नौदलाच्या गणवेशावर लवकरच शिवराजमुद्रेचे मानचिन्ह : नरेंद्र मोदी

मालवण : भारतीय नौदलाच्या गणवेशावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेपासून प्रेरित मानचिन्हांचा समावेश केला जाणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (४ डिसेंबर २०२३) येथे सांगितले.

नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण झाले. त्यानंतर तारकर्ली (मालवण) येथे झालेल्या समारंभात ते बोलत होते.

भारतीय नौसेनेचा बावन्नावा नौसेना दिन आज तारकर्ली (मालवण) येथे साजरा करण्यात आला. नौदल तळाव्यतिरिक्त पहिल्यांदाच अन्य ठिकाणी नौदल दिन प्रथमच साजरा झाला. त्यावेळी श्री. मोदी बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज हे आरमाराचे जनक आहेत. त्यामुळे त्यांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ यंदाचा नौसेना दिन साजरा केला जात आहे. समुद्रावर नियंत्रण ठेवणारा शासक हा सर्वशक्तीमान असतो हे छत्रपती शिवाजी महाराजाचे तत्त्व होते. जेथे भारतीय आरमाराचा जन्म झाला त्या ठिकाणी नौदल दिवस साजरा करत असल्याचा विशेष आनंद असल्याचे सांगत त्यांनी सगळ्यांना नौसेना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

देश गुलामीची मानसिकता सोडून पुढे जात असल्याचेही पंतप्रधान म्हणाले. उज्ज्वल भविष्याच्या मार्गावर चालताना लोकांनी नकारात्मक राजकारणाला सोडले आहे. भारतीय इतिहास हा केवळ १ हजार वर्षांच्या गुलामगिरीचा नाही, तर तो शौर्य, कला, सामर्थ्य, ज्ञान आणि विज्ञानाचा आहे. भारत नील अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देत आहे. सागरमाला, मेरिटाइम व्हिजनच्या माध्यमातून काम करत असून गेल्या ९ वर्षांत समुद्र किनाऱ्यांवरच्या व्यापारात ८० पट वाढ झाली आहे. समुद्रकिनाऱ्यांवरच्या गावांच्या विकासाला आपले सरकार प्राधान्य देत असून २०१४ पासून मासेमारीमध्ये ८० टक्के वाढ झाल्याचे ते म्हणाले. मच्छिमारांनाही ५ लाख रुपयांचे विम्याचे कवच देण्यात आले असून त्यांनाही किसान क्रेडिट कार्डचा लाभ मिळत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

मत्स्य उत्पादन प्रक्रियां उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा त्याचप्रमाणे बंदरे आणि समुद्रकिनाऱ्याच्या विकासाबरोबरच कोकणाच्या विकासासाठीही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागाच्या विकासासाठी राबवण्यात येत असलेल्या अनेक योजनांची माहितीही नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली.

यावेळी नौदलाच्या सामर्थ्याचे दर्शन घडवणारी थरारक प्रात्यक्षिके नौदलाने सादर केली. त्यात २० लढाऊ जहाजे, मिग-२९ सह ४० लढाऊ विमाने, विक्रमादित्य विमानवाहू नौका सहभागी झाल्या होत्या.

यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीदेखील नौदल दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्य मंत्रिमंडळातील अन्य सदस्य तसेच नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरिकुमार आदी मान्यवर उपस्थित होते.

सिंधुदुर्ग किल्ल्यावर झालेला लेझर शोसुद्धा सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडून गेला. या सोहळ्याला सिंधुदुर्ग जिल्हावासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकोट (सिंधुदुर्ग) येथील कार्यक्रमाचा व्हिडीओ

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply