांनी चांगला प्रतिसाद दिला. सूत्रसंचालन कौस्तुभ पालकर यांनी केले.
स्पर्धेचा गुणानुक्रमे निकाल असा – सहावी ते आठवी- तपस्या बोरकर, आर्या यादव, श्रीरंग जोशी, उत्तेजनार्थ- कल्याणी साठ्ये, श्रेया मेस्त्री. नववी ते बारावी- स्वानंदी शेंबवणेकर, सानिया यादव, अथर्व तेंडुलकर,
उत्तेजनार्थ- यज्ञा सप्रे, सोहम नारकर. वरिष्ठ महाविद्यालय गट- वंशिता भाटकर, सिद्धी पवार, ओंकार आठवले, उत्तेजनार्थ- सौरभ चौगुले, सौरभ आग्रे. शिक्षक गट- इम्तियाज सिद्दिकी, प्रांजल मोहिते, बाबासाहेब लाड, उत्तेजनार्थ- सौ. सोनाली खर्चे, प्राची राव.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

