गोपाळबाबा वलंगकर साहित्यनगरी (रत्नागिरी) : साहित्याची निर्मिती करताना केवळ करमणूक करणारे साहित्य अपेक्षित नसून समाजाच्या नवनिर्मितीसाठी पूरक असलेल्या साहित्याची निर्मिती व्हावी, अशी अपेक्षा पहिल्या प्रगतिशील साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अॅड. सुभाष लांडे यांनी व्यक्त केली.
तीन दिवस रत्नागिरीत सुरू असलेल्या साहित्य संमेलनात वैचारिक मंथन असणारे परिसंवाद आयोजित करण्यात आले. त्यातून अनेकांना काही ना काही गवसले. प्रगतिशील लेखक संघ (महाराष्ट्र) आणि रत्नागिरीतील एस. पी. महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हे साहित्य संमेलन पार पडले. संमेलनाच्या समारोप समारंभात व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर, स्वागताध्यक्ष आणि नवनिर्माण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, प्रगतिशील लेखक संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. जी. के. ऐनापुरे, सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका तसेच समोराप कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या नीरा आडारकर, हिंदी कवी, कथाकार कुमार अम्बुज उपस्थित होते.
प्रगतिशील लेखक संघाने आजपर्यंत असे साहित्यिक निर्माण केले की त्यांच्या नावाचा गवगवा आजही असल्याचे सांगत अॅड. लांडे यांनी साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले. स्वागताध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी तीन दिवसांच्या साहित्य संमेलनाचा आढावा घेऊन संमेलन यशस्वी करण्याचे शिवधनुष्य पेलताना सगळ्यांचेच सहकार्य लाभल्याचे नमूद केले. यावेळी त्यांनी विचारांची ताकद मोठी असल्याचे सांगत निराश, दु:खी न होता दु:खावर स्वार होणे हाच एकमेव उपाय असल्याचा सल्ला दिला. सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका नीरा आडारकर यांनी कोकणच्या इतिहासाचा, मुंबईतील गिरण्यांचा थोडक्यात आढावा घेतला.
संमेलनाचे अध्यक्ष डॉ. मुणगेकर यांनी दोन दिवस वेगवेगळ्या परिसंवादांच्या निमित्ताने वादळी चर्चा झाल्याचे सांगत प्रेमचंद मुन्शी यांचे पाईक होण्याचे भाग्य मला लाभले. ज्या नवनिर्माण शिक्षण संस्थेला मी परवानगी दिली, त्या महाविद्यालयात हे साहित्य संमेलन झाले आणि त्याचा अध्यक्ष होण्याची संधी मला मिळाली, हा एक विलक्षण योगायोग असल्याचे सांगितले. अनेक गोष्टींचा परामर्श घेतानाच त्यांनी कोकणाला ७२० किमीचा समुद्रकिनारा आणि त्याचे मत्सबीज केंद्रे, विद्यापीठ नागपूरला हे आश्चर्य असल्याचे म्हटले. येत्या लोकसभा निवडणुकीपर्यंत नवफॅसिझम आपल्या घरात येणार असल्याचे म्हणत त्यांनी आपल्यासमोर आव्हान मोठे आहे, त्यामुळे एकमेकांना दुषणे न देता सर्वांनी एकत्र येण्याची भूमिका घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

