कृषी विधेयकाच्या समर्थनासाठी कणकवलीत शेतकऱ्यांची ट्रॅक्टर फेरी

कणकवली : केंद्र शासनाच्या कृषी विधेयकातील कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत. तसा संदेश संपूर्ण कोकणासह देशभर जाऊ द्या, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपा आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कृषी विधेयकाच्या समर्थनासाठी आज काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर फेरीनंतर झालेल्या सभेत श्री. पाटील बोलत होते.

फेरीला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कणकवलीतील मुर्डेश्वर मैदानावरून निघालेली ही फेरी प्रांताधिकारी कार्यालयावर धडकली. फेरीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी कृषिमंत्री अनिल बोंडे, आमदार नीतेश राणे, माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते ट्रॅक्टर सहभागी झाले होते.

त्यानंतर झालेल्या सभेत चंद्रकांत पाटील म्हणाले, सहा महिन्यांपूर्वी हे तीन कृषी सुधारणा कायदे झाले असताना आता विरोधकांना जाग आली आहे. ते म्हणत आहेत की हे कायदे शेतकऱ्यांचे नुकसान करणारे आहेत. म्हणजे सहा महिने काय ते झोपा काढत होते का? एका राज्यातील शेतकऱ्यांच्या मदतीने गेल्या ४० दिवसांपासून प्रामुख्याने दिल्ली आणि देशाला वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशभरात बाकी ठिकाणी कोठेही या कायद्याला विरोध नाही उलट समर्थनच मिळत आहे.

यावेळी नारायण राणे म्हणाले, शेतकऱ्यांच्या हिताचा हा नवा कृषी कायदा आहे. राहुल गांधींना, उद्धव ठाकरेंना शेतीमधले काय कळते? त्यांना काहीच कळत नसल्याने ते समर्थन कसे करणार? विरोधच करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून एका बाजूला देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न सुरू आहेत, तर दुसऱ्या बाजूला नागरिकांना समृद्ध करण्याचा प्रयत्नदेखील सुरू आहेत. शेतकरी हा या देशाचा प्रमुख घटक आहे. आमच्या शेतकऱ्याला सबळ बनवले पाहिजे, आर्थिक समृद्ध बनवले पाहिजे. या कष्टकऱ्याला त्याच्या श्रमाचा फायदा मिळाला पाहिजे, या दृष्टिकोनातूनच त्यांनी हे विधेयक आणले आहे. मी राज्यसभेचा सदस्य आहे. राज्यसभेत हे विधेयक आले तेव्हा अतिशय चांगली चर्चा झाली. तेव्हा आमच्या विरोधकांपैकी कोणी विरोध दर्शवला नाही, उलट कौतुक केले. ७० वर्षांमध्ये काँग्रेसला जे जमले नाही. शेतकऱ्यांसाठी काही करू शकले नाहीत, तेच आज विरोध करत आहेत, आंदोलन करत आहेत. कोण आहेत विरोधक? स्वतः करू शकले नाहीत. शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विकायलादेखील बंधने, कायदे होते. माल कुठे विकायचा? कसा विकायचा? कोणामार्फत विकायचा? दलालामार्फत विकायचा, मग कष्टाचे पैसे मिळाले नाही तरी तोट्यात जाऊन विकायचा. हे गेली ७० वर्षांमधील कायदे व नियम पंतप्रधान मोदींनी मोडीत काढले.

श्री. राणे म्हणाले, आपला शेतकरी कष्टाने जे पिकवतो, उत्पादन घेतो. त्याला जिथे जास्त पैसे मिळतील तिथे त्याने माल विकावा. योग्य मोबदला मिळाला, याचे शेतकऱ्यांना समाधान मिळाले पाहिजे. म्हणून असा कायदा पंतप्रधान मोदींनी आणला. ठराविक राज्यातील शेतकरी आहेत. जे दलाल होते त्यांना आंदोलन करायला लावले आहे, कामाला लावले आहे, खर्चाला लावले, असेही श्री. राणे यावेळी म्हणाले.

माजी मंत्री अनिल बोंडे, आमदार नीतेश राणे, भाजपेच जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनीही सभेला संबोधित केले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply