समाजभान असलेले चित्रकार समाजजागृती करतात : प्रकाश राजेशिर्के

चिपळूण : समाजभान असलेले संवेदनशील चित्रकार समाजजागृतीचे काम करतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रकार-शिल्पकार प्रा. प्रकाश राजेशिर्के यांनी केले.

चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, संस्कार भारती आणि हौशी चित्रकार संघटनेतर्फे वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात प्रसिद्ध कलाकार गणेश कोंडिराम कळसकर आणि प्रज्ञा अरुण इंगवले यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, चित्रकार-कलाकार अत्यंत संवेदनशील असतो. तो स्वतःच्या संवेदना जागृत ठेवून इतरांच्याही जागृत करण्याचे काम पोटतिडकीने करत असतो. ते अत्यंत आवश्यक असते. ते या कलाकारांमध्ये आहे. या दोन्ही कलाकारांना मी समाजमाध्यमांमधून पाहत आलो आहे. आज त्यांची कला प्रत्यक्षात पाहिली. अवयवदानाच्या क्षेत्रात चित्रकार कळसकर काम करत आहेत. दर रविवारी लहान मुलांसाठी चित्रकलेचे मोफत क्लास घेतले जात आहेत. या चित्रकारांच्या कलांमध्ये समाजभान आणि संवेदना दिसतात. जगात कलेच्या क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या संस्थांनी आपल्या कामाची दखल कमी वयात घेणे हे कौतुकास्पद आहे. या चित्रकारांनी काढलेल्या चित्रांचे ‘लेपन’ हे त्यांच्या स्वभावाप्रमाणे शांत रंगातील असल्याचे मतही प्रा. राजेशिर्के यांनी व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष चिपळूण पालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, चित्रकार गणेश कळसकर आणि प्रज्ञा इंगवले, संस्कार भारती उत्तर रत्नागिरीचे अध्यक्ष शरद तांबे आणि वाचनालयाचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे होते. भोसले यांनी कलाकारांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. चित्रकलेत भविष्य घडवू पाहणाऱ्या शहरातील नव्या पिढीसाठी आजच्या सत्कारमूर्तींच्या साहाय्याने एकत्रित काम करू, अशी भूमिका भोसले यांनी मांडली.

सावर्डे (चिपळूण) येथील कला महाविद्यालयाचे संस्थापक, माजी प्राचार्य प्रकाश राजेशिर्के आणि मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या हस्ते गणेश कळसकर आणि प्रज्ञा इंगवले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज वाटेकर यांनी केले. आभार शरद तांबे यांनी मानले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply