रत्नागिरी : रत्नागिरीमधील पत्रकार मकरंद पटवर्धन यांना त्यांच्या पत्रकारिता आणि सामाजिक योगदानाबद्दल येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या एनएसएस विभागातर्फे सन्मानित करण्यात आले.
कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या बारावीतील स्वयंसेवकांचा सदिच्छा समारंभ पार पडला. राधाबाई शेट्ये सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात श्री. पटवर्धन यांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजनेतून बाहेर पडलेल्या आणि समाजामध्ये चांगले काम करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा दरवर्षी सन्मान करण्यात येतो. यावर्षी श्री. पटवर्धन यांचा सन्मान केल्याचे यावेळी सांगण्यात आले.
समारंभात अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर म्हणाले, आपल्या महाविद्यालयात एनएसएसचे काटेकोर नियोजन व उत्तम कार्यक्रम सुरू आहेत. विद्यार्थ्यांनी नेहमी कोणत्याही क्षेत्रात काम करताना सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करावा. तुमचे समाजासाठी योगदान असेलच. आयुष्यात सर्व प्रकारच्या परीक्षांना शांतपणे धीरोदात्तपणे सामोरे जा. एनएसएस बंधुभावाला कधीही विसरू नका. महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करा.
यावेळी व्यासपीठावर कला विभागप्रमुख प्रा. वैभव कानिटकर, विज्ञान विभागप्रमुख प्रा. दिलीप शिंगाडे, एनएसएसचे माजी कार्यक्रमाधिकारी प्रा. प्रभात कोकजे, कार्यक्रमाधिकारी प्रा. निनाद तेंडुलकर, प्रा. अनुष्का टिकेकर, प्रा. अभिजित भिडे, प्रा. अन्वी कोळंबेकर उपस्थित होते.
प्रा. कानिटकर यांनी सांगितले की, महाविद्यालयात प्रवेश एनएसएसच्या शिबिरामध्ये व्यक्तिमत्त्व विकास, तडजोड, नियोजन अशा सर्वच गोष्टी शिकायला मिळतात. एका वारकऱ्याला दुसरा वारकरी भेटल्यानंतर जसा आनंद होतो, तसाच आनंद एनएसएसचे माजी विद्यार्थी एकमेकांना भेटल्यानंतर होतो.
याप्रसंगी बारावीमधील स्वयंसेवकांना दोन वर्षांच्या कामगिरीबद्दल भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालयाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. स्वयंसेवकांनी आपल्या मनोगतामध्ये एनएसएसचे त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासातील योगदान स्पष्ट केले आणि आपल्या देशाविषयी आणि समाजाविषयी असलेले कर्तव्य कळल्याच्या भावना व्यक्त केल्या.
स्वागत आणि प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. निनाद तेंडुलकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अन्वी कोळंबेकर यांनी केले. आभार सहकार्यक्रमाधिकारी प्रा. अभिजित भिडे यांनी मानले.
Follow Kokan Media on Social Media

