महाशिवरात्रीनिमित्ताने कुणकेश्वर (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) मंदिरातील यात्रेविषयीचे स्मरणरंजन.
कुणकेश्वरास आम्ही फार पूर्वीपासून ‘कुणकोबा’ म्हणतो. आता नोकरीनिमित्त बाहेर असलो तरी बालपणात मात्र मी कधी कुणकोबाची जत्रा चुकविली नाही.
आमच्या घरातील सर्वच तसे आधीपासूनच शिवभक्त. आमच्या घरानजीक असलेल्या महापुरुषासही आम्ही शिवशंकराच्याच रूपात पाहतो. दर सोमवारी त्याची पूजाअर्चा करतो, दररोज दिवाबत्ती करतो. आमच्या घराण्याने ही परंपरा आजही अव्याहत सुरू ठेवली आहे. बालपणात मात्र कुणकेश्वराला जाण्यासाठी फार मोठे दिव्य पार करावे लागायचे. महाशिवरात्रीस कुणकेश्वराला जाऊन कुणकोबाचे दर्शन घेण्यापेक्षा तेथील जत्रेत आम्हाला अधिक रस असायचा. पीर्वी कुणकेश्वरात जाण्यासाठी धड रस्ते नव्हते. खाक्षीची घाटी तर अनेकांच्या मनात भयकंप करायची. त्या घाटीचे भय दाखवून माझा बाबा मला जत्रेस जाण्यापासून परावृत्त करायचा. मात्र तरीही हट्टास पेटून मी त्या जत्रेस जायचोच.
कुणकोबाचे देवस्थान मुळात स्वयंभू आहे. कुणकोबाबद्दल काही आख्यायिकाही प्रसिद्ध आहेत. माझा बाबा तर कुणकेश्वराचा उल्लेख ‘दक्षिण काशी’ असाच करायचा. कुणकोबाची जत्रा तशी आधीपासूनच फार प्रसिद्ध आहे. कारण आम्ही बालपणात पाहिलेय, महाशिवरात्रीदिवशी लाखो भाविक या जत्रेसाठी कुणकोबाकडे धाव घेतात. कुणकेश्वर मंदिर परिसरात बोट शिरण्याएवढीही जागा शिल्लक राहत नाही. अनेक गावांतून या जत्रेस येण्यासाठी एसटी बस उपलब्ध असतात. याशिवाय खासगी बस, इतर वाहनांतूनही अनेक भक्तगण कुणकोबाच्या दर्शनासाठी येतात. मी आचरामार्गे कुणकेश्वरात अनेकदा गेलो आहे. अगदी आजही वर्षातून किमान दोन ते तीन वेळा माझी पावले कुणकोबाकडे वळतात. कुणकोबाचे मंदिर तर अतिरम्य आहेच, पण मंदिराजवळचा परिसर, समुद्रकिनाराही नितांत सुंदर आहे. कुणकेश्वराच्या वाटेतील हापूसच्या बागा, सपाट कातळ, कौलारू घरे, मिठबावची खाडी, मुणग्यातली भगवती यांचेही दर्शन यानिमित्ताने घडते. येथून जवळच असलेला दाभोळे येथील पोखरबाव गणपती आणि तेथील परिसर नक्कीच पाहण्यासारखा आहे.
पूर्वी गावोगावच्या वार्षिक जत्रा म्हणजे आजच्या काळातील ‘भव्य मॉल’ म्हणावे लागतील. कारण जवळपास वर्षभरासाठी लागणारे जिन्नस, मालाची दुकाने जत्रेत असत, आताही असतात. शेतकऱ्यांच्या अवजारांपासून ते स्थानिक शेतमालाच्या उत्पादनांची दुकाने मोठ्या संख्येने जत्रेत असतात. याशिवाय कपडे, सौंदर्य प्रसाधने, खेळणी, फुगे, पेपेरी यांसारख्या दुकानांतही ग्राहकांची गर्दी होते. पूर्वी फुगे फोडणे, रिंग टाकणे, सोरट यांसारखे खेळही जत्रेत असत. एखाद्या वजनदार आणि भारदस्त वस्तूभोवती रिंग अचूक पडली तर ती वस्तू रिंग टाकणाऱ्यास फुकट मिळे. नाहीतर मग साबण, पावडरचा डबा, बिस्किट पुडा, माचीसचा खोका अशाही स्वस्त वस्तू मिळत. मी अनेकदा अशा मोठ्या वस्तूंवर रिंग टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पण आतापर्यंत मी कधी साबणाच्या वडीपलीकडे जाऊ शकलो नाही.
कुणकोबाच्या जत्रेत संपूर्ण कोकणातूनच नाही तर महाराष्ट्रातून, अगदी जगभरातून भक्तजन येतात. मला अशाच जत्रेत अनेकदा बालपणापासून पुढे कितीतरी वर्षांत न भेटलेले वर्गमित्र भेटले आहेत. कधी कधी आपल्या परिचयाचे सगेसोयरे, नातेवाईकही जत्रेत भेटतात. अशा अकस्मात होणाऱ्या भेटींचा कर्ता करविता तो कुणकोबाच असतो, असे म्हणावे लागेल.
जत्रेदिवशी नाही, पण इतर दिवशी मात्र थेट गाभाऱ्यात जाऊन कुणकोबाचे दर्शन घेता येते. त्याचा गाभारा अगदी प्रसन्न दिसतो. कुणकोबाचे रूप न्याहाळतताना तन, मन धन्य होते. कुणकोबाच्या प्रांगणात असलेली इतर देवतांची पेशवेकालीन मंदिरेही फार सुंदर आहेत. कुणकोबाच्या मंदिराची रचना मनास फार भावणारी आहे.
कधी कधी जत्रेनिमित्त कुणकोबाचे दर्शन होत असले तरी गावी गेल्यावर तेथील मुक्कामात कुणकोबाकडे जाऊन आल्याशिवाय आमचा परतीचा प्रवास सुरू होत नाही. कोकणातील काही स्वयंभू देवस्थानांपैकी एक मुख्य देवस्थान असलेला कुणकोबा आमच्या गावापासून फारसा दूर नाही, याचा मला नेहमीच अभिमान वाटतो. कधी गप्पांच्या विषयात कुणकोबा आला तर “कुणकोबा काय… आमच्या गावापासून चार पावलांवर!” असे म्हणत मी त्यांना दाखवून देतो की मी कुणकोबाच्या किती जवळचा आहे! कुणकोबाची जत्रा तर महाराष्ट्रात काही प्रसिद्ध जत्रांपैकी एक जत्रा आहे. या जत्रेच्या माध्यमातून कोकणात फार मोठा ‘टर्न ओव्हर’ होतो, याचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. शेतीमाल, हॉटेल्स, कपडे, खेळणी, वाहतूक, निवास, इतर व्यावसायिकांनाही कुणकोबाच्या जत्रेच्या निमित्ताने चार पैसे मिळतात. कुणकोबा अशा कष्टकऱ्यांची थोडीफार सुखावह वाटावी, अशी सोय करून देतो. कुणकोबाच्या जत्रेदिवशी फार लांबून लांबून लोक येतात. त्या दिवशी कुठल्याही गावात बघा, “पाऊले चालती, कुणकोबाची वाट…” असेच चित्र दिसते.
भक्तांच्या हाकेस धावणारा, भक्तांची संकटे दूर करणारा कुणकोबा असा समुद्र तटावर ठाम उभा राहून आपल्या कोकण भूमीचे रक्षण करीत आहे म्हणूनच आपली कोकणभूमी सुरक्षित आहे, याची जाणीव कुणकोबाकडे गेल्यावर निश्चितच होत राहते.
बाबू घाडीगावकर,
जालगाव, दापोली.
(संपर्क – ९४२१७९५९५५)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड







