Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

जिल्हा नगर वाचनालयाच्या भाडेकराराला मुदतवाढ

Advertisements

रत्नागिरी : रत्नागिरीचे सांस्कृतिक केंद्र, वाचकांची वाचनतृष्णा भागवणाऱ्या रत्नागिरी जिल्हा (नगर) वाचनालयाच्या जागेचे लीज ३० वर्षांसाठी वाढवून मिळण्यात यश आल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून हा निर्णय गेल्या महिन्यात झाला. त्याचे अधिकृत पत्र वाचनालयास प्राप्त झाल्याचे ॲड. पटवर्धन म्हणाले.

रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय हे महाराष्ट्रातले सर्वांत जुने १९६ वर्षांचे वाचनालय आहे. १ लाख १३ हजार ग्रंथांनी समृद्ध असलेले ऐतिहासिक परंपरा असलेले एक अत्यंत दर्जेदार वाचनालय म्हणून महाराष्ट्रभर ओळखले जाते. या वाचनालयाच्या जागेचा भाडेपट्टा १९९२ मध्ये संपुष्टात आला होता. १९५१ पूर्वीपासून हे वाचनालय सध्या आहे त्या जागेवर उभे आहे. मात्र ही जागा नगरपालिकेची व इमारत नगर वाचनालयाच्या मालकीची अशी स्थिती आहे. भाडेपट्टा वाढवून मिळावा म्हणून अनेक वेळा प्रयत्न झाले. मात्र राजकीय हेवेदाव्यातून हे प्रकरण मार्गी लागत नव्हते.

ॲड. पटवर्धन यांनी यासाठी सातत्याने प्रयत्न केले. मंत्री उदय सामंत यांच्याकडे हा विषय मांडला. भाजपा जिल्हाध्यक्ष असताना मुख्यमंत्र्यांकडेही याबाबत पाठपुरावा केला होता. मात्र अनेक तांत्रिक गोष्टींची अडचण येत होती. अखेर मंत्री सामंत यांनी आपला प्रभाव वापरून सर्व तांत्रिक अडचणी दूर करत मुख्यमंत्र्यांकडे हा विषय मांडून वाचनालयाला २०१८ पासून ३० वर्षांसाठी नाममात्र १ रुपया भुईभाड्याने आहे ती संपूर्ण जागा उपलब्ध करून दिली. शासनाने रत्नागिरी नगर वाचनालयास ३० वर्षे मुदतीने जागा देण्याचा शासन निर्णय १३ फेब्रुवारी रोजी पारित झाला. अनेक वर्षे रत्नागिरी नगर वाचनालयावरच्या जागेचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याबद्दल अध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी मंत्री उदय सामंत, मुख्यमंत्री, रत्नसिंधू योजनेचे संचालक किरण तथा भैय्या सामंत, रत्नागिरी नगरपालिका, जिल्हाधिकारी या सर्वांना धन्यवाद दिले आहेत. खूप किचकट असणारे हे प्रकरण अनंत अडचणी दूर करत मार्गी लागले, याचे खूप समाधान आहे. आता नव्या इमारतीचा मार्ग मोकळा होईल, अशी प्रतिक्रियाही पटवर्धन यांनी दिली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version