रत्नागिरीच्या नववर्ष स्वागत यात्रेत ७० चित्ररथांचे आकर्षण

रत्नागिरी : येथे आज काढण्यात आलेल्या नववर्ष स्वागत यात्रेत ७० चित्ररथांचे मोठे आकर्षण होते. यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

रत्नागिरीत गेल्या १९ वर्षांपासून गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात येते. यावर्षीसुद्धा ग्राममंदिर भैरी मंदिर ते समाजमंदिर पतितपावन मंदिर या मार्गावर जल्लोषात स्वागतयात्रा काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषा, भगवे ध्वज, नाक्यानाक्यांवर काढलेली आकर्षक रांगोळी, रस्ता दुभाजकांवर उभारलेल्या गुढ्या अशा मंगलमय वातावरणात स्वागतयात्रा निघाली. यात्रेचे नियोजन ग्रामदैवत श्री देव भैरी जुगाई, नवलाई, पावणाई, तृणबिंदुकेश्वर देवस्थान संस्था आणि श्री पतितपावन मंदिर संस्था व सर्व हिंदुत्ववादी संस्था, कार्यकर्त्यांनी केले. हिंदू एकतेचे दर्शन घडवत स्वागतयात्रा काढण्यात आली.

झाडगाव येथील ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिरात गुढी उभी करून, गाऱ्हाणे घालून स्वागतयात्रेला प्रारंभ झाला. त्याच वेळी मारुती मंदिर व शहराच्या वरच्या भागातील हिंदू बंधू भगिनींनी एकत्र येऊन स्वागतयात्रेला सुरवात केली. दोन्ही ठिकाणचे मिळून सुमारे ७० चित्ररथ पाहायला मिळाले. सामाजिक संदेश, छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा, स्वामी समर्थ, राधा- कृष्ण असे विविध देखावे केले होते.

शहराच्या विविध मार्गांवरून रथयात्रा येत असताना अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी, स्वागतासाठी रांगोळ्या, पताकांनी वातावरण भगवेमय झाले होते. स्वागतयात्रेच्या मार्गावर सर्वत्र गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. यंदा अनेक संस्थांनी प्रथमच स्वागतयात्रेत भाग घेतला. स्वागतयात्रेमध्ये प्रभू श्रीराम, कृष्ण यांचे देखावे सादर केले. तसेच भजन पथक, ढोल-ताशे पथकांनी जल्लोष केला. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा छत्रपती शिवाजी महाराजांचा सजीव देखावा लक्षवेधी ठरला. तसेच धारकऱ्यांनी घुंगूरकाठीचे सादरीकरण केले. गडकिल्ले शौर्य मोहिमेची माहितीसुद्धा दिली.

रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि सुवर्णसूर्य फाउंडेशनने आरोग्यम् धनसंपदा या विषयावर आकर्षक चित्ररथ बनवला होता. सुवर्णसूर्य फाऊंडेशनतर्फे पुढील वर्षी होणाऱ्या दुसऱ्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनची माहिती या वेळी देण्यात आली. तसेच १० दिवस धावणे, चालण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. सायकलिस्ट क्लबतर्फे दुसऱ्या रोलर कोस्टर सायक्लोथॉनचेही आयोजन ऑक्टोबरमध्ये केले जाणार आहे. आपले आरोग्य आपल्या हातात आहे, त्यामुळे सायकल चालवा, धावण्याचा व्यायाम करा, असा संदेश या वेळी देण्यात आला. या वेळी क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते

ग्रामदैवत भैरी देवस्थानचे उपाध्यक्ष राजन जोशी, सर्व विश्वस्त, विठ्ठल मंदिर संस्थेचे अध्यक्ष आनंद मराठे, पतितपावन मंदिर संस्थेचे अध्यक्ष उन्मेश शिंदे, अॅड. बाबा परुळेकर, राजेश आयरे, सचिन वहाळकर, अनिल पोटफोडे, राजू जोशी, प्रवीण जोशी, श्री. अकिवटे, अॅड. रुची महाजनी, तनया शिवलकर, गजानन करमरकर, राहुल पंडित, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भोवड, मंगेश मोभारकर, कौस्तुभ सावंत, संतोष पावरी, राकेश नलावडे, सुहास ठाकुरदेसाई, महेश नवेले, संतोष पावरी यांच्यासमवेत हिंदू बंधू-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

राज्याचे उद्योगमंत्री, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जयस्तंभ येथे स्वागतयात्रेत सहभाग घेतला. गोखले नाका येथे भाजपचे नेते, माजी आमदार बाळ माने, सौ. माधवी माने व मिहिर माने यांनी हिंदु बंधूभगिनींना शुभेच्छा दिल्या. खालची आळी येथे राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी स्वागतयात्रेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

(छायाचित्र सौजन्य : कांचन मालगुंडकर)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply