रत्नागिरी : रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे रोलर कोस्टर सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन येत्या २९ ऑक्टोबरला करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्याचे सायकल संमेलन उत्साहात आणि यशस्वी करणाऱ्या रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने आयोजित केलेली ही स्पर्धा सकाळी ६ वाजता भाट्ये येथून सुरू होऊन कसोप, फणसोप, वायंगणी, गोळप, पावस, मेर्वी, गावखडी या मार्गावरून पुन्हा याच मार्गाने भाट्यात संपणार आहे. एकूण ४८ किलोमीटरचे हे अंतर असून यात राज्यभरातून नामवंत सायकलपटू सहभागी होणार आहेत. जो दिमाग से खेलेगा वही जितेगा असे स्पर्धेचे घोषवाक्य आहे.
सायकल प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने रोलर कोस्टर सायक्लोथॉनचे आयोजन केले आहे. पुरुष खुला (एलाइट), महिला (खुला गट) तसेच ४० वर्षांवरील पुरुष (मास्टर) असे गट आहेत. अनुक्रमे पहिल्या १०, ७, ७ विजेत्या स्पर्धकांना बक्षीस दिले जाणार असून बक्षिसांची एकूण रक्कम एक लाख रुपयांहून अधिक आहे. जे सायकलिस्ट सायक्लोथॉन पूर्ण करतील, त्यांना आकर्षक फिनिशर मेडल देऊन त्यांचे कौतुक करण्यात येणार आहे.
पुरुषांच्या खुल्या (एलाइट) गटासाठी प्रथम २१ हजार, द्वितीय १५ हजार, तृतीय १० हजार रुपये आणि ४ ते १० क्रमांकांच्या विजेत्यांना रोख बक्षीस व मेडल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पुरुषांच्या ४० वर्षांवरील (मास्टर) विजेत्याला १२ हजार रुपये, द्वितीय ६ हजार रुपये, तृतीय ३ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार असून पुढील ४ ते ७ क्रमांकांनाही रोख बक्षीस व मेडल देऊन सन्मानित करण्यात येईल. महिलांच्या खुल्या गटासाठी प्रथम बक्षीस १० हजार रुपये, द्वितीय ५ हजार रुपये, तृतीय ३ हजार रुपये आणि ४ ते ७ क्रमांकांसाठी रोख बक्षीस आणि मेडल प्रदान करण्यात येणार आहे.
स्पर्धकांसाठी आदल्या दिवशीचे जेवण, सायक्लोथॉनच्या दरम्यान हायड्रेशन पॉइंटची सुविधा, नाश्ता, मार्गावर मदत, रुग्णवाहिका, वैद्यकीय मदत आदींची सोय करण्यात आली आहे. स्पर्धेच्या मार्गावर भाट्ये समुद्रकिनारा, गोळपला गजानन महाराज मंदिर, पावसला स्वामी स्वरूपानंद मंदिर, पूर्णगड किल्ला, गावखडीत श्री देव रामेश्वर मंदिर, गावखडी समुद्रकिनारा अशी निसर्गरम्य ठिकाणे आहेत.
रत्नागिरीचे सायकलिस्ट यात भाग घेणार आहेतच. पण बाहेरच्या सायकलिस्टनी रत्नागिरीमधे २८ ऑक्टोबरला येऊन रत्नागिरीमध्ये सायकल टुरिंगचादेखील आनंद घ्यावा, अशी अपेक्षा आहे. त्यांना सायकल डेस्टिनेशनबद्दल माहिती दिली जाणार आहे. स्पर्धकांची रात्री राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली आहे. रत्नागिरीच्या रस्त्यांवर सायकल चालवताना बघून आदर्श जीवनशैलीमध्ये सायकलचा वापर किती महत्त्वाचा आहे, याचे उदाहरण सामान्य नागरिकांना पाहायला मिळेल आणि त्यामुळे सायकलिंगबाबत आकर्षण वाढण्यास मदत होईल.
स्पर्धेच्या नावनोंदणी व अधिक माहितीसाठी एसआर अमित कवितके (8275655111), एसआर डॉ. नितीन सनगर (9689866099), एसआर महेश सावंत (9422453241), दर्शन जाधव (9970398242) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने केले आहे.
स्पर्धेची नोंदणी पुढील लिंकवरही करता येऊ शकेल – https://events.fitasf.com/product/rcc2023
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

