वृक्षारोपण, वृक्षदिंडी प्रगतिशील शेतकऱ्यांच्या सत्काराने कृषी दिन साजरा

रत्नागिरी : शासनाच्या विविध विभागांमार्फत अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जात आहेत. त्यांचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा, विशेषत: कृषी विभागाच्या माध्यमातून महिला शेतकरी उत्पादक निर्माण व्हावे, अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी व्यक्त केली.

कृषी दिनानिमित्त करबुडे ग्रामपंचायतीमध्ये आज प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सरपंच संस्कृती पाचकुडे, उपसरपंच करिष्मा गोताड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, कृषी विकास अधिकारी अजय शेंडे आदी उपस्थित होते.

सुरुवातीला ग्रामदैवत मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर करबुडे-लाजूळच्या माध्यमिक विद्यालयाच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी वृक्ष दिंडी काढली. हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्‍पहार अर्पण करण्यात आला. ग्रामपंचायतीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्याने कृषी दिनानिमित्ताने एक रोप लावावे. निसर्गाने कोकणाला भरभरून दिले आहे. येथील नैसर्गिक साधनसामग्रीचे संवर्धन करणे आणि जतन करणे ही आपली जबाबदारी आहे. भविष्यात कोणत्याही क्षेत्रात प्रगती करत असताना जबाबदार नागरिकाचे कर्तव्य पार पाडा.

ग्रामस्थ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री. पुजार म्हणाले, कृषी ही खूप मोठा विषय आहे. कोकण हा कातळ, डोंगरी भाग आहे. जसा येथील शेतकरी पावसाळ्यात भात, नाचणी पीक घेतो, त्याच पद्धतीने उन्हाळ्यातदेखील शेतजमीन पडीक न ठेवता, विशेषत: भाजीपाला उत्पादनावर भर दिला पाहिजे. शेतीमधील नवनवीन प्रयोग करण्यासाठी आजच्या कालावधीत माहिती घ्यायला कोणतीही कमतरता नाही, ती सर्वत्र उपलब्ध आहे. करबुडे ग्रामपंचायतीने स्वत:पासून असे नवनवीन प्रयोग करावेत. त्यासाठी योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी करावी, असेही ते म्हणले.

प्रास्ताविकात गटविकास अधिकारी श्री. जाधव यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी निश्चित शेतीमध्ये बदल करावेत. बाजारातील मागणीनुसार लागवड करावी. विकसित शेतकरी, विकसित खेडे निर्माण करण्याची संधी सोडू नये. यावेळी प्रगतिशील शेतकऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply