सिंधुदुर्गातून हापूसची पहिली पेटी मुंबईला रवाना

देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर-चांदेलवाडी (ता. देवगड) येथील आंबा बागायतदार शंकर नाणेरकर यांच्या पाच डझनी आंब्याच्या दोन पेट्या नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी रवाना झाल्या आहेत. यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आंब्याची पेटी पहिली पाठविण्याचा मान त्यांनी मिळविला आहे.

गेल्या ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यांच्या काळात हापूसचा मोहर टिकवून आंबा उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग दरवर्षी काही निवडक आंबा बागायतदार करतात. पावसाळ्यात आलेला मोहर टिकवून त्याची योग्य निगा राखत आंबा उत्पादन मिळविणे कठीण असते. त्यासाठी रासायनिक औषधांची विशिष्ट मात्रा द्यावी लागते. प्रयोगातूनच अशा प्रकारे हंगामापूर्वी आंबा मिळविणे हे एक कौशल्य असते. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. अजूनही वातावरणात बदल घडत आहेत. त्यामुळे यंदाचा हंगाम पुढेच गेला आहे. सातत्यान बदल असलेल्या वातावरणामुळे आंबा बागायतदार चिंतेत आहे.

कुणकेश्वरच्या चांदेलवाडीतील शंकर नाणेरकर हे आंबा बागायतदार अभ्यासू आणि प्रयोगशील आहेत. त्यांनी बदललेल्या परिस्थितीतही पाच डझनी आंब्याच्या दोन पेट्या पाठविण्याचा मान प्राप्त केला आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply