राजापूर : जुवाठी (ता. राजापूर) येथील सामाजिक कार्यकर्ते, सेवानिवृत्त सिटी सर्व्हे ऑफिसर विष्णू गुणाजी धुमाळे यांनी अक्षरमित्र बी. के. गोंडाळ यांच्या अक्षरमित्र बालग्रंथालय निर्मिती उपक्रमाला १३ हजार २६२ रुपये किमतीची २८३ पुस्तके देणगीदाखल दिली.
श्री. धुमाळे जुवाठी गावातील वाचनप्रेमी सद्गृहस्थ म्हणून परिचित आहेत. त्यांचे वय ७७ वर्षांचे आहे. आपल्या नोकरीच्या निमित्त ते ज्या ज्या गावी गेले, तेथील वाचनालयाचे सभासद झाले. त्यांनी आयुष्यभर शेकडो पुस्तके विकत घेतली आणि त्यांचे वाचन केले. त्यापैकीच आपण वाचलेली आणि प्राणपणाने जपलेली पुस्तके त्यांनी बी. के. गोंडाळ यांच्या उपक्रमाला दिली. यापूर्वीही त्यांनी १७४ पुस्तके आणि एक हजार रुपये या उपक्रमाला दिले आहेत.
विशेष म्हणजे त्यांनी आपल्या वयाच्या ७५व्या वर्षी जुवाठी येथील आपल्या घरात लहान मुलांसाठी स्वखर्चाने गंमत जमत वाचनालय सुरू केले आहे. आजही ते नियमित वृत्तपत्रवाचन करत असतात आणि संपूर्ण दिवस पुस्तकांच्या सहवासात आनंदात घालवतात. अशा पुस्तकवेड्या श्री. धुमाळे यांचे बी. के. गोंडाळ यांनी विशेष पत्र लिहून आभार मानले आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

