रत्नागिरी : रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाने येत्या शनिवारी (दि. ७ ऑक्टोबर) अनेक प्रतिथयश लेखकांबरोबर संवाद कार्यक्रम आयोजित केला आहे.
‘जग बदलणारे ग्रंथ’ या ५० ग्रंथांचा संक्षिप्त सारांश लिहिणार्या, तसेच जीनिअस -१२ सारख्या पुस्तक मालिकांनी सोप्या भाषेतील विज्ञानाचे नवे दालन वाचकांना उपलब्ध करून देणार्या व्यासंगी लेखिका दीपा देशमुख, प्रबोधनात्मक व स्त्रियांच्या समस्या हाताळणारे मासिक म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या ‘आकांक्षा’ या मासिकाच्या संपादिका अरुणा सबाने, मानसशास्त्र, विज्ञान, आरोग्य, शिक्षण, अंधश्रद्धाविरोधी पुस्तके असे विविध विषयांवरील पुस्तकांचे प्रकाशन करून पुस्तकविश्वात सुप्रसिद्ध असलेल्या मनोविकास प्रकाशनाचे प्रकाशक अरविंद पाटकर, विज्ञान प्रचारक आणि लेखक नितिन हांडे व मुंबई नगरीचा सात बेटे असल्यापासून किंबहुना त्याही आधीपासून आजवरचा सारा प्रवास शोधून तो शब्दबद्ध करणारे ‘अज्ञात मुंबई -कहाणी मुंबईच्या ऐतिहासिक पाऊलखुणांची’ या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे असे प्रतिथयश लेखक रत्नागिरीकरांच्या भेटीला येत आहेत.
एकाचवेळी पाच प्रथितयश लेखक-प्रकाशक एकत्र भेटीचा योग या संवाद कार्यक्रमामुळे जूळून येणार असून ही साहित्यिक मेजवानी रसिक प्रेक्षकांना वेगळ्याच साहित्य विश्वात घेऊन जाईल. या पाच साहित्यिकांना प्रश्न विचारत त्यांच्याशी संवाद साधता येणार आहे. हा संवाद सुलभ व्हावा यासाठी प्रसिद्ध साहित्यिक अभिजित हेगशेट्ये हे संवादक म्हणून लाभणार आहेत.
या संवाद कार्यक्रमाला शनिवारी, ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय सभागृहात उपस्थित राहावे, असे आग्रही निमंत्रण वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक म. पटवर्धन यांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

